-->
कोरोनामुळे बदलत जाणारे जग

कोरोनामुळे बदलत जाणारे जग

12 सप्टेंबरच्या मोहोरसाठी चिंतन कोरोनामुळे बदलत जाणारे जग कोरोनामुळे सर्व जगातील विविध समाजघटकांवर मोठे परिणम गेल्या वर्षाभरात झाले आहेत. अर्थातच तसे होणे स्वाभाविकच आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाची घुसळण झाली आहे. विकसीत देशांपासून ते सर्वच गरीब देशांची पुरती दमछाक झाली आहे. दीड वर्षे पूर्ण झाली असली तरीही कोरोना अजून जगातून हद्दपार झालेला नाही. अजूनही हे कोरोनाचे भूत जगाच्या पाठीवर काही काळ राहिल असा अंदाज आहे. आज आपल्याकडे तिसरी लाट येऊ घातली आहे, जगातील अनेक देशात चौथी लाट सुरु झाली आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होत असला तरीही कोरोना नष्ट होण्याच्या दृष्टीने काही पावले पडलेली नाहीत. कोरोनासारखी अशा प्रकारची जागतिक आपत्ती शतकातून एकदा येते व त्याचा मुकाबला करणे सर्वांनाच कठीण होऊन जाते. विकसीत देशातल्या उत्कृष्ट समजल्या जाणऱ्या आरोग्य सेवाही व त्याच्या जोडीला अर्थव्यवस्थाही कोलमडून गेल्या आहेत. आपल्याकडे मबलक व स्वस्त मजूर उपलब्ध आहेत असे आपण जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना सांगतो. परंतु सध्या देशाला फार मोठ्या प्रमाणावर कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. आपल्याकडे कामगारांची कमतरता आहे असे नव्हे तर शहरातून लाखो मजूर ग्रामीण भागात आपल्या गावी गेले आहेत. ते सर्वच्या सर्व पुन्हा शहरात परतलेले नाहीत. सहा महिन्यापूर्वी आलेल्या दुसऱ्या लाटेत आपल्याकडे मोठी मनुष्यहानी जाली. त्यातून अनेक कुटुंबे सावरलेली नाहीत. सरकारने त्यांच्यासाठी काही ठोस करण्याची आवश्यकता आहे. परंतु सरकारकडून फारशी काही अपेक्षा ठेवता येत नाही. कारम कोरोना काळातही या सरकारने आपल्या तोंडाला पानेच पुसली आहेत. अशा प्रकारे परिस्थिती आपल्याकडे येईल असे कोणालाही वाटले नव्हते. एकीकडे मजुरांची ही स्थिती असताना दुसरीकडे हायटेक म्हणून ओळखल्या गेलेल्या आय.टी. उद्योगात अभियंत्यांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे या उद्योगात गेल्या वर्षी पगारवाढ झाली नव्हती, परंतु यंदा अभियंत्यांना आपल्याकडे राखून ठेवण्यासाठी वीस ते तीस टक्के पगारवाढ दिली जात आहे. कोरोनानंतरचे जग हे फार वेगळे असणार आहे. वर्क फॉर्म होम ही संस्कृती आता चांगलीच रुजली आहे. त्यामुळे भविष्यात ही संकल्पना केवळ आय.टी. उद्योगातच नाही तर विविध क्षेत्रात रुजणार आहे. अगदी वृत्तपत्रे देखील घरुन काम करुन प्रकाशित होऊ लागली आहेत. वृत्तपत्रांच्या बाबतीत आपण असे काही होईल हे अगदी पाच वर्षांपूर्वीही मान्य करु शकलो नसतो. परंतु आता ते शक्य झाले आहे. कोरोनामुळे अनेकांचा आर्थिक स्थर बदलला आहे, हा झालेला एक मोठा बदल आहे. जागतिक पातळीवरील संस्थेने केलेल्या पाहणीत गेल्या वर्षात जगातील सुमारे ३२ टक्के मध्यमवर्गीय म्हणजे अंदाजे १५ कोटी लोक गरीबीत ढकलले गेले. त्यापूर्वी मध्यमवर्गीयांची लोकसंख्या दरवर्षी वाढतच जात होती. आपल्या देशाचा नेमका आकडा यात नसला तरी आपल्याकडील ३५ कोटी मध्यमवर्गीयातील सुमारे आठ कोटी लोकांना कोरोनाची जबरदस्त झळ पोहोचली आहे असे दिसते. त्यापेक्षा फटका बसलेली जास्त संख्या खरेतर गरीबांची आहे. परंतु त्याविषयीचा अभ्यास प्रसिध्द झाल्यावर अनेक गरीब व विकसनशील देशातील भयाण आकडेवारी व वास्तव बाहेर येईल. आपल्याकडेही गरीबांचे प्रामुख्याने स्थलांतरीत मजुरांचे हाल प्रचंड झाले आणि सरकारने त्यांची साधी सोय देखील केली नाही, हे एक मोठे दुर्दैव म्हटले पाहिजे. आपल्याकडे असो वा जगात स्थलांतर हे प्रामुख्याने रोजगारासाठीच होते. मग त्यात सूटबुट घातलेल्या उच्चशिक्षीतांचे असेल किंवा काबाडकष्ट करुन रोजंदारीवर पोट भरणाऱ्या मजुरांचे असेल. आपल्या देशात पाच टक्के लोक हे श्रीमंत, अतिश्रीमंत व नवश्रीमंत या सदरात मोडतात. त्यांना कुठल्याच बाबतीत फारसा फरक पडत नाही. त्यांचा आपण फारसा विचार करण्याची गरज नाही. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालात मध्यमवर्गीयांची मोठी संख्या कोरोनामुळे गरीबीत लोटली गेली असे जे म्हटले आहे ती बाब चिंता करण्यासारखी आहे. जगाचा विचार करता २५० कोटी लोक मध्यमवर्गीयात मोडतात. त्यातील सरासरी ३० टक्क्यांना जबरदस्त फटका बसून ते आता गरीबीत ढकलले गेले आहेत हे भयाण वास्तव कोरोनामुळे जगापुढे आले आहे. आपल्याकडे मध्यमवर्ग हा प्रमुख्याने ९१ साली देशात सुरु झालेल्या उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर झपाट्याने वाढला. त्यापूर्वी देखील आपल्याकडे मध्यमवर्ग होता, परंतु त्याची आर्थिक स्थिती ही फारशी काही चांगली नव्हती. दोन वेळचे पोटभर जेवणारा सरकारी किंवा चांगल्या खासगी कंपनीतील पगारदार नोकर, त्याला महिन्यातून एखादा सिनेमा बघण्याचा शौक परवडू शकतो अशी मध्यमवर्गीयाची त्यावेळची आर्थिक स्थिती होती. महत्वाचे म्हणजे हा बऱ्यापैकी शिक्षीत वर्ग असल्याने पुढील उदारीकरणाच्या काळात सर्वाधिक फायदे घेणारा हा वर्ग ठरला. ९१ च्या उदारीकरणाने अनेक चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मध्यमवर्गीयासाठी उपलब्ध झाल्या. इंग्रजीचे चांगले ज्ञान असलेल्यांना शिक्षण कमी असले तरी कॉल सेंटरच्या नोकऱ्या खुल्या झाल्या. संगणकीकरण हा त्यावेळी मध्यमवर्गीयांसाठी टर्निंग पॉईंट ठरला होता. ज्या राजीव गांधींनी संगणकीकरणाची कवाडे खुली करुन दिली व त्यातून भरमसाठ पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या व त्यातूनच प्रामुख्याने आपल्या देशातील मध्यमवर्ग वाढला, हे वास्तव असले तरी हा वर्ग सर्वात जास्त राजीव गांधींचा टिकाकार होता. २०००च्या अगोदर मुंबईत घर घेणे या वर्गाच्या आवाक्यात होते. त्यामुळे स्वत:चा फ्लॅट, चार चाकी गाडी किंवा किमान दुचाकी तरी वाहन, घरात दोन ते तीन कमवते असे आपल्याकडील मध्यमवर्गीयाचे स्वरुप होते. पूर्वीचे जे मध्यमवर्गीय म्हणून होते ते या वर्गात गेले. त्यांच्या कुटुंबांत एखादा तरी अमेरिका, युरोपात नातेवाईक स्थायिक झाल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे त्यांच्या घरातील मुलांनाही परदेशात जाऊन स्थायिक होणे हेच उदिष्ट राहिले. जे काही भारतात राहिले त्यांच्या इकडे चांगल्या नोकऱ्या, उद्योगंदधंदे होते त्यामुळे ते इकडे स्थिरवले. गेल्या दशकात तर आपल्या देशात मध्यमवर्गीय चांगलेच स्थिरवले होते. आपल्या या सधनतेपणाचा त्यांना काहीसा गर्वही होता. परंतु त्यांना कोरोनाने पुन्हा एकदा वास्तव दाखविले आहे. कोरोनामध्ये या वर्गातील लोकांच्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तरी गेल्या किंवा ज्यांच्या नोकऱ्या टिकल्या त्यांना पगारकपातीला सोमोरे जावे लागले. ज्यांना कोरोना झाला व खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागले त्यांना आपल्याकडील खासगी रुग्णसेवा किती लुबाडणूक करते त्याचे दर्शन झाले. यातून काहींना रुग्णालयाचे बिल चुकते करण्यासाठी कर्ज काढावे लागले. सरकारने सुरुवातीला गृह कर्जांचे हाप्ते पुढे ढकलण्याचे आश्वासन दिले होते, परंतु नंतर ते आश्वासन काही पाळण्यात आले नाही. गृह कर्ज व वाहन कर्जे घेणारा हाच मोठा वर्ग आपल्य़ा देशात आहे. त्यामुळे एकीकडे घसरत्या कर्जामुळे त्याला दिलासा मिळत असताना दुसरीकडे कोरोना काळात कर्जे न फेडता आल्याने कर्जाचा जादा भार सहन करावा लागला. एकूणच मध्यमवर्गीयांची सर्व आर्थिक गणिते चुकली आणि त्यातून गरीबीत जरी ढकलले गेले नसले तरी त्यांना जो आर्थिक फटका बसला त्यामुळे त्यांचे जीवन हालाखीचे झाले. सरकारने मात्र त्यांना कोणताही दिलासा दिला नाही हे देखील दुर्दैवीच म्हटले पाहिजे. कोरोनापश्चात जग हे पूर्णपणे बदललेले असेल, यात काही शंका नाही. पुढील दोन-तीन वर्षात कोरोनामुळे झालेले परिणाम आपल्याला प्रत्यक्ष दिसू लागणार आहेत. यात अनेकांच्या नोकऱ्याही जातील किंवा नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. कोरोनानंतरच्या जगात सध्याचे सर्व घटकांना सामावून घेतले जाईल असे नाही. त्यातून मोठी उलथापालथ होणार आहे. याची सुरुवात आत्तापासूनच झाली आहे. भांडवलशाहीत असे बदल होतच असतात, आता तर आपण बाजारभिमूख अर्थव्यवस्था स्विकारली आहे आणि ही अर्थव्यवस्था आता बऱ्यापैकी रुजू लागली आहे. अर्थातच गरीब देश अधिकच पोळले जाणार यात काही शंका नाही. भारत यातून सावरणार हे नक्की आहे, परंतु तो कसा उभा राहतो ते पहावे लागेल.

0 Response to "कोरोनामुळे बदलत जाणारे जग"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel