-->
श्रेय कसले घेता?

श्रेय कसले घेता?

संपादकीय पान शनिवार दि. 24 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
श्रेय कसले घेता?
मुंबई उपनगरी पश्‍चिम रेल्वेवर उभारलेल्या राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उद्घघाटनात शिवसेना-भाजपमधील श्रेयवादाची लढाई प्रकर्षाने दिसून आली. आता या श्रेयवादाच्या लढाईचा दुसरा अंक शिवस्मारकाच्या भूमिपुजनावरुन सुरू झाला आहे. दादरमधील शिवसेना भवन परिसरात शिवसेनेने रातोरात पोस्टर लावल्याने आता शिवस्मारकाराच्या भूमिपुजनावरुन शिवसेना-भाजपमधील संघर्ष वाढणार आहे. शिवस्मारक व्हावे ही बाळासाहेबांची इच्छा, अशा आशयाचे पोस्टर शिवसेनेकडून लावण्यात आले. याशिवाय शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रॅलीच्या मार्गावरही शिवसेनेकेडून पोस्टर लावण्यात आली आहेत. शिवस्मारक भूमिपूजनासाठी भाजपकडून जोरदार वातावरणनिर्मिती करण्यात येत असल्याने आता शिवसेनेकडूनही पोस्टरबाजीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील श्रेयवादाची लढाई तीव्र होताना पाहायला मिळते आहे. शिवस्मारकाच्या नुसत्या पायाभरणी समारंभालाच श्रेय उपटण्याची झालेली सुरुवात पाहता हे स्मारक पूर्ण झाल्यावर काय करतील, असा प्रश्‍न जनतेच्या मनात आल्याशिवाय राहाणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे शिवस्मारक हे ठरल्यानुसार वेळेत होईल असे कुणीच सांगू शकत नाही. कारण 3600 कोटी रुपयांच्या या स्मारकाचा खर्च कदाचित दहा हजार कोटी रुपयांवरही जाईल. अर्थात हे स्मारक आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे का? तिकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे फक्त भूमीपूजन करुन ठेवले. पुढे काहीच झाले नाही. कशावरुन या स्मारकाचेही असेच होणार नाही? खरे तर शिवस्मारकाची आत्ता कुठे पायाभरणी झाली आहे. हे स्मारक पूर्ण तर झालेले नाही. आपल्याकडे पाण्यासारख्या महत्वाच्या प्रश्‍नासाठी बांधण्यात येणार्‍या धरणांचे बांधकामही दोन दोन तपे लांबते. तर डॉ. बाबासाहेबांचे स्मारक असो वा शिवरायांचे हे कधी पूर्ण होईल व ते पूर्ण होईपर्यंत त्याचा खर्च कितीवर पोहोचेल ते सांगता येत नाही. अशा स्थितीत श्रेय कसे घ्यायला धावता? स्मारक पूर्ण झाल्यावर काय ते श्रेय् घ्यावे. परंतु आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आल्याने भाजपाला सध्या तिकडची केवळ सत्ता काबीज करण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या भूमिपूजनासाठी त्यांनी आपल्या सहकारी पक्षाला शिवसेनेलाही बोलाविण्याचे टाळले होते. मात्र शिवसेनेने आपल्यालाही यात सहभागी करुन घेण्याचा बाल हट्ट धरला आणि तो शेवटी भाजपाने पूर्ण केला. आता पोस्टरच्या माध्यमातून शिवसेना-भाजपमध्ये शिवस्मारकावरुन श्रेयवादाचा संघर्ष टोकाला जाताना दिसतो आहे. भाजप आता मुंबई भगवामय करणार असून शुक्रवारपासून दोन दिवस भाजपच्या शिवगजराने मुंबई दुमदुमणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्मारकाचे जलपूजन व विकास प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी आमंत्रित करण्यात आले असले तरी समारंभात शिवसेनेला कोणतेही स्थान न देता वचनपूर्तीचे सारे श्रेय मिळविण्याचा भाजपचा आटापिटा आहे.
भाजपने प्रत्येक पवित्र नद्यांचे पाणी व शिवरायांच्या गडकिल्ल्यावरची माती कलशांमध्ये आणण्यास सुरुवात केली आहे. तेथून भाजप युवा मोर्चाच्या दुचाकी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रथयात्रा व दुचाकी यात्रा मुंबईतील बहुतांश भागात फिरेल आणि गेटवे ऑफ इंडिया येथे जाईल. तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कलश स्वीकारणार आहेत. त्यामुळे शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा समारंभ शासकीय असला तरी त्याचा पूर्णपणे भाजपने ताब्यात घेतला आहे. शासकीय जाहिराती व अन्य जाहिरातींमध्येही भाजप-शिवसेना युती सरकार असा उल्लेख नाही. शिवाजी महाराज हे राजकारणापलीकडे असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जात असले तरी आयोजनामध्ये शिवसेनेचा सहभाग कुठेच नाही. एकूणच शिवस्मारकाचे श्रेय लाटण्याची धडपड या दोन्ही पक्षात सध्या जोरदार लागली आहे.

0 Response to "श्रेय कसले घेता?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel