
तेल दरवाढीचे चटके
13 मे गुरुवारच्या अंकासाठी अग्रलेख
तेल दरवाढीचे चटके
कोरोनाने संपूर्ण देशाला पुन्हा वर्षाच्या आतच विळखा घातला असताना जनता हैराण झाली आहे. आपले आप्त, मित्र, अवतीभोवतीचे लोक आपल्यातून हे जग सोडून चालल्याचे पहावे लागत असल्याने प्रत्येकाला तीव्र वेदना होत आहेत. परंतु निर्ढावलेले केंद्र सरकार मात्र फारसे काही न करता हातावर हात घेऊन बसले आहे. अशा स्थितीत मेटाकुटीला आलेल्या जनतेच्या हालात आणखी भर घातली आहे. प्रामुख्याने गेल्या काही दिवसात पेट्रोल, डिझेलच्या किमती पुन्हा एकदा चढू लागल्या आहेत. पाच राज्यातील निवडणुका सुरु असताना मात्र या किंमती वाढल्या नाहीत व आता पुन्हा वाढू लागल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे जागतिक पातळीवर गेले काही दिवस खनिज तेलाच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे सध्याच्या इंधन वाढीच्या मागे देशातील तेल कंपन्यांच्या नफेखोरीच कारणीभूत आहे. गेल्या वर्षी पहिल्या लॉकडाऊनच्या काळात जागतिक पातळीवर खनित तेलाच्या किंमती शून्यावर आल्या होत्या. परंतु त्यावेळी आपल्याकडे जादा खनिज तेल खरेदी करुन साठवणूक करण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे या घसरलेल्या किंमतीचा आपण फायदा उचलू शकलो नाही. आता खनिज तेलाच्या किंमती ६५ ते ६८ प्रति बँरलवर स्थिरावलेल्या असताना सध्याच्या काळात देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढण्याची अपेक्षाच नव्हती. परंतु पेट्रोल-डिझेलच्या किंमती जागतिक बाजारात ठरतात असे सांगून जनतेची दिशाभूल केली जाते. डॉ. मनमोहनसिंग सत्तेत असताना ज्यावेळी इंधनाच्या किंमती वाढत त्यावेळी आंदोलने करणारे नेते आज राज्यकर्ते झाले आहेत. त्यांनी तर इंधनाच्या किंमती वाढविता कामा नये होत्या, कारण त्यामुळे जनतेला दिलेल्या शब्दाचा अपमान केल्यासारखे झाले असते. परंतु निवडणुकीपूर्वी दिलेल्या मतदारांच्या आश्वासनांना सत्ता हाती आल्यावर हरताळ फासला जाणारच हे आता जनतेनेही आता गृहीत धरले आहे. त्यमुळे सध्याच्या तेलाच्या किंमतीची वाढ ही आस्मानी नसून सुल्तानी आहे हे जनतेने लक्षात ठेवावे. पाच राज्यांच्या निवडणुका सुरु असताना तेलाच्या किंमती वाढत नव्हत्या तर आता कशा वाढत आहेत, हे नेमके गौडबंगाल काय आहे, याचे सत्ताधारी उत्तर देतील काय, असा जनतेला पडलेला सवाल आहे. तेलाच्या किंमती वाढविल्यामुळे तिजोरीत भर घालण्याचे ते एक हक्काचे साधन आहे. त्यामुळे या किंमती वाढविल्या जातात व जनतेच्या थेट खिशात हात न घालता अप्रत्यक्षरित्या खिशात घातला जातो. परंतु पेट्रोल-डिझेल एकदा का वाढले की चलनवाढीला वेग येतो व त्यातून महागाई वाढतेच. डिझेलच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या घरी गाडी नसली तरी त्याला फटका सहन करावा लागतो. कारण त्यामुळे भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू आपोआपच महाग होतात. परंतु जनतेच्या हे लक्षात येत नाही. प्रत्येक वाढलेल्या किंमतीमागे डिझेलची वाढलेली किंमत कारणीभूत असते. जागतिक पातळीवरील निमित्त करुन या किंमती वाढविल्या जातात. त्यासाठी पेट्रोल-डिझेल अजूनही सरकारने जी.एस.टी.च्या अखत्यारीत आणलेले नाही. कारण तसे आणल्यास त्याची सर्वच सुत्रे बदलतील व तिजोरी भरण्याचे हक्काचे साधन संपुष्यात येईल. त्यामुळे पूर्वी जे डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार करीत होते तेच आता मोदींचे सरकार करीत आहे. त्यात काही फरक नाही. फक्त राज्यकर्ते बदलले आहेत व जनतेचा खिसा कायम आहे. ज्या आखाती देशांनी साठीनंतरच्या दशकात याच खनिज तेलाच्या जोरावर भव्यतेचे इमले बांधले, आता त्यांना खनिज तेलाचे कोसळलेले दर रसातळाला भविष्यात नेतील. अमेरिकेने आखाती देशांची तेल उत्खनातील मक्तेदारी संपविण्यासाठी जंगजंग पछाडले. त्यासाठी त्यांनी इराकशी युध्द करुन तो देश बेचिराख केला. तेथील अमेरिका विरोधक सत्ताधिश सद्दाम हुसेन याला त्यांनी संपविला. मात्र सद्दाम गेला तरी तेथील तेलाचे साठे काही अमेरिकेच्या ताब्यात आले नाहीत. गेल्या काही वर्षात अमेरिका हा जगातील सर्वात मोठी खनिज तेल उत्पादक देश झाला खरा, परंतु तेलाच्या किंमती कोसळू लागल्याने त्यांना हा मुकूट आता काटेरी वाटू लागला आहे. कोरोनाच्या काळात तर खनिज तेल उपसण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढाही वसूल होत नाही अशा विक्रमी पातळीवर किंमती घसरल्या. कोरोनाच्या वाढीनंतर खनिज तेलाच्या किंमतीला आळा बसला आणि त्याची जी घसरण सुरु झाली ती बघवेना अशा स्थितीत आली. याला आवर घालणे कुणालाही शक्य नव्हते. कधी नव्हे ती खनिज तेलाची मागणी शून्यावर येईल, ही अपेक्षा कोणालाच नव्हती. परिणामी अनेक तेल उत्पादक देशांपुढे आर्थिक संकट आले. खनिज तेलाची मागणी एवढी घटेल असा कुणालाच कधी अंदाज आला नव्हता. परंतु कोरोनाने सर्वांनाच डाल आटे का भाव समजाविले. आपल्याकडे खनिज तेलाची मागणी अजून काही मोठ्या झपाट्याने वाढलेली नाही. सध्या देशातील बहुतांशी भागात लॉकडाऊन असल्यामुळे तेलाची मागणी मार्यादीतच आहे. परंतु भविष्यात ही मागणी वाढत जाईल. मात्र त्याअगोदरच सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवायला सुरुवात करुन लोकांच्या खिशात हात घातला आहे. एक तर कोरोनामुळे अनेक जण हैराण झाले आहेत त्यात अशा प्रकारे महागाईला चालना देणारे निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण होणार आहे.
0 Response to "तेल दरवाढीचे चटके"
टिप्पणी पोस्ट करा