-->
संपादकीय पान गुरुवार दि. १६ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
दलित चळवळीचा अंगार विझला
--------------------------------
दलित पँथर चळवळीचे प्रणेते, जेष्ठ साहित्यिक व विचारवंत नामदेव ढसाळ यांचे बुधवारी पहाटे चार वाजता मुंबईत वयाच्या ६४व्या वर्षी निधन झाले. आतड्याच्या कर्करोगामुळे मागील काही वर्षापासून ते आजारी होते. दोन महिन्यापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या जाण्याने साठीच्या दशकापासून दलित, कष्टकरी चळवळीशी बांधिलकी असलेला एक अंगार विझला आहे असेच म्हणावे लागेल. साठीच्या दशकात ज्यावेळी जगात सामजवादी चळवळ जोरात होती त्यावेळी आपल्याकडेही दलित, कष्टकर्‍यांच्या चळवळीने चांगलाच जोर धरला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव करुन दिली होती आणि त्यानंतरची पिढी आता अधिक आक्रमक होत होती. नामदेव ढसाळ यांना तर सशस्त्र क्रांतीचेच वेध लागले होते आणि त्या विचाराने ते झपाटलेले होते. त्याचवेळी कष्कर्‍यांचा एक अंगार घेऊन बंडखोर कवीता करणारा एक तरुण म्हणून नामदेव ढसाळ पुढे आला होता. त्याच्या कवितेत तरुणांना जागविण्याची, उठविण्याची व क्रांतीचे स्पुंलिंग फुलविण्याची उर्मी होती. त्यावेळी साहित्य हे अशा प्रकारे धगधगते होते. पुण्याजवळ जन्मलेला हा तरुण मुंबईत येतो काय आणि वडिलांसोबत मुंबईतील गोलपिठ्यातील झोपडपट्टीत आपले आयुष्य सुरु करतो, मुंबईत टॅक्सी चालवून हा तरुण आपले आयुष्य कंठतो आणि जीवनातील सर्व चटके सोसत आपले तरुणपण घालवतो, हे नामदेव ढसाळांच्या बाबतीत घडलेली ही एक इतिहासाची एक प्रक्रियाच होती. त्याकाळी दलित चळवळीतील नेत्यांची नाळ मार्क्सवादाशी जोडलेली असे. नामदेव ढसाळही याच संस्कारातून मोठे झाले. सुरुवातीला कट्टर मार्क्सवादी असलेले ढसाळ हे जबरदस्त क्रांतिकारी होते. त्यांनी तरुणपणी जगण्यासाठी जो संघर्ष केला तो कागदावर उतरविला. त्यांच्या कविता असोत किंवा अन्य कोणतेही साहित्य हे प्रक्षोभक वाटेल. परंतु ते एक जळजळीत सत्य होते आणि त्यांनी जे अनुभवले तेच कागदावर उमटविले. अशा अस्सल संघर्षातून निर्माण झालेली त्यांची ही साहित्यकृती त्यामुळेच अजरामर ठरावी अशी झाली आहे. मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते म्हणून ओळख निर्माण केली. दलितांचे, शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार, विचारवंत अशी ओळख पुढे ढसाळ यांची झाली. १९७३ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला. या कवितासंग्रहाने तर कवितेच्या जगात हाहाकार माजविला. त्यातील भाषा ही प्रक्षोभक तर होतीच परंतु एक जळजळीत वास्त मांडण्याची त्यांची हातोटी यातून देशाला दिसली. त्याकाळी चॅनल्स नव्हते अन्यथा आताच्या काळात चॅनेल्सनी त्यांना हिरो केले असते. यानंतर मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले (माओवादी विचारांवर आधारित), तुझी इयत्ता कंची?, खेळ (शृंगारिक), आणि प्रियदर्शिनी (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा), या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात, तुझे बोट धरुन चाललो आहे, गांडू बगीचा आदी कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. याचबरोबर अंधार यात्रा हे नाटक लिहिले. हाडकी हाडवळा, निगेटिव्ह स्पेस् या कादंबरीही लिहिल्या. आंधळे शतक- मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे हा निवडक कवितांचा संग्रह त्यांनी प्रसिद्ध केला होता. साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना २००४ मध्ये साहित्य जीवन गौरव पुरस्कार, बुद्ध रोहिदास विचार गौरव पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने त्याना पद्मश्री पुरस्कार देऊनही गौरव केला होता. दलित चळवळीला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर सशस्त्र संघर्ष करावा लागेल या क्रांतिकारी विचारातून त्यांनी अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवर त्यांनी दलित पॅन्थर ही संघटना १९७२ साली स्थापली. दलित पॅन्थरचे बॅनर्स त्यकाळी गावोगावी दिसू लागले होते. साहित्यातून जन्मलेला हा नेता असा पहिलाच आपल्याला लाभला होता. दलित पॅन्थर ज्या जोमाने उभी राहिली तेवढ्याच जास्त गतीने तिची अधोगती एका दशकात व्हायला सुरुवात झाली. कदाचित नामदेव ढसाळांनी दलित पॅन्थरच्या माध्यमातून संघटन जरुर उभारले परंतु त्या संघटनेला विविध कार्यक्रम देऊन तिला गती देण्याचे काम त्यांना जमले नाही. यातूनच दलित पॅन्थरचा जोर ओसरु लागला. त्यानंतर दलित संघटनांची राजकीय बांधिलकी जशी बदलत गेली तसे त्यांचे महत्व कमी होत गेले. दलित पॅन्थरचेही असेच झाले असावे. नामदेव ढसाळ हे कधी कॉँग्रेसच्या तर कधी कुणा अन्य पक्षांच्या व शेवटी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मैत्री केल्याने त्यांचे क्रांतिकारत्व लयास गेले. एकेकाळी ज्या शिवसेनेशी दोन हात केले त्यांच्यात कळपात नामदेव ढसाळ गेल्याने त्यांच्या भोवती शेवटच्या काळात कार्यकर्ते शिल्लक राहिले नाहीत, ही त्या चळवळीची शोकांतिका ठरली. गेल्या तीन दशकात दलित चळवळ जशी विभाजत गेली तशी तिच्यातला लढवय्येपणा संपला. या सर्व इतिहासाचे साक्षीदार नामदेव ढसाळ होते. ढसाळ यांच्या जाण्याने एक दलित क्रांतिकारक अंगार विझला आहे.
--------------------------------------  
 

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel