-->
संपादकीय पान गुरुवार दि. १६ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
थंडीच्या लाटेचे जागतिक परिणाम
------------------------------------
थंडीबाबत हवामान खात्याने गेल्या काही दिवसांत जे जे अंदाज वर्तवले आहेत ते खरे ठरले आणि उत्तर भारतापासून अनेक भागात कडाक्याची थंडी सुरु झाली आहे. उत्तर भारतामध्ये थंडीची मोठी लाट आली आहे. थंडीने गारठून मरण पावलेल्या दुर्दैवी लोकांबद्दलच्या बातम्याही आता येऊ लागल्या आहेत. जगण्यासाठी किमान बाबी लागणा-या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधा देशातल्या तळागाळातील जनतेला पुरवण्यात आपले सरकार अजूनही यशस्वी ठरलेले नाही. त्यामुळे दरवर्षी थंडी, पाऊस, उन्हाळा या मोसमांमध्ये काही जणांना आपल्या प्राणास मुकावे लागते. आपल्या देशात गोरगरिबांना इतक्या कवडीमोलाने मरण का मिळते, या विदारक वस्तुस्थितीचा सरकारला गांभीर्याने विचार करावाच लागेल. उत्तर भारतामध्ये आलेल्या कडक थंडीच्या लाटेने सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरल्याने जनजीवनही विस्कळीत झाले आहे. जम्मू-काश्मीरलगत असलेला लडाख परिसर हे अनेकांचे आवडते पर्यटनस्थळ. तेथील लेह शहरात रविवारी उणे १९ अंश सेल्सियस इतके तापमान होते. थंडीच्या मोसमातले जम्मू-काश्मीर व लगतच्या परिसरात नोंदवले गेलेले सर्वात कमी तापमान होते. कारगिल, पहलगाम, गुलमर्ग या काश्मीरमधील काही ठिकाणांमध्ये उणे १०.८ अंश सेल्सियसपर्यंत तापमान खाली उतरलेले आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख, पूर्वांचल राज्यांचा काही भाग येथे बर्फाचे साम्राज्य पसरले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे धुक्याचे आच्छादन दुपारचे बारा वाजले तरी हटायला तयार होत नसल्याने उत्तर भारतातल्या राज्यांतील रेल्वे व विमानसेवा विस्कळीत झाली. अमृतसर, पतियाळा, लुधियानासारख्या काही ठिकाणी धुके सरले अशी स्थिती निर्माण होऊन थोडे आशादायक वातावरण निर्माण झाले होते. मात्र दिवस उजाडताच धुके हटवण्याची मेहेरबानी या शहरांवर निसर्गराजा पुढच्या दिवसांत नेहमीच दाखवत राहील, याची मात्र काहीच शाश्वती नाही. त्यामुळे रेल्वे व विमान वाहतुकीला मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. एकीकडे, ग्लोबल वॉर्मिंगपायी जागतिक हवामानात झालेल्या बदलांमुळे हिमालय, आल्प्स पर्वत, अंटार्क्टिका येथे असलेले बर्फ वितळण्याचे प्रमाण येत्या काही वर्षांत वाढीला लागेल व त्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्ती ओढवू शकतात, असा इशारा पर्यावरणतज्ज्ञ सातत्याने देत आहेत. अमेरिकेत गेल्या आठवड्यात उत्तर ध्रुवावरील वादळी बर्फाळ हवेमुळे अमेरिका गोठली. त्यामुळे आलेल्या हिमलाटेमुळे अमेरिकेतील थंडीने गेल्या वीस वर्षांचा विक्रम मोडला. अमेरिका व कॅनडाचे वातावरण मंगळ ग्रहापेक्षाही थंड झाले आहे. अमेरिकेच्या मध्य व उत्तरेकडील भागात उणे ५१ अंश सेल्सियस तापमान राहिले. अंटार्क्टिकावरही इतकेच उणे अंश सेल्सियस तापमान असते. या विदारकतेच्या दर्शनाबरोबरच थंडीतील आल्हाददायकता हेही तिचे दुसरे रूप आहे. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रातील अनेक भागात सोसेल अशी परंतु गुलाबी म्हणता येईल अशी थंडी पडलेली आहे. अशा वेळी साहित्य संमेलने, विविध फेस्टिव्हल, करमणुकीचे कार्यक्रम जोर धरतात. मुंबईत तर यंदा तापमान १३ डिग्रीवर उतरले होते. मुंबईकरांना अशा प्रकारची थंडी म्हणजे एक सुखद आनंदच ठरतो. ऐकीकडे अमेरिकेपासून ते पार आपल्या देशातील उत्तरेतील भाग थंडीत गारठला असताना आपल्याकडे काही भागात थंडीचा आनंद लोकांनी लुटावा हे दरवर्षीचे ठरलेलेच आहे. अशा प्रकारचे टोकाचे हवामान आपण अनेकदा अनुभवतो. कुणी म्हणतील हा निर्सगच आहे. तर पर्यावरणवादी म्हणतील मनुष्यानेच ओढावून घेतलेली ही नामुष्की आहे. परंतु गेल्या काही वर्षात निर्सगाचा जो असमतोल ढळत चालला आहे ती बाब गंभीर्याने घेण्याची आता वेळ आली आहे. थंडीच्या लाटेचे जागतिक परिणाम आपल्याला अनुभवयाला मिळत आहेत. मात्र त्याचवेळी याकडे कुणी गांभीर्याने पाहत नाही ही चिंतेची बाब आहे.
----------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel