-->
संपादकीय पान मंगळवार दि. १४ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
अमेठीला धडका
----------------------
कॉँग्रेसचे उपाध्यक्ष व युवा नेते राहूल गांधी यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात मोठी सभा आयोजित करुन आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्‍वास यांनी मोठी धडक दिली आहे. या मतदारसंघातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर काळी शाई फेकून तसेच बसच्या काचा फोडून व काळे झेंडे फडकावून कुमार विश्‍वास यांचे येथे स्वागत केले असले तरीही कुमार विश्‍वास हे येथे सभा घेण्याच्या निर्धारापासून ढळू शकले नाहीत. आपचे नेते कुमार विश्‍वास यांची सभा कशी होणार याबाबत मिडियात बरीच चर्चा गेले दोन दिवस होती. काहींच्या मते त्यांना फारसा प्रतिसाद मिळणार नाही, कारण हा मतदारसंघ म्हणजे गांधी-नेहरु घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथे विरोधक आपला उमेदवार उभा करतात तो एक नाममात्र उपचार म्हणूनच. परंतु विश्‍वास यांच्या सभेला सुमारे १५ हजाराहून जास्त लोक हजर राहातात हे चित्र फारच बोलके ठरावे. यातून कॉँग्रेस विरोधाची लाट दिवसेंदिवस किती तीव्र होत चालली आहे हे स्पष्ट जाणवते. आजवर कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेलेल्या या लोकसभा मतदारसंघातून २००९ साली राहूल गांधी यांना ४,६४,१९५ मते पडली होती व त्यांचा विजय हा ३,७०,१९८ एवढ्या मतांनी झाला होता. त्यानंतर २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहूल गांधी यांना ३,९०,१७९ मते पडली होती आणि त्यांचा विजय २,९०,८५३ मतांनी झाला होता. म्हणजे गेल्या दोन निवडणुकात राहूल गांधी यांचे मताधिक्य घटले आहे. ऐवढेच नाही तर २०१२ साली झालेल्या उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील पाच पैकी केवळ दोनच जागा कॉँग्रेसला जिंकता आल्या, अन्य जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे राहूल गांधी यांच्यासाठी हा अत्यंत सुरक्षित मतदारसंघ आता हा राहिलेला नाही. या मतदारसंघातील राहूल यांचे घटते मताधिक्य व विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या येथील कमी झालेल्या जागा पाहता आपच्या कुमार विश्‍वास यांनी राहूल गांधींना आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न काही अगदीच फेल जाईल असे ठामपणे सांगता येत नाही. एक तर कुमार विश्‍वास येथे सभा घेण्यासाठी येताना त्यांच्यावर दगडफेक करणे तसेच त्यांच्या प्रतिमांचे दहन करणे यासारखी कृत्ये कॉँग्रेसजनांनी अमेठीत करणे हा रडीचा डाव झाला. तसे पाहता कुमार विश्‍वास हे कवी मनाचे आहेत. आपचे एक आघाडीचे नेते व आपची उबारणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. परंतु त्यांच्या सभा होऊ नयेत यासाठी कॉँग्रसे कार्यकर्त्यांनी प्रय्तन करणे म्हणजे कॉँग्रेसचा विश्‍वास आता ढळू लागल्यानेच त्यांच्याकडून हे कृत्य होत आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. अमेठी आता पूर्णपणे सुरक्षित न राहिल्याने राहून गांधी अमेठीच्या जोडीने ऐकेकाळचा इंदिरा गांधींचा ऐतिहासिक मतदारसंघ रायबरेलीतूनही निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आणीबाणी उठविल्यावर १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा रायबरेली या मतदारसंघातून जनता पार्टीचे राजनारायण यांनी पराभव केला होता. मात्र त्यानंतर त्यांनी १९७८ साली चिकमंगळूर मतदारसंघातून निवडणूक इंदिरा गांधींनी जिंकली होती. त्यामुळे एक सुरक्षित मतदारसंघ म्हणून राहून अमेठीच्या जोडीने रायबरेलीतून यावेळी निवडणूक लढविण्याचा विचार करीत असल्याची चर्चा आहे. परंतु आता रायबरेली हा मतदारसंघाही कॉँग्रेससाठी सुरक्षित राहिलेला नाही. राहूल गांधी यांना अमेठीच्या जोडीने अन्य मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास आपल्या विजयाची निश्‍चिती नसल्यानेच त्यांनी दुसर्‍या मतदारसंघातून निवडणूक लढवली असा अर्थ होईल. अमेठीतून निवडणूक आपल्याला सोपी नाही हे लक्षात घेऊन राहूल यांना तेथे समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाशी साटेलोटे करावे लागणार आहे. या दोन्ही पक्षांनी जर उमेदवार उभा केला नाही तर विश्‍वास यांची थेट लढत राहूल यांच्याबरोबर होईल. मात्र या दोन्ही पक्षांनी उमेदवार उभा केल्यास मते विभाजन झाल्यास विश्‍वास यांना फायदा होऊ शकतो. राहूल गांधींच्या भोवती होयबांची फौज आहे आणि हे सर्व नेते त्यांना वस्तुस्थितीचे वर्णन करता खोटे चित्र रंगवून सांगतात. राहूल यांच्या चमच्यांमुळे त्यांचा जनतेशी संपर्क तुटला आहे. अमेठीत असलेला असंतोष राहूल गांधींपर्यंत नेमका पोहोचविला जात नाही. सत्तेत असलेल्यांच्या बाबतीत असे बरेचदा होते. त्यात राहूल गांधींचा आता समावेश झाला आहे. सध्या कॉँग्रेस विरोधात असलेली लाटही राहूल गांधींपर्यंत चुकीच्या मार्गाने पोहोचविली जाते अशी चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर विश्‍वास यांच्या सभेला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आहे. चार राज्यातल्या पराभवानंतर कॉँग्रेस विरोधात लाट आली आहे आणि देशातील प्रत्येक मतदारसंघात त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया कॉंग्रेस विरोधात उमटणार आहे. अशा स्थितीत अमेठीत कॉँग्रेस विरोधात आम आदमी पार्टीच्या सभेला ऐवढा मोठा जनसमुदाय उपस्थित राहातो हे पुढील राजकारणात काही तरी वेगळे होणार हेच दर्शवितो. कुमार विश्‍वास यांनी अमेठीत राहूल गांधींच्या विरोधात दिलेल्या धडका फार बोलक्या आहेत. यातून भविष्यात कॉँग्रेस सत्तेतून हद्दपार होण्याची शक्यता वर्तवितो. अमेठीच्या सभेने बरेच काही संदेश या देशातील जनतेला दिले आहेत.
-----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel