-->
शिक्षकांचा कौल; वेगळ्या राजकारणाची नांदी

शिक्षकांचा कौल; वेगळ्या राजकारणाची नांदी

रविवार दि. 12 फेब्रुवारी 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
शिक्षकांचा कौल; वेगळ्या राजकारणाची नांदी
----------------------------------
एन्ट्रो- शिक्षणाचा या सरकारने व्यवसाय केल्याने शिक्षण हे व्रत न ठरता तो एक पैसा कमविण्याचा धंदा झाला आहे, ही सर्वात दुदैवी बाब आहे. यात शिक्षकही भरडला गेला आहे. त्यांच्या आजवर असलेले सुरक्षित नोकरीचे कवच केव्हाच निघून गेलेे. शिक्षणसेवक अशा नावाखाली शिक्षकांचीही पिळवणूक होत आहे. अशा प्रकारे पिचला गेलेला व पिळल्या गेलेल्या शिक्षकाकडून चांगल्या ज्ञानदानाची अपेक्षा ठेवणेच चुकीचे ठरेल. मात्र हे असेच चालू ठेवणेे म्हणजे आपण आपली भावी पिढी बरबाद करणे. त्याचबरोबर ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातील स्वच्छता करणे व शिक्षणासाठी नवीन धोरण आखणे ही काळाची गरज आहे. याची कळकळ शिक्षकांना होती व त्यातूनच त्यांनी आपले हे धोरण आक्रमकपणे विधीमंडळात मांडणारा नेता निवडला. यातून आमदार बाळाराम पाटील यांच्यावर दाखविलेला विश्‍वास फार मोलाचा व महत्वाचा आहे. बाळाराम पाटील यांनी आजवर शेकापसाठी केलेले विविध पातळीवरील काम, जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा त्यांचा अनुभव, त्यांच्या घरात असलेला आमदारकीचा वारसा हे सर्व पाहता ते शिक्षकांच्या व राज्यातील शिक्षण क्षेत्रातील आशा-अपेक्षा पूर्ण करतील, याबाबत काही शंका नाही. त्याचबरोबर पुरोगामी शिक्षक आघाडीस एक मोठे बळ प्राप्त झाले आहे...
--------------------------------------------------
कोकण विभागातील शिक्षक मतदारसंघात शिक्षकांनी दिलेला कौल पाहता राज्यातील एका वेगळ्या राजकारणाची ही नांदी ठरु शकते. जवळपास तीन दशके शिक्षक परिषदेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ पुन्हा एकदा पुरोगामी शक्तींनी आपल्या ताब्यात खेचून आणला ही राज्यातील एक महत्वाची राजकीय घटना ठरावी. शिक्षकांनी नवीन पिढ्या तयार केल्या. आता हेच शिक्षक आपली मागची कवचकुंडले टाकून नव्याने उभे राहिले आहेत. शिक्षण हा एक आता व्यापार झाला आहे. ज्यावेळी या मतदारसंघातून शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून तात्या सुळे निवडून यायचे, त्यावेळची राजकीय, सामाजिक व आर्थिक स्थिती वेगळी होती. आता शिक्षणक्षेत्राला अनेक वाईट वाईट गोष्टींनी ग्रासले आहे. त्यातच सरकारी धोरण हे गरीबांच्या व श्रमीकांच्या मुलांच्या बाजुचे नाही. शिक्षणाचा या सरकारने व्यवसाय केल्याने शिक्षण हे व्रत न ठरता तो एक पैसा कमविण्याचा धंदा झाला आहे, ही सर्वात दुदैवी बाब आहे. यात शिक्षकही भरडला गेला आहे. त्यांच्या आजवर असलेले सुरक्षित नोकरीचे कवच केव्हाच निघून गेले आहे. शिक्षणसेवक अशा नावाखाली शिक्षकांचीही पिळवणूक होत आहे. अशा प्रकारे पिचला गेलेला व पिळल्या गेलेल्या शिक्षकाकडून चांगल्या ज्ञानदानाची अपेक्षा ठेवणेच चुकीचे ठरेल. मात्र हे असेच चालू ठेवणेे म्हणजे आपण आपली भावी पिढी बरबाद करणे. त्याचबरोबर ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातील स्वच्छता करणे व शिक्षणासाठी नवीन धोरण आखणे ही काळाची गरज आहे. याची कळकळ शिक्षकांना होती व त्यातूनच त्यांनी आपले हे धोरण आक्रमकपणे विधीमंडळात मांडणारा नेता निवडला. त्यामुळेच आमदार बाळाराम पाटील यांच्यावर दाखविलेला विश्‍वास फार मोलाचा व महत्वाचा आहे. बाळाराम पाटील यांनी आजवर शेकापसाठी केलेले विविध पातळीवरील काम, जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा त्यांचा अनुभव, त्यांच्या घरात असलेला आमदारकीचा वारसा हे सर्व पाहता ते शिक्षकांच्या व राज्यातील शिक्षण क्षेत्रातील आशा-अपेक्षा पूर्ण करतील, याबाबत काही शंका नाही. त्याचबरोबर पुरोगामी शिक्षक आघाडीस एक मोठे बळ प्राप्त झाले आहे. या निमित्ताने राज्यात पुरोगामी विचारांशी बांधीलकी असणारी एक नवी राजकीय फळी उभी राहात आहे. शेकाप, राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस या समविचारी, सर्वधर्मसमभाव मानणार्‍या पक्षांचे एक नवीन व्यासपीठ तयार होत आहे. बाळाराम पाटील यांच्या विजयामुळे या व्यापीठाला एक बळकटी आली आहे. या आघाडीत समविचारी पक्ष सामिल होतील व जातीयवादी पक्षांचा विरोध करण्यासाठी सज्ज होतील अशी आशा व्यक्त करण्यास काहीच हरकत नाही. नवनिर्वाचित आमदार बाळाराम पाटील यांचे वडील दत्तूशेठ पाटील यांनी पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली. लोकसेवेचा वारसा बाळाराम पाटील यांना आपल्या वडिलांकडून मिळाला आहे. त्यांचे वडिल हे तीन वेळा आमदार होते. रायगड जिल्हा हा शेकापचा गेली पाच दशकाहून जास्त काळ बालेकिल्ला आहे. पुरोगामी शक्ती या पक्षाने जोपासल्या व प्रवाहाच्या विरोधात जाऊन नेहमी लढाई केली. कामगार,कष्टकरी, शेतकरी यांच्या बाजूने नेहमीच लढा दिला. हा लढा देत असताना विकासाची कास काही सोडली नाही.  शेकापमधून काही नेते अन्य पक्षात गेले, मात्र त्यातील काही मोजकेच राजकारणात टिकले, अन्य नेते आपले पुढारीपण काही टिकवू शकले नाहीत. मात्र ज्यांनी शेकापची कास सोडली नाही त्यांचा मात्र राजकीयदृष्टया फायदा झाला. पक्षात त्यांना विविध पदे उपभोगता आली, अनेक मानाची पदे मिळाली. यातील एक बिनीचे शिलेदार बाळाराम पाटील होते. त्यांचा दोन वेला विधानसभेला निसटता पराभव झाला असला तरी त्यांनी आपली काही हार मानली नाही. राजकारण सोडले नाही किंवा पक्षही सोडला नाही. कारण त्यांच्यामागे वैचारिक बैठक होती. शरद पवार यांनी देखील त्यासाठीच त्यांची या मतदारसंघातून निवड केली व दीड वर्षापासून हा मतदारसंघ बांधण्यास सुरुवात झाली. गुजरातच्या किनार्‍यापासून ते गोव्याच्या वेशीपर्यंत तब्बल पाच जिल्ह्यातून जाणारा हा शिक्षकांचा मतदारसंघ पिंजून काढणे व प्रत्येकाशी संवाद साधने ही काही सोपी बाब नव्हती. मात्र शेकाप, राष्ट्रवादी व कॉग्रेस या तिघांनी आपली पक्षाची कुमक पूर्णपणेे राबविली व हा विजय खेचला. सत्ताधार्‍यांना एक मोठा धोबीपछाडच दिला. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या आपल्या भूमीतील राजकारण बदलण्याचा जो घाट सत्ताधार्‍यांनी घातला आहे त्याला वेसण घालण्याचे काम पुरोगामी शिक्षक आघाडीने केले आहे. सरकारच्या या धोरणामुळे समाजातील तळागातील लोकांना शिक्षण घेणे कठीण जात आहे. अशावेळी बहुजनांच्या प्रश्‍नांची दखल घेऊन राजकारण करण्याची हीच योग्य वेळ आली आहे, असे शिक्षकांना पटले व त्यातून त्यांनी आपला कौल दिला आहे. यातून भविष्यातील एका वेगळ्या राजकारणाची नांदी झाली आहे, असे म्हणता येईल.
-------------------------------------------------------------------------------------------

0 Response to "शिक्षकांचा कौल; वेगळ्या राजकारणाची नांदी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel