-->
आपत्तीचा सराव

आपत्तीचा सराव

गुरुवार दि. 06 सप्टेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
आपत्तीचा सराव
आपत्ती कधी व कुठे कोणत्या क्षणी येईल हे सांगता येत नाही. आपत्ती मग ती अतिवृष्टीमुळे असेल किंवा भूकंप झाल्याने, दडकी कोसळल्याने येईल किंवा चक्रिवादळानेही येऊ शकते. पुण्याजवळचे माळीण गाव तर पूर्णपणे ढगफुटीच्या संकटामुळे रातोरात गाढले गेले होते. मुंबईत आलेला 2006 सालचा महापूर किंवा नुकताच आलेला केरळमधील महापूर या आपत्त्या आपल्याला आता काही नवीन नाहीत. परंतु या आपत्तीवर आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मात करु शकतो. यात कमीत कमी नुकसान व शून्य मनुष्यहानी कशी होऊ शकेल त्याचे आपण नियोजन करु शकतो. महाडजवळ सावित्री नदीवरील शंभर वर्षे जूना झालेला पूल वाहून गेल्याने झालेली आपत्ती ही अलिकडची आपल्या जिल्ह्यातील स्मरणात राहाणारी घटना. अशा सर्वच प्रकारच्या आपत्या आपण टाळू शकतो. आपत्ती आल्यास त्यावर कोणते उपाय योजावयाचे याची माहिती प्रत्येकाला असली पाहिजे. यासंबंधी मुंबईत नुकत्याच लागलेल्या बहुमजली इमारतीच्या आगीत एका बारा वर्षीने शालेय मुलीने आपल्या घरातील व शेजार्‍यांना ओला फडका बांधून बाहेर पडण्यास सांगितल्याने सुमारे दहा जणाचे प्राण वाचले. हा उपाय तिला शाळेतील शिक्षिकेने सांगितला होता. परंतु प्रसंगावधान ओळखून तिने त्याचा त्यावेळी योग्य सल्ला लोकांना दिला, त्याबद्दल तिचे कौतुक मुंबई महानगरपालिकेनेही केले. अशा प्रकारे अनेक बारिकसारिक उपाययोजना आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या मदतगार ठरतात. रायगड जिल्ह्यातील बोर्ली मांडला या गावात नुकतेच आपत्ती विषयक सराव अभियान झाले. संपूर्ण गाव त्यात सहभागी झाले होते. एक वेगळाच अनुभव गावकर्‍यांसाठी होता. त्यातून त्यांचे चांगले प्रशिक्षण झाले. अशा प्रकारचा सराव केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले पाहिजेत. राष्ट्रीय आपत्ती व्यस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली व भारतीय राष्ट्रीय समुद्रीय माहिती सेवा केंद्र, हैदराबाद या संस्थेकडे जगभरातील भूकंप, तसेच सागरी हालचालींच्या निरीक्षणाची सोय आहे. या निरीक्षणातील नोंदीवरुन येथे संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा अंदाज बांधता येतो. त्या अनुषंगाने या संस्थेच्या मागदर्शनाखाली पश्‍चिम किनार्‍यावरील सर्व राज्यामध्ये त्सुनामी विषयक रंगीत तालीम केली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर मंगळवारी पश्‍चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यात हे सराव सत्र राबविण्यात आले. त्यात रायगड जिल्ह्यातील बोर्ली मांडला या गावाचा समावेश होता. बोर्ली मांडला हे गाव यासाठी निवडण्यासाठी विशेष कारण होते. हे गाव समुद्रसपाटीपासून सर्वात खोल आहे. ज्यावेळी समुद्राच्या लाटांची उंची वाढते त्यावेळी या गावात मोठ्या लाटांचा तडाखा बसतो. सरकारच्या यादीत हे गाव सर्वाधिक प्रवण गाव ठरु शकणारे आहे. त्यामुळे अशा या गावात आपत्ती निवारणाच्या सरावाची नितांत आवश्यकता होती. या सरावानुसार, हैदराबाद येथील संस्थेतून सकाळी अकरा वाजता त्सुनामी संदर्भात पहिला संदेश हा मंत्रालयातील नियंत्रण कक्षात आला तेथून त्या संदेशाचे वाचन होऊन हा संदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात तेथून मुरूड तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षात तेथून मांडला येथील नियंत्रण कक्षात हा संदेश पोहोचला. त्यानंतर बोर्ली गावात भोंगा वाजविला गेला आणि स्वयंसेवकांमार्फत सूचना दिली गेली. अशा प्रकारचे दिवसभरात पंधरा संदेश प्राप्त झाले. यावेळी स्थलांतर झालेल्या नागरिक,जनावर यांची नोंद केली गेली. त्याचप्रमाणे या ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. त्याचप्रमाणे जनावराचे लसीकरण केले गेले. भूकंप, महापूर, चक्रीवादळ अतिवृष्टि ह्या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडणार्‍या असून अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती जोखीम व्यवस्थापनाअंतर्गत विभागीय व जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. सरावाच्यानुसार, किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन समुद्रकिनार्‍यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर गावातील सर्व नागरिकांना आवाहन करुन गाव खाली करण्यात आले. त्यांना सुरक्षित स्थळी म्हणजेच शासकीय गोदाम मांडला येथे स्थलांतरीत करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडला येथे वैद्यकीय तपासणी केंद्र व ग्रामपंचायत मांडला येथे पशुवैद्यकीय सेवा केंद्राची उभारणी करण्यात आली. बोर्ली गावातील वयोवृध्द नागरिकांना घरातून स्ट्रेचरद्वारे वाहनापर्यंत व तेथून सुरक्षितस्थळी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविल्यावर तेथे त्यांच्या निवार्‍याची सोय करण्यात आली होती. तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी, अल्पोपहार, भोजन आदी व्यवस्थेसह, वैद्यकीय तपासणी करुन उपचार सेवा देण्यात आली. त्यासाठी सागरी सुरक्षा दलाच्या बोटींचा वापर करण्यात आला. तसेच नागरिकांना आणि स्वयंसेवकाना लाईफ जॅकेट्स देण्यात आले. तसेच संपर्कासाठी अत्याधुनिक संपर्क साधनांचा वापर करण्यात आला. आपत्ती काळात खंडीत होणार्‍या वीज पुरवठा व दूरसंचार सेवा खंडीत झाल्यास पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात आल्या होत्या. तसेच रक्त संकलन केंद्रही स्थापन करण्यात आले. त्सुनामी किंवा अन्य कोणत्याही आपत्तीच्या वेळी काय करावे? याबाबतचे भान ग्रामस्थांमध्ये आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये यावे यासाठी हे सराव सत्र राबविण्यात आले. भूक नसो पण शिदोरी असो, या म्हणीप्रमाणे संकटे येऊ नयेत हे जरी खरे असले तरी संभाव्यता लक्षात घेऊन आपण सज्ज असले पाहिजे हे तितकेच खरे. बोर्ली मांडला येथे सरकारच्या वतीने केलेला हा आपत्ती निवारणाच्या या सरावाचे स्वागतच व्हावे.
-------------------------------------------------------------------------

0 Response to "आपत्तीचा सराव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel