
करमणुक उद्योगातील मेगा टेकओव्हर
26 सप्टेंबरच्या मोहोरसाठी चिंतन
करमणुक उद्योगातील मेगा टेकओव्हर
देशातील करमणुकीच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी झी एन्टरटेनमेंटने आपले अस्तित्व संपविले असून या कंपनीचा ताबा आता जपानची कंपनी सोनीने घेतला आहे. झीचे प्रवर्तक सुभाषचंद्र यानी शून्यातून उभारलेली ही कंपनी आता दुसऱ्या कंपनीच्या ताब्यात गेली आहे. गोयल हे त्यांच्या तरुणपणाच्या काळात गव्हाचे व्यापारी होते व त्यातून ते पुढे माध्यमसम्राटाच्या स्तराला पोहोचले. भारताचे रुपर्ट मरडॉक झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांची उद्योजकीय कारकिर्द बहरत असताना त्यांची राजकीय इर्षाही सत्तेच्या दिशेने गेली. सुरुवातीच्या काळात कॉँग्रेसचे पदाधिकारी ते नंतर भाजपाचे खासदार अशी त्यांची राजकीय वाटचाल झाली आहे. गेले काही महिने असे काही होणार याची लक्षणे दिसू लागली होती. कारण झीच्या डोक्यावर अनेक कर्जाचे डोंगर झाले होते व त्यांनी त्याची मूळ रक्कम व व्याज न दिल्याने अनेक वित्तसंस्था, म्युच्युअल फंड धोक्यात येण्याची शक्यता होती. अशीही अफवा गेले काही महिने जोरात होती की, सध्या भाजपाचे राज्यसभेचे खासदार असलेले सुभषचंद्र गोयल हे विजय मल्यांच्या मार्गाने जाणार आहेत. परंतु त्यांनी यातून पर्याय शोधला असावा व सोनीच्या गळ्यात ही कंपनी घालून दगडाखालून आपले हात काढून घेतले आहेत. अर्थात त्यांना याची किंमत मोजावी लागली आहे. कारण एकेकाळी आपण स्थापन केलेल्या कंपनीतील त्यांचा भांडवली वाटा आता जेमतेम चार टक्क्यांवर आला आहे. कंपनीवर सर्व नियंत्रण संपुष्टात आले आहेच. एकूणच सर्व नामुष्की वाट्याला आली आहे. हेच सुभाषचंद्र गोयल आपल्या चॅनेल्सवरुन अनेकांना उद्योजकतेचे व व्यवस्थापन कौशल्याचे धडे देत होते. जगाला असे ज्ञान पाजळत असताना झीमध्ये काय शिजते आहे त्याचा त्यांना पत्ता लागू नये याचे आश्चर्य वाटते. खासगी उद्योजकतेचे कौतुक करीत असताना आपम तेथील गैरव्यवहारही पाहिले पाहिजेत. खासगी उद्योग म्हणजे सर्व काही उत्कृष्ट असे समजण्याचे कारण नाही. कारण झी जर डुबली असती तर त्यात लाखो लोक आपले पैसे गमावून बसले असते ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे गोयल यांनी आपल्यावरील नामुष्की टाळण्यासाठी अखेर झी चा ताबा सोडला असे म्हणावे लागेल. मात्र असे असले तरीही गोयल यांच्या उद्योजकीय कौशल्याचे कौतुकच करावे लागेल. कारण ज्यावेळी करमणूक क्षेत्रात फारसा कोणाला रस वाटत नव्हता व यात किती मोठा व्यवयाय दडलेला आहे याचा अंदाज कुणालाच नव्हता त्यावेळी सुभाषचंद्र यांनी यावेळी या क्षेत्रात पाऊल टाकले व आपला उद्योग यशस्वी करुन दाखविला. दूरदर्शनची एकेकाळी असलेली मक्तेदारी सुभाषचंद्र यांच्या प्रवेशाने सुंपुष्टात आली. करमणूक उद्योगाचे सर्वच चित्र यातून पालटण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वी दूरदर्शनच्या मक्तेदारीमुळे करमणूक क्षेत्र हे फारच मर्यादीत स्वरुपात राहिले होते. त्याचबरोबर करमणूकीकडे उद्योग म्हणून पाहिले जात नव्हते. झीच्या प्रवेशामुळे करमणूक क्षेत्राकडे पाहाण्याचा पूर्णच दृष्टीकोन बदलून गेला. आजवर बातम्यांच्या क्षेत्रात सरकारी प्रसार माध्यमांची मक्तेदारी होती, ती मोडीत निघून खासगी वाहिन्या बातम्या देऊ लागल्या. त्यात देखील खासगी वाहिनी म्हणून झीने आघाडी घेतली. त्यातून हळूहळू अन्य कंपन्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आणि जीवघेणी स्पर्धा सुरु झाली. मात्र प्रथम प्रवेश केल्याने झीला विशेष काही फायदा झाला. गेल्या तीन दशकात झीने आपले या क्षेत्रात स्थान बळकट केले. विविध चॅनेल्सची मालिकाच आपल्या ताफ्यात समाविष्ट केल्या. केवळ भारतातच नव्हे तर जगातील प्रेक्षकांपर्यंत झी पोहोचले. यात सुभाषचंद्र यांचे कौशल्य कामी आले. परंतु काळाच्या ओघात निर्माण झालेली वाढती स्पर्धा व कंपनीतील आर्थिक गैरव्यवस्थापन याचा कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम होऊ लागला होता. आपल्या चॅनेल्सच्या पसाऱ्याचा फायदा घेत योगल यांनी भाजपाची खासदारीकीही आपल्या गळ्यात घालून घेतली. गेल्या काही वर्षात विविध आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी अनेक उपाय योजले होते. त्यात ऑगस्ट २०१६ साली टेन स्पोर्टस हे चॅनेल दोन हजार कोटीला सोनीला विकले होते. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांनी आपला कंपनीतील वाटा विकण्याची तयारी दाखविली होती. त्यानुसार एका विदेशी गुंतवणूकदाराला त्यांनी ११ टक्के वाटा विकून ४२२४ कोटी रुपये जुलै २०१९ मध्ये उभारले होते. आता त्यांच्याकडे जेमतेम चार टक्केच समभाग शिल्लक राहिले होते. आता सोनी व झी यांच्या विलीनीकरणातून स्थापन होणाऱ्या नवीन कंपनीत झीचे चार टक्के वाटा असले व नजीकच्या काळात त्यांना २० टक्क्यापर्यंत हा भांडवली वाटा वाढविण्याचा पर्याय खुला असेल. या विलनीकरणातून १३,४५२ कोटी उलाढाल असणारी एक नवीन कंपनी स्थापन होणार आहे. या नवीन कंपनीकडे ४६०० कर्मचाऱ्यांचा ताफा असेल. आता भांडवली पुर्नरचना करताना सोनी ही जपानी महाकाय कंपनी नव्याने भांवली गुंतवणूक करणार आहे. अर्थात आता झीच्या समभागधारकांची याला संमंती घ्यावी लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सोनीचा या कंपनीवर ताबा येईल आणि झीचे अस्तित्व संपुष्टात येईल. आता झी ब्रँडनेच सध्याची चॅनेल्स काम करतील की सोनीच्या बँनरखाली येतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. झी कडील ४९ चॅनेल्स व सोनीकडील सध्याची २६ चॅनेल्स अशी एकूण ७५ चॅनेल्स आता एकाच कंपनीच्या अखत्यारीत येतील. या व्यवहारामुळे आपल्याकडील करमणूक उद्योगातील प्रामुख्याने चॅनेल्स उद्योगात आता केंद्रीकरणाची प्रक्रिया सुरु झाली आहे असे म्हणता येईल. सध्या चॅनेल्स प्रामुख्याने बातम्यांच्या चॅनेल्समध्ये अंबांनींचा ७० टक्के वाटा आहे. त्यामुळे नजिकच्या काळात देशातील भाडवलदार व विदेशी कंपन्या यांच्यात करमणूक क्षे६तील स्पर्धा रंगणार आहे. यातील बातम्यांच्या चॅनेल्सकडून जास्त पैसा येत नाही, त्याउलट करमणूक चॅनेल्सही पैसा कमवून देतात असा आजवरचा अनुभव आहे. पुढील काही वर्षात या उद्योगातील विलीनीकरणाची प्रक्रिया वेग घेईल असे दिसते. झी-सोनी हे त्यातील पहिले मेगा डिल ठरेल.
0 Response to "करमणुक उद्योगातील मेगा टेकओव्हर"
टिप्पणी पोस्ट करा