-->
सोनियांच्या देशप्रेमावर शंका कशाला?

सोनियांच्या देशप्रेमावर शंका कशाला?

संपादकीय पान शुक्रवार दि. १३ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सोनियांच्या देशप्रेमावर शंका कशाला?
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण शेवटच्या  श्‍वासापर्यंत भारतीयच म्हणून याच देशात जगणार असून माझ्या अस्थी याच मातीत विलीन होऊ असे भावूक विधान केले आहे. खरेतर सोनिया गांधी या गेली चाळीस वर्षांहून अधिक काळ भारताच्या नागरिक म्हणून राहत असून भाजपाने त्याच्या देशप्रेमावर शंका घेतल्याने त्यांना हे विधान करावे लागले आहे. भाजपा अशाप्रकारे अधूनमधून सोनिया गांधींच्या देशप्रेमाबद्दल शंका घेत असते. परंतु त्यामुळे वस्तुस्थिती काही लपून राहू शकत नाही. राजीव गांधींशी लग्न केल्यावर सोनिया गांधी या भारतात आल्या आणि इथेच स्थायिक झाल्या. खरेतर इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधी भारतात येतात इंग्रजी, हिंदी बोलतात ही आपल्याला अभिमानाची बाब ठरली पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीशी कसलीही नाळ न जुळणार्‍या इटलीतून आलेल्या सोनिया गांधी गेल्या चाळीसहून जास्त काळातील आपल्या वास्तव्यात इथल्या मातीशी एकरुप झाल्या आहेत. ही बाब सोपी नाही. आपले पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्या आपल्या दोन लहान मुलांना घेऊन आपल्या जन्मगाव असलेल्या इटलीत जाऊ शकल्या असत्या. परंतु त्यांनी तसे केले नाही. राजीव गांधींच्या निधनानंतर त्या जवळपास एक तप राजकारणात नव्हत्या. त्यावेळी देखील त्या देश सोडून जाणार अशा अफवा भाजपाने पिकविल्या होत्या. मात्र या अफवा काही खर्‍या ठरल्या नाहीत. ज्यावेळी त्या शिकत होत्या त्यावेळी त्यांनी हॉटेलात काम केले होते. याचा देखील कुत्सितपणाने उल्लेख केला जात होता. मात्र विदेशात शिकता शिकता कमविणे ही पद्धतच आहे. आपल्या देशातून विदेशात शिकणारे विद्यार्थी देखील असेच काम करुन शिकतात. महत्त्वाचे म्हणजे विदेशात श्रमाला किंमत व प्रतिष्ठा आहे. कोणतेही हलक्या दर्जाचे काम म्हणून ते वाईट असे समजले जात नाही. आपल्या पंतप्रधानांना तर श्रमाची प्रतिष्ठा समजली पाहिजे कारण त्यांच्या सांगण्यानुसार ते चहावाले होते. असो. आपल्याकडे येऊन खर्‍या अर्थाने भारत हे आपले घर आहेे असे मानणार्‍या सोनिया गांधींनी आपली देशभक्तीची परीक्षा गेल्या चाळीसहून अधिक वर्षे दिली आहे. आता पुन्हा त्यांच्याकडून देशभक्तीचे प्रमाणपत्र मागणे म्हणजे सोनिया गांधींवर अन्याय ठरावा. भाजपाच्या अशा आरोपातून त्यांची कोती मनोवृत्ती दिसते. पण ही कोती मनोवृत्ती भाजपने पुन्हा पुन्हा दाखवून दिली आहे. भाजपाचे नेते काही तरी वादग्रस्त विधान करत राहतात आणि प्रसिद्धी मिळवत राहतात. तसेच अशी वादग्रस्त विधाने केली म्हणजे मूळ समस्यांपासून लोकांचे काही काळ लक्ष विचलित करता येते. अशी विधाने केवळ नेतेच करीत नाहीत तर पंतप्रधानही करतात हे या देशाचे मोठे दुर्दैवचम्हणावे लागेल.

0 Response to "सोनियांच्या देशप्रेमावर शंका कशाला?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel