-->
लढवय्ये शरद पवार

लढवय्ये शरद पवार

शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
लढवय्ये शरद पवार
सामान्यांची फसवणूक करून दिलेला शब्द न पाळणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही. मला या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याबद्दलचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे. म्हातारा तर मुळीच नाही. या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होण्याचा प्रश्‍नच नाही, असे रोखठोक उत्तर आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे. सध्या सत्ताधारी भाजपा व शिवसेनच्या विरोधात शड्डू ठोकून असलेले शरद पवार हे सर्वाधिक आक्रमक झाले आहेत. सध्या पवार हे संपूर्ण राज्यात सभा घेत असून अक्षरश: महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांच्या सभांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे त्यांचा 79 व्या वर्षीदेखील उत्साह वाढत चालला आहे. पवारांची ही लढाई वैचारिक आहे. सध्याच्या केवळ सत्तादार्‍यांना सत्तेतून हिसकावून लावणे हाच उद्देश नाही तर या प्रतिगामी व शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या सरकारला घरचा रस्ता दाखविणे हे लक्ष्य आहे. त्यासाठी त्यांना आपल्या वयाची तमा नाही. कारम लढाई ही वैचारिक आहे, हे विसरुन चालणार नाही. केंद्रातील व राज्यातील भाजपा-शिवसेनेच्या सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. सर्व क्षेत्रांत अपयशी ठरलेल्या या सरकारने चक्क सैनिकांनाही सोडले नाही. त्यांच्या शौर्याचा वापरसुद्धा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे सरकार करीत आहे. 1972 साली इंदिरा गांधींच्या काळात पाकविरुध्द युद्ध झाले होते. त्यांनी तर पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांगला देशाची निर्मीती केली होती. एवढे मोठे युद्ध जिंकूनदेखील त्याचे श्रेय घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. मात्र हे सरकार सर्जिकल स्ट्राईक असो किंवा कोणतीही अन्य कारवाई त्याचे श्रेय लाटत आहेत. शेतकर्‍यांवर प्रेम असल्याने कर्जमाफी केल्याचा नुसता देखावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. अजूनही राज्यातील 61 टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. मध्यंतरी शेतकरी कुटुंबाच्या घरी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अर्धे मंत्रिमंडळ भेट देऊन आले होते. परंतु त्यापुढे काहीच झाले नाही. त्यामुळे अशा अकार्यक्षम, संवेदनाहीन सरकारला खुर्चीवरून खाली खेचायला हवे. 89 लाख शेतकर्‍यांना 34 हजार कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा भाजप शिवसेना सरकारचा दावा पूर्णपणे खोटा ठरला असून या कर्जमाफीतून 50 टक्के शेतकरी वंचित राहिल्याने शेतकर्‍यांना न्याय देण्यात ही योजना पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकर्‍यांचा प्रचंड पुळका आल्याचे दाखवून कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केली, त्याला आता 30 महिने झाले आहेत. ही योजना देशातील सर्वात मोठी कर्जमाफीची योजना असेल असे मुख्यमंत्र्यांनी फार गाजावाजा करीत जाहीर केले होते. परंतु सातत्याने कमीत कमी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळेल हाच या सरकारचा कटाक्ष राहिला आहे. या योजनेची अंतिम आकडेवारी समोर आल्यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून लाखो शेतकरी वगळले गेले आहेत, असे सिद्ध झाले आहे. 31 ऑगस्ट 2019 पर्यंत एकूण 44 लाख 4 हजार 147 शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये 18 हजार 761 कोटी 55 लक्ष रूपये जमा करण्यात आले आहेत. याचाच अर्थ जवळपास 45 लाख शेतकर्‍यांना अजूनही लाभापासून वंतिच ठेवण्यात आले असून कर्जमाफीच्या रकमेचा आकडाही 50 टक्क्यांच्या आसपासच आहे. या योजनेत केवळ 4 लाख 26 हजार 588 शेतकर्‍यांना 2 हजार 629 कोटी रूपये देण्यात आले आहेत. यामध्येही जवळपास 6 लाख पात्र शेतकर्‍यांना या योजनेचा लाभच मिळाला नाही. शासनातर्फे 10 लाख 44 हजार 279 शेतकर्‍यांना 7 हजार 290 कोटी देण्यात येतील असे निर्धारीत करण्यात आले होते. आश्‍चर्याची बाब म्हणजे शासनाने अधिकृत पात्र शेतकर्‍यांची ग्रीन लिस्ट जाहीर केली, त्यात एकूण कर्जमाफी ही 55 लाख 60 हजार 816 शेतकर्‍यांकरिता 26 हजार 456 कोटी 69 लक्ष रूपयांची होती. या यादीचा अर्थ हा की अधिकृतपणे 89 लाखांपैकी जवळपास 34 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीतून वगळण्यात आलेले आहे.  व आतापर्यंत केवळ 44 लाख 4 हजार 147 शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये 18 हजार 761 कोटी 55 लक्ष रूपये जमा झाल्याने 11 लाख शेतकर्‍यांना अधिकृत पात्र घोषीत करूनही जवळपास 8 हजार कोटींची कर्जमाफी मिळालेली नाही हे स्पष्ट झाले आहे. हे शासनाच्या निरस व असंवेदनशील प्रवृत्तीचे निदर्शक आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कर्जमाफीच्या रूपात शेतकर्‍यांची घोर फसवणूक या सरकारने केली आहे. त्यामुळेच शरद पवार यंना या वयात देखील लढण्यासाठी उतरावे लागले आहे. याची सरकारला शरम वाटली पाहिजे तर त्याऐवजी ते शरद पवारांना घरी बसविण्याची वेळ आल्याची उद्दामपणाची भाषा करतात, याला काय म्हणावे?
------------------------------------------------------------

0 Response to "लढवय्ये शरद पवार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel