
उद्योगातील अस्वस्थता
15 मे शनिवारच्या अंकासाठी अग्रलेख
उद्योगातील अस्वस्थता
देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वांमध्ये अस्वस्थता आहे. सर्वात जास्त अस्वस्थता ही उद्योगंधद्यांमध्ये आहे. कारण गेल्या वर्षी लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते, परंतु यंदा देशात काही अपवादात्मक विभाग वगळता लॉकडाऊन नसले तरीही अनेक उद्योगधंदे मागणी अभावी थंड पडले आहेत. काही उद्योगात तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा फार वाईट स्थिती आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर केल्याबद्दल उद्योगधंद्यातील अनेकांनी सरकारला दोष दिले होते परंतु लॉकडाऊन ही काळाची गरज होती. त्याशिवाय अन्य काही पर्याय आज जगात नाही. अमेरिकेत लॉकडाऊन नव्हते, त्यामुळे तेथे मृत्यूचे प्रमाण जगात सर्वाधिक होते. त्यानंतर झालेल्या तेथील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना आपली सत्ता गमवावी लागली. कोरोना काळात ट्रम्प प्रशासनाने जी परिस्थिती हाताळण्यात अपरिपक्वता दाखविली त्यामुळे त्यांची सत्ता गेली. आता आपल्याकडे नरेंद्र मोदी अमेरिकेप्रमाणे येथेही लॉकडाऊन टाळत आहेत. परंतु तसे केल्याने उद्योगदधंदे सुरु राहातील व देशाचे अर्थकारण जैसे थे राहिल हा त्यांचा अंदाज चुकत आहे. उलट देशातील कोरोनामुळे उदभवलेली आरोग्य स्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. त्यामुळे एकीकडे दररोज चार लाख रुग्ण नोंदविले जात आहेत तर दुसरीकडे उद्योगधंदे ठप्प आहेत, कारण मागणीच नाही. देशात सर्वात मोठी उलाढाल असलेल्या ग्राहोकपयोगी वस्तूंची बाजारपेठ ही पूर्णपणे थंडावली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात ए.सी.ची मागणी मोठी असते, यंदा ती मागणी अगदीच नगण्य आहे. यंदा फक्त स्वच्छेतेशी निगडीत उत्पादने चांगल्या प्रमाणात विकली जात आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन संपल्यावर सर्वात प्रथम वाहन उद्योगाला उठाव आला होता. मग दुचाकी असो किंवा चार चाकी त्यांच्या विक्रीचा जोर वाढला होता. लक्झरी गाड्यांची मोठी विक्री लॉकडाऊन उठल्यावर झाली होती. आता मात्र पुन्हा एकदा वाहन उद्योगाला जबरदस्त फटका सहन करावा लागत आहे. देशातील झपाट्याने वाढणारे क्षेत्र म्हणून ई कॉमर्सकडे पाहिले जाते. सध्याच्या काळात हे क्षेत्र बहरेल अशी शक्यता वाटत होती. परंतु सध्या यांच्या व्यवसायात केवळ दहा टक्केच वृध्दी झाली आहे. गेल्या वर्षीपासून सर्वात जास्त फटका हा हॉटेल, पर्यटन, हवाई क्षेत्राला बसला आहे. यंदाही त्यांना एका मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. हवाई उद्योगासाठी तर एप्रिलपासून पुढील तीन महिने अत्यंत कठीण जाणार आहेत. हवाई प्रवाशांतील ३० टक्क्यंची घट या उद्योगाला मोठ्या संकटाकडे नेत आहे. नजिकच्या काळात यात सुधारणा होईल असे काही दिसत नाही. सध्या देशातील ३०० एवढ्या मोठ्या संख्येने विमाने विमानतळावर उभी आहेत. हवाई उद्योगाप्रमाणे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका आहे. सध्याच्या स्थितीला ४० टक्के हॉटेल्स पूर्णपणे बंद झाली आहेत व पुन्हा ती उघडतील असे काही दिसत नाही. पहिली लाट संपत आल्यावर हा उद्योग पुन्हा एकदा भरारी घेत होता, परंतु दुसरी लाट आल्यावर हा उद्योग पूर्णपणे झोपला आहे. पर्यटन उद्योग पुन्हा कधी भरारी घेईल हे आत्ता काहीच सांगता येत नाही. अशा स्थितीत एकूणच पर्यटनाशी संबंधीत उद्योग कोरोनापूर्व स्थितीत कधी येईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. रिटेल फॅशन उद्योगाचेही भवितव्य धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षात या क्षेत्राची वाढ झपाट्याने होत होती व भविष्यात हा उद्योग रिटेल क्षेत्रात एक महत्वाचा ठसा उमटवेल असे वाटत होते, परंतु आता या उद्योगाच्या वाढीला पूर्णपणे खीळ बसली आहे. डेस्क टॉप व लॅपटॉप यांचे खप वाढले आहेत, कारण अनेक लोकांच्या वर्क फ्रॉर्म होममुळे लॅपटॉपची मागणी वाढली आहे, त्यामुळे त्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र हे सर्व हंगामी आहे. एकदा का सर्वांची खरेदी झाली की या उद्योगाच्या वाढीला मर्यादा येणार आहेत. स्मार्टफोनची बाजारपेठ आपल्याकडे झपाट्याने वाढत चालली होती. परंतु त्यांच्या वाढीला सध्या तरी खीळ बसली आहे. कारण लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. ही बाजारपेठ विकसीत व्हायला अजून बराच काळ लागेल असे दिसते. देशातील रियल इस्टेट हे एक मोठी मागणी असलेले क्षेत्र होते. परंतु कोरोनाच्या काळात या उद्योगाचे सर्व व्यवहार ठप्प झाल्यासारखे झाले होते. त्यात पहिली लाट संपल्यावर या उद्योगाने पुन्हा डोके वर काढले होते, परंतु या उद्योगाला आता पुन्हा चार पावले मागे जावे लागले आहे. त्यामुळे या उद्योगाशी निगडीत असलेल्या पोलाद व सीमेंट उद्योगालाही त्याचा फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे देशातील उद्योग क्षेत्र सावरत असताना पुन्हा दुसऱ्या लाटेने घात केला आहे. कोरोना संपूर्ण मिटल्यावर व देशातील सध्याचे वातावरण निवळल्यावरच देशाला खऱ्या अर्थाने उद्योग भरारी पाहता येईल असे दिसते.
0 Response to "उद्योगातील अस्वस्थता"
टिप्पणी पोस्ट करा