-->
प्रतिगामी मास्टरमाईंड संपवा

प्रतिगामी मास्टरमाईंड संपवा

संपादकीय पान बुधवार दि. २३ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
प्रतिगामी मास्टरमाईंड संपवा
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील कट कारस्थान कुणाचे आहे ते आता हळूहळू उलगू लागले आहे. पोलिसांनी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला अटक केल्यावर खरे तर आश्‍चर्य वाटण्याची गरज नव्हती. कारण पानसरे यांच्यासारख्या सद्गृहस्थांची हत्या ही काही गुन्हेगारी कृत्यातून झालेली नाही तर ती राजकीयच होती हे स्पष्टच होते. त्यामुळे पानसरे यांच्या विचारसारणीच्या विरोधातीलच लोकांनीच त्यांच्या हत्येचा कट रचला हे स्पष्टच होते. अर्थातच त्यामुळे सनातन संस्थेच्या दिशेने अनेकांची बोटे रोखली गेली होती. परंतु यासंबंधीचे आरोप करण्यापेक्षा काही पुरावे जमविल्यावरच असे आरोप करणे योग्य ठरते त्यामुळे सनातन संस्थेवर आजवर थेट आरोप झाला नव्हता. अर्थात २००६ साली गोव्यातील मडगाव येथील बॉम्बस्फोटातील आरोपी व अद्याप फरार असलेल्या रुद्र पाटील याच्या दिशेने तपास सध्या सुरु आहे. समीर गायकवाड याला अटक झाल्यावर त्याच्या चौकशीतून अनेक नावे पुढे आली आहेत. त्यात रुद्र पाटीलचे नाव पुढे आले. पानसरे यांची हत्या नेमकी कोणी केली हे अजूनही स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांच्या हाती जे धागे लागले आहेत ते पाहता सनातन संस्थेचे साधक यात सहभागी आहेत. गेल्या काही वर्षात आपल्याकडील सामाजिक चित्र झपाट्याने पालटले आहे. आपले विचार हे दुसर्‍याचे विचार यात मतभिन्नता असू शकते व प्रत्येकाला आपला विचार जपण्याचे स्वातंत्र आहे, हे विसरत चालले आहे. आपला धर्मच हा श्रेष्ठ अशी सर्वच धर्मियांतील कट्टरवाद्यांमध्ये भावना निर्माण झाली आहे. यातून एकमेकांच्या धर्मावर सुडाने टीका करणे हे आलेच. त्यातच पानसरे यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंतांनी नेहमीच अशा प्रकारच्या कट्टरतेचा, धार्मिक तेढीचा, अंधश्रध्देविरुध्द आवाज उठविला आहे. यातून त्यांनी महाराष्ट्राला कसे पुरोगामी करता येईल हेच नेमही लक्षात घेतले. गेल्या दोन वर्षात झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे व कलबुट्टी यांच्या हत्या या हेच सांगतात. विचारांचा लढा विचाराने करण्याचे दिवस आता संपले आहेत, विचारांचा लढा करताना रक्त हे सांडलेच पाहिजे असे सांगणारा आता महाराष्ट्र घडत आहे असे या हत्यांवरुन दिसते. त्यातच आता संघाची अनधिकृत राजकीय शाखा असलेला भाजपा सत्तेत असल्यामुळे हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांना आणखीनच बळ आले आहे. गोव्यात भाजपाची सत्ता असतानाच सनातनचा पाया मजबूत होत गेला, सत्तेच्या आसर्‍याखाली या संघटना वाढत गेल्या हे सागंण्यासाठी कुणी संशोधकाची गरज नाही. मुस्लिम अतिरेकी जर बॉम्बस्फोट करतात तर मग हिंदुत्ववादी संघटना यात मागे का, असा सवाल त्यांच्याकडून खासगीत केला जातो. त्यामुळे आता देखील सनातनच्या विरोधात पुरावे उभे करताना पोलिस दलाला बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागणार यात काही शंका नाही. बलवान हिंदुत्ववादी संघटनांपर्यंत पानसरे-दाभोलकर खुनाचे धागे पोहोचले तर पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा बाळगू नये. मात्र, केवळ संशयापोटी कारवाई नाही तर ठोस पुरावे जमवूनच कारवाई करणे गरजेचे आहे. मालेेगाव बॉम्बस्फोटाबाबत जबाबदार ठरवून अटक झालेल्यांवर अद्याप आरोपपत्र दाखल झालेले नाही. कित्येक वर्षे उलटली तरी आरोपपत्रच दाखल होत नसल्यामुळे कर्नल पुरोहित व अन्य जणांना उगाच डांबले आहे काय, अशी शंका जनतेच्या मनात येते. अशी शंका उत्पन्न होणे समाजहितासाठी घातक आहे हेे लक्षात घेऊन पोलिसांनी काम करावे. सनातननेही गायकवाडच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार प्रगट केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सनातन संस्थेच्या ध्येयधोरणात हिंसेला कोणते स्थान आहे हे स्पष्टपणे जाहीरपणाने समजणे अत्यावश्यक आहे. संशयाची सुई उगीच दिशा दाखवत नाही. काही तरी पाणी मुरत असतेच. हिंसक प्रतिक्रिया देण्याची प्रेरणा सनातनच्या कामातून मिळत असेल तर आपल्या कामाचा चालकांनी पुनर्विचार केला पाहिजे. हिंदू विचारसरणीत हिंसा समर्थनीय नाही. संघर्षापेेक्षा सामावून घेण्यास या विचारसरणीत प्राधान्य आहे. अगदी गीतेमध्येही हिंसा मान्य केलेली नाही. हिंदू जीवनपद्धतीचा खरा अर्थ टिळक, गांधी, अरविंद व रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांत आहे. ते विचार या भूमीशी एकरूप झालेले आहेत, म्हणून चिरस्थायी वा सनातन आहेत. हे विचार कर्मकांडाला त्याज्य ठरवणारे, म्हणून पुरोगामीही आहेत. मोकळेपणे विचार करणार्‍यांना हिंदू तत्त्वज्ञानाइतके पुरोगामी तत्त्वज्ञान कोठेही सापडणार नाही. परंतु आपण आता यापासून दूर चाललो आहोत. संत तुकडोजी महाराज असोत वा गाडगेबाबा असोत यांनी समाजातील अंधकार दूर करण्यासाठी आपले आयुष्य झटले. त्यांच्यावर अनेकदा टीका झाली, कारण त्यांचे पुरोगामी विचार परंपरावाद्यांना पटणारे नव्हते. परंतु त्याकाळी त्यांच्या विचारांना संपविण्यासाठी त्यांची कुणी हत्या केली नाही. परंतु आता विचार संपविण्यासाठी दाभोलकर-पानसरे-कुलबर्गी यांची हत्या झाली आहे. यामागचा मास्टरमाईंड कुणी व्यक्ती असेलही परंतु त्यापेक्षा या विचारांचा मास्टरमाईंड आता संपविण्याची जबाबदारी या पुरोगामी राज्यावर आली आहे.
---------------------------------------------------------------------

0 Response to "प्रतिगामी मास्टरमाईंड संपवा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel