-->
शाळा सुरु होताना...

शाळा सुरु होताना...

03 ऑक्टोबरच्या मोहोरसाठी चिंतन
शाळा सुरु होताना... उद्यापासून राज्यातील सर्व शाळा म्हणजे आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु होत आहेत. जवळपास अठरा महिन्यांना शाळा सुरु होत असल्याने संस्थाचालक व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यापुढे अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत. यापूर्वी काही संस्थांनी दहावीचे वर्ग सुरु केले होते, प्रामुख्याने दुसरी लाट ओसरत आल्यावर शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु सर्वत्रच तो यशस्वी झाला नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे शाळेत जाण्यासाठी पालकांची संमंती त्यावेळी गरजेची होती, आताही ती आवश्यक आहे. पालकांच्या मनात त्यावेळी शंका व भिती होती. आजही ती कायम आहे, परंतु मुलांना किती काळ अशा प्रकारे घरी बसवणार अशी त्यांच्या मनात शंका घर करुन आहे. परंतु आता बहुतांश पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार होतील असे दिसते. दुसरी लाट ही आपल्याकडे फारच त्रासदायक होती. त्याची व्याप्ती तर जास्त होतीच शिवाय मनुष्यहानीही तेवढीच जास्त होती. आता लसीकरण वाढल्याने तिसरी लाट मर्यादीत असेल किंवा लाट आलीच तर फारसे नुकसान करणारी नसेल असे चित्र दिसते आहे. ही सर्वात समाधानाची बाब म्हटली पाहिजे. आपल्याकडे धार्मिक स्थळे सुरु करण्यासाठी राजकीय पक्षांनी आंदोलने केली परंतु शिक्षणसंस्था सुरु करण्यासाठी कोणत्याच राजकीय पक्षांनी आग्रह धरलेला नाही. आपल्याकडे धर्माच्या नावावर लोकांना फितविता येते त्यातुलनेत शिक्षणसंस्था सुरु करण्याची मागणी केल्यास त्याचा फारसा काही राजकीय फायदा होणार नाही अशी समजूत त्यांची आहे. त्यामुळे आपल्याकडे कोरनाचा असो किंवा कोरोनाच्या अगोदरच्या काळात शिक्षणाकडे कसे दुर्लक्ष होते हेच यावरुन दिसते. शिक्षण हा देशाच्या तरुण पिढीला घडविण्याचा व उत्तम नागरिक बनविण्याचा मार्ग आहे, परंतु आपल्याकडील राज्यकर्ते असोत किंवा विरोधी पक्ष त्यांना याचे महत्व काही पटलेले नाही. अर्थात हे आपले दुर्दैव म्हटले पाहिजे. शाळा सुरु कराव्यात यासाठी गेले दोन महिने शिक्षणतज्ज्ञ व डॉक्टरही आपली मते आग्रहपूर्वक मांडत होते. विदेशात गेल्या दोन महिन्यात शाळा सुरु झाल्या आहेत. तेथे त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची आठवड्यातून दोनचा कोरोना चाचणी केली जाते. तसेच महत्वाचे म्हणजे विदेशातील बहुतांशी शाळांमध्ये वीसपेक्षा जास्त मुले एका वर्गात नसतात. आपल्याकडे मात्र तसे चित्र नसते. प्रत्येक वर्गात किमान ५० मुले असतात, अशा स्थितीत एकालाही कोरोनाची लागण झाल्यास त्याची अन्य मुलांना लागण होण्याचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर आपल्याकडील मुलांची संख्या पाहता प्रत्येकाची आठवड्यातून एकदा जरी चाचणी करणे म्हटले तरी ते फार खर्चिक काम होणार आहे. त्यामुळे सरकारने घाई न करता शाळा सुरु करताना धीमेगतीने पावली टाकली. यात सरकारचे काही चुकले असे निश्चित नाही. शेवटी घाईघाईने निर्णय घेतल्यास त्याची जबाबदारी सरकारलाच घ्यावयाची आहे. आता समाधानाची बाब म्हणजे मुंबईसारख्या महानगरात लस घेतलेल्यांसाठीच लोकल सेवा सुरु होऊनही एक महिन्याहून जास्त काळ लोटल्यावरही कोरोनाचा संसंर्ग वाढलेला नाही. मात्र कोरोना अजून पूर्णत: संपलेला नाही हे लक्षात घेऊन आपल्याला अजून काही काळ वावरावे लागणार आहे. प्रामुख्याने शाळा सुरु करताना सरकारने पालकांची परवानगी, एका बाकावर एकच विद्यार्थी, एक दिवसाआड शाळा ही सर्व बांधने पाळतच शाळा सुरु करावयाची आहे. सरकारने जाहीर केलेली ही नियमावली आपल्याला काटेकोरपणे पाळावी लागणार आहे. पालकांना अजूनही आपल्या मुलांना शाळेत पाठविणे धोक्याचे वाटू शकते. कारण कोरोना संपलेला नाही व मुलांना लागण होण्याचा धोकाही तेवढाच जास्त आहे. त्यामुळे संस्था चालकांवर शाळेत वारंवार सॅनिटायझिंग करण्याची मोठी जबाबदारी आहे. शाळेचे वर्ग प्रदीर्घ काळ बंद राहिल्याने तेथे काही प्रमाणात डागडुजी करावी लागणार आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण जेमतेम ७० टक्केच झाले आहे. ते तातडीने शंभर टक्के होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ज्या शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही त्यांना शाळेत प्रवेश बंद केला पाहिजे. त्यामुळे त्यांचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत काही प्रमाणात शिक्षकांची टंचाईही जाणवू शकते. पालकांपुढे जसे मुलांना शाळेत पाठविण्याविषयी मोठे प्रश्नचिन्ह आहे तसेच मुलांपुढेही पुन्हा शाळेला सामोरे जाताना अनेक नवीन आव्हाने वाढून ठेवली आहेत. ज्यांची शाळा ऑनलाईन होत होती त्यांना काही प्रमाणात का होईना अभ्यास करण्याचा सराव होता. परंतु अशी अनेक मुले आहेत ज्यांनी गेल्या वीस महिन्यांत अभ्यासाला पूर्णपणे दांडी मारलेली आहे. त्यांना पुन्हा अभ्यासाच्या प्रवाहात येणे फार अवघड जाणार आहे. त्यांच्याकडून अभ्यास करवून घेणे ही शिक्षकांची मोठी कसोटी असेल. शिक्षकांचेही तसेच असेल. त्यांनाही पूर्वीच्या रुटीनला लागणे फार अवघड जाणार आहे. मे महिन्यांची सुट्टी संपून शाळेत आल्यावर मुले व शिक्षक ज्याप्रकारे ढेपाळलेले असतात, त्याच्या कित्येक पट जास्त आता शिक्षक व विद्यार्थीही सुस्त झालेले आहेत. तसेच विशेष मुलांचे तर प्रश्न फार वेगळे आहेत. त्यांना एवढ्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेत जाताना फारच कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यातील अनेकांना अ, ब, क, ड,ई पासून सुरुवात करावी लागणार आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे अनेक मुले शाळाबाह्य झाली आहेत. कोरोनापूर्वी शाळाबाह्य असलेल्या व आताच्या मुलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणावे लागणार आहे. कोरोनामुळे सर्वांचेच जीवन अस्त्यावस्थ झालेले आहे, त्याला आता गती देण्याची गरज आहे. कुठेतरी त्याची सुरुवात आता करावी लागणार आहे. शाळा सुरु झाल्यावर दोन महिन्यांनी परिणामांचा नेमका अंदाज येऊ शकतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पहिलीपासून शाळा सुरु करण्याचा विचार होऊ शकतो. गेल्या शतकात एवढे प्रदीर्घ काळ शाळा बंद राहिली नव्हती. त्यामुळे आता शाळांचे पूर्वीसारखे रुटीन सुरु होणे ही सोपी बाब नाही. सरकारने सावध पण ठोस पाऊल टाकले आहे, आता संस्थाचालक, शिक्षक, पालक व विद्यार्थांना कंबर कसावी लागणार आहे.

0 Response to "शाळा सुरु होताना..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel