-->
महासत्तेचा महानेता

महासत्तेचा महानेता

रविवार दि. 05 नोव्हेंबर 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
महासत्तेचा महानेता
चीनमधील सर्वोच्च व सत्ताधारी असलेल्या चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या 19व्या अधिवेशनात विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांना पुन्हा पाच वर्षांसाठी कम्युनिस्ट पक्षाचा सर्वोच्च नेता व चीनचे अध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. जिनपिंग यांना पक्षातून विरोध असल्याच्या बातम्या प्रसूत झाल्या होत्या. परंतु, त्या बातम्यांत काहीच तथ्य नाही व जिनपिंग हेच पक्षाचे, तसेच सरकारचे प्रमुख म्हणून पुढील पाच वर्षे राहणार आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. 2012पासून शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. ते अध्यक्ष झाले त्यावेळी कम्युनिस्ट पार्टीचे स्वत:चे म्हणून चीनच्या राजकारणावर वर्चस्व होते. राजकीय अधिकारांचे पार्टीत विकेंद्रीकरण होते. पण, या पाच वर्षांत सर्वच परिस्थिती पालटली. आज कम्युनिस्ट पार्टीची सर्व सूत्रे, देशातील राजकारणाची सर्व धुरा, आर्थिक धोरणांची अंमलबजावणी, देशाच्या विदेशी धोरणांची दिशा, इंटरनेटवरचे निर्बंध, तसेच अंतर्गत परिस्थिती हाताळण्याचे सर्व अधिकार यावर फक्त शी जिनपिंग यांची करडी नजर आहे. अनेक बाबतीत त्यांच्याकडे देशातील अनेक सूत्रे केंद्रित झाली आहेत. पुढील काळात चीनचे भविष्य तेच ठरवणार आहेत. चीनमध्ये सरकारमध्ये कोण, प्रमुख कोण आहे, त्याला फारसे महत्त्व नसते. पक्षाची सूत्रे कोणाच्या हातात आहेत, याला महत्त्व असते. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती करणारे माओ व त्यांच्यानंतर विविध क्षेत्रात खुलेपणा आणणारे डेंग यांच्यानंतर चीनच्या राजकारणात सर्वात शक्तीशाली नेतृत्व म्हणून शी जिनपिंग उदयास आले आहेत. माओने जशी सांस्कृतिक क्रांतीची घोषणा करुन लक्षावधी तरुणांना खेड्याकडे चला असा आदेश दिला, तसेच डेंग यांनी चीनची अर्थव्यवस्था मुक्त करुन परकीय गुंतवणुकीला वाट करुन दिली, ही या दोन नेत्यांची जशी वैशिष्ट्ये ठरली आहेत, तसेच कम्युनिस्ट पक्षाची शिस्त कायम ठेवत जागतिक पातळीवरील बदल लक्षात घेत आवश्यक ते आपल्या देशात बदल करणारे व चीनला महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करणारे नेते म्हणून जिनपिंग यांच्याकडे आता पाहिले जाते. त्यांच्या काळात त्यांनी चीनचा ठसा जागतिक पातळीवर उमटविला आहे, हेच त्यांचे मोठे नेतृत्वगुण आहेत व त्यामुळेच पक्षाच्या अधिवेशनात त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सर्वोच्चपदी बसविण्यात आले आहे. कम्युनिस्ट देशात (आता चीनला कम्युनिस्ट देश म्हणावयाचे का, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो) अशा प्रकारे अनिर्बंध सत्ता एका व्यक्तीच्या हाती एकवटली जाणे, हे काही नवीन नाही. माओंच्या काळात अशीच चीनमध्ये सत्ता एकवटली होती. त्यानंतर आता चीनमध्ये तीच परिस्थिती आली आहे. सध्याच्या काळात जागतिक परिस्थितीत ही घटना लक्षणीय ठरते. आता पुढील पाच वर्षांत जिनपिंग यांचे महत्त्वाचे लक्ष हे चीनला महासत्ता करण्याच्या दृष्टीने जी पावले टाकण्यात आली आहेत, त्याला वेग देणे हेच असेल. आता त्यांना सर्व अधिकार चिनी कम्युनिस्ट पक्षाने त्यासाठीच दिले आहेत, हे विसरता कामा नये. पाच वर्षांपूर्वी 2012 साली जिनपिंग हे चीनचे अध्यक्ष झाले, तेव्हा अरब राष्ट्रांमध्ये लोकशाही चळवळीचे वारे वाहू लागले होते. युरोपमध्ये आर्थिक मंदी एकीकडे आली होती आणि त्यातच सुधारणांसाठी जनतेचा दबाव वाढत होता. आशियात भारत एक आर्थिक सत्ता म्हणून आपली ओळख निर्माण करत होता. डॉ. मनमोहनसिंग यांच्या आर्थिक धोरणाने देशात एक नवश्रीमंत व नव मध्यमवर्ग तयार झाला होता. असे असले तरीही चीनची अर्थव्यवस्थाही भारतापेक्षा मजबूत होती. स्वस्त चिनी मालांनी जगाच्या बहुतांशी बाजारपेठा काबीज केल्या होत्या. जिनपिंग यांनी सत्तेवर येताच भ्रष्टाचाराच्या विरोधात जोरदार मोहीम उघडत सुमारे 10 लाख सरकारी अधिकार्‍यांना स्थानबद्ध केले. चीनच्या राजकारणात भ्रष्टाचार हा तापदायक मुद्दा झाला होता व त्याबाबत जनतेला दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांचे ठाम मत होते. त्यांच्या या कारवाईमुळे त्यांच्या मागे सर्वसामन्य चिनी उभे राहिले. यातून जिनपिंग यांनी आपली राजकारणातील प्रतिमा उजळ केली. पक्षातील विरोधकांचा आवाज त्यामुळे आपोअप बंद झाला. यातूनच त्यांची पावले सर्व सत्ता त्यांच्याच हाती येण्याकडे चालली. गुगल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप व अन्य सोशल मीडियांना त्यांनी चीनमध्ये बंदी घातली. पाश्‍चात्य जगतातले लोकशाहीचे, व्यक्तीस्वातंत्र्याचे वारे, राजकीय विसंवादाच्या बातम्या, तेथील उदारमतवाद चिनी संस्कृतीशी मेळ खात नाही, असा दावा करत त्यांनी इंटरनेटवर निर्बंध आणण्यास सुरुवात केली. चीनमध्ये सुमारे 75 कोटी जनता इंटरनेट वापरते. या जनतेला सेन्सॉर केलेली माहिती दिली जाते, यावरुन जिनपिंग यांनी सत्तेचे पाश कसे आवळले ते लक्षात येईल. जिनपिंग यांना घरातच कम्युनिस्ट बाळकडू मिळाले होते. त्यांचे वडील हे चिनी कम्युनिस्ट पक्षात सक्रिय होते. त्यांचे वडील माओच्या क्रांतीतील एक महत्त्वाचे हिरो होते. मात्र, त्यांना काही काळ तुरुंगातही डांबण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी पक्षातले सर्व सत्तासंघर्ष व वैचारिक विसंवाद जवळून पाहिले आहेत. जिनपिंग हे महत्त्वाकांक्षी नेते आहेत. त्यांना चीनला महासत्ता करावयाची आहे व सध्याची जागतिक परिस्थिती पाहता, त्यांना ते शक्य करुन दाखविता येईल, असे दिसते. गेल्या दशकात चीनने त्या दृष्टीने पावले टाकलीदेखील आहेत. अशा स्थितीत भारताने चीनशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आपल्या या शेजार्‍याशी चांगला व्यवहार केला पाहिजे. विनाकारण ताणतणाव सीमेवर निर्माण करणे आपल्या हिताचे नाही, हे मोदी सरकारला आता पटले आहे. त्यामुळे भावी महासत्तेच्या या महानेत्याबरोबर आपण गेल्यास आपला फायदाच होणार आहे.

0 Response to "महासत्तेचा महानेता"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel