-->
अखेर बुरखा फाटला!

अखेर बुरखा फाटला!

संपादकीय पान गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अखेर बुरखा फाटला!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सनातन संस्थेबाबत पाळलेले मौन आणि दुसरीकडे आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार करण्यासाठी समिती नेमण्याची केलेली सूचना पाहता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे असली रुप बाहेर येऊन आता त्यांचा नकली चेहरा टराटरा फाटण्यास सुरुवात झाली आहे असेच म्हणता येईल. नरेंद्र मोदी हे स्वयंसेवक आहेत व सरसंघचालकांची आज्ञा त्यांना शिरसावंद्य असते, त्यामुळे भागवतांनी नागपूरच्या रेशीमबागेतल्या मुख्यालयातून दिलेला आदेश हा धुडकाविण्याची हिंमत स्वयंसेवक करुच शकत नाही. म्हणजे मोदी भागवतांचा आदेश पाळणारच ही काळ्या दगडावरची रेष आहे. खरे तर संघात आदेश दिला जातो. भागवतांनी जी सूचना केली आहे ती जनतेला केली आहे. त्यांनी आरक्षण रद्द करुन सर्वांना समान पातळीवर आणण्याचा आदेश त्यांनी यापूर्वीच नरेंद्रभाईंना दिला आहे. आता पंतप्रधान कार्यालयातून त्याची अंमलबजावणी कशी कारवयाची याची आखणी केलीही गेली असेल. येत्या काळात तशा घडामोडी दिसतीलच. असो. गुजरातमध्ये पटेल समाजाचा नेता म्हणून एका रात्रीत उदयास आलेल्या हार्दिक पटेलने देखील भागवतांच्या मागणीला पोषक अशीच मागणी केली आहे. हार्दिकभाईंच्या सांगण्यानुसार, एक तर पटेल समाजाला आरक्षण द्या किंवा सर्वांचेच आरक्षण रद्द करा. त्यांचे हे विधान हे भागवतांच्या मुखातूनच आले असावे असे आहे. गेल्या महिन्यात गुजरातमध्ये हिंसक आंदोलन व्हावे, त्यानंतर पुढील महिन्यात भागवतांनी सरकारला सूचना करावी या सर्व बाबी सर्व काही संघाच्या शिस्तीप्रमाणे ओळीने केलेल्या दिसतात. या घटना म्हणजे काही अपघात नव्हे. आता भविष्यात याची अंमलबजावणी करण्यासाठी नरेंद्र मोदी पुढे सरसावतील त्यावेळी सरकार संघाच्या तालावर कसे नाचते हे पुन्हा एकदा स्पष्ट होईल. भाजपाला कधी नव्हे ती एक हाती सत्ता आल्याने मोहन भागवतांना कधी एकदा देशाला हिंदुत्ववादी करुन टाकतो असे झाले आहे. जनतेने आपल्याला आता आपला अजेंडा राबविण्यासाठीच निवडून दिले आहे अशी त्यांची समजूत झाली आहे. भाजपकडे परंपरेने चालत आलेल्या मतपेटीला अनेक समाजगटांची, विशेषत: मुस्लिम व दलितांची मदत मिळाली म्हणून सत्ता हाती आली. मोदींच्या विकासाच्या गप्पा ऐकून लोकांनी मतदान केले होते. आता वर्षभरानंतर सर्वांचा भ्रमनिरास होऊ लागला आहे. देश हिंदुत्ववादी करण्यासाठी भाजपला मते मिळालेली नाहीत हे संघ परिवाराच्या लक्षात आले नसल्याने नको त्या गोष्टींना अग्रक्रम दिला जात आहे. भागवतांच्या आरक्षणाबाबत विधान प्रसिध्द झाल्यावर खुद्द भाजपमध्येच तीव्र नाराजी पसरली. भागवत विधानावर ठाम राहिले तर पक्षात या मुद्द्यावरून फूट पडू शकते इतका हा विषय गंभीर आहे. संघासाठी व भागवतांसाठी रामजन्मभूमी व हिंदुत्व हे जिव्हाळ्याचे विषय असतीलही. परंतु भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या बहुसंख्य खासदारांसाठी ते नाहीत. आरक्षण या शब्दाने देशातील मोठ्या संख्येने असलेल्या लोकांना सुरक्षिततेची भावना दिली आहे. आरक्षणातून सर्व प्रश्न सुटणार नाहीत हे खरे असले तरी आरक्षणामुळे काही प्रश्न सुटले हेही तितकेच खरे आहे. आरक्षणामुळे देशाचा विकास खुंटलाय असे झालेले नाही, कारण आरक्षण असूनही भारत सात ते आठ टक्यांचा विकासदर गाठू शकतो हे गेल्या वीस वर्षांत सिद्ध झाले आहे. संघाने नरेंद्र मोदींना सत्तेत आणण्यासाठी त्यांचा विकासाचा चेहरा पुढे केला परंतु आपला हिंदुत्वाचा छुपा अजेंडा आपल्या खिशात ठेवला हे सत्य आता उघड होऊ लागले आहे. भाजपा सत्तेत आल्यावर लगेचच घर वापसी सारखे कार्यक्रम आयोजित करुन त्याची एक झलक द्यायला सुरुवात केली होती. भाजपा ही आपली एक पित्रृ संघटना आहे त्यांनी आपले आता सर्व बाबतीत एैकले पाहिजे अशी समजूत संघाने करुन घेतली आहे. संघाने गेल्या वर्षात पध्दतशीर पावले उचलून या देशाचा इतिहास-भूगोल बदलण्यास सुरुवात केली आहे. इतिहासाची अनेक पाने बदललून मुलांना लहाणपणीच हिंदुत्वाचे संस्कार करण्यास प्रारंभ केला आहे. परंतु आपली घटना ही सर्वधर्मसमभाव मानते आणि देश हिंदुत्ववादी करावयाचा असले तर घटना बदलाली लागणार आहे याचा विसर संघाला पडलेला दिसतो. अर्थात देशाची घटना बदलण्याचा विचार जरी संघाचा असला तरीही तसे करणे सध्या शक्य नाही, त्यामुळेच हिंदुत्वाचे छुपे अजेंडे संघ राबवित आहे. संघाने आता आरक्षणाच्या मुद्याला हात घालून मोठ्या समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. एक प्रकारची असुरक्षितता त्या समाजात यामुळे निर्माण होणार आहे. आरक्षण हे फक्त आपल्याकडेच नाही तर जगात आहे, अगदी विकसीत असलेल्या अमेरिकेतही कृष्णवर्णीयंसाठी आरक्षण आहे. आपल्याकडे विकासाचा मुद्दा हा आरक्षणाहून मोठा आहे. समाजाला उद्योगभिमूख कसे करता येईल याची सध्या चर्चा झाली पाहिजे. आजची आपली खरी गरज हीच आहे. झपाट्याने विकास करण्यासाठी  उद्योगधंदे व शेतीपूरक धंदे यांचे जाळे विणणे आवश्यक आहे. रोजगाराची खात्री नसल्यामुळे आरक्षणाची मागणी वाढत गेली. समाजाला उद्योगाभिमुख कसे करावे यावर भागवतांनी भाष्य करायला हवे होते; पण त्यांना हिंदुत्वाची घाई आहे.
--------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "अखेर बुरखा फाटला!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel