-->
काश्मीर जळतेय!

काश्मीर जळतेय!

संपादकीय पान मंगळवार दि. १२ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
काश्मीर जळतेय!
देशाचा मुकूट असलेल्या काश्मीरात सध्या अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला असून तेथील राज्य सरकार अतिरेक्यांच्या विरोधात ब्र काढीत नाही. अशावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पुढाकार घेऊन या अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी पावले उचलण्याची आता वेळ आली आहे. अर्थात जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे समर्थन करणार्‍यांच्या मांडीला मांडू लावून तेथे भाजपा सत्ते आहे. त्यामुळे कदाचित त्यांचे राजकारण यासाठी आड येत असावे. परंतु विरोधात असताना हेच नरेंद्र मोदी अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा करीत असत. मग आता सत्तेवर आल्यावर का कारवाई करीत नाहीत? काश्मीर जऴत असताना हेच मोदी बघत बसले आहेत, यामागची कारणे जनतेला हवी आहेत. सध्या काश्मीर जळत आहे. याचे निमित्त झाले ते, सीमा सुरक्षा दलाने हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर, बुरहान वाणी चकमकीत ठार झाल्याचे. या घटनेनंतर हिजबुल समर्थक अतिरेकी गट हिंसाचार करण्यासाठी रस्त्यावर उतरले. अतिरेक्यांना किंवा दहशतवाद्यांना जर ठार मारले तर अधिक प्रमाणात आम्ही हिंसाचार करू अशी धमकी या अतिरेकी संघटनांनी दंगली घडवून सिद्ध केलेली आहे. त्यामुळे या अतिरेकी संघटनांना चांगला धडा शिकविण्याची आवश्यकता आहे. अतिरेकी संघटनांनी श्रीनगर, अनंतनाग या शहरांना वेठीला धरले आहे. कडकडीत बंद पुकारला आहे, सगळ्या बाजारपेठा बंद आहेत, सगळे व्यवसाय बंद पडले आहेत. परिणामी येथील पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. राज्यातले मुख्यमंत्री महबुबा सईद यांचे सरकार हे अतिरेक्यांचे वेगळ्या भाषेत समर्थन करते. त्यामुळे त्यांच्याकडून अतिरेक्यांवर कारवाई होण्याची शक्यता नाही. त्यामुळे केंद्राने यात हस्तक्षेप करुन जर राज्य सरकार अतिरेक्यांविरोधात कडक पावले उचलणार नसेल तर तेथे राष्ट्रपती राजवट जारी करणे आवश्यक आहे. परंतु हे सरकार तसे करणार नाही, कारण ते तेथे सत्तेचा मलिदा खात आहेत. असो. बुरहानला ठार केल्यावर अतिरेक्यांच्या समर्थनार्थ जे आंदोलन झाले त्यात २० वर्षाखालील मुले सहभागी झाली होती. ही अतिशय धोकादायक स्थिती आहे. या वयोगटातील तरुणांची माथी अतिरेक्यांनी भडकाविली आहेत. या तरुणांना अतिरेक्यांच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारने विशेष कार्यक्रम राबविला पाहिजे. त्यात प्रामुख्याने या बेकार तरुणांना रोजगार मिळवून दिला पाहिजे. सध्या बेकार असलेले हे युवक अतिरेक्यांकडे सहजरित्या ओढले जातात. ज्या बुरहान वाणीला सीमा सुरक्षा दलाने ठार केले आहे, तो बावीस वर्षाचा होता आणि गेली सहा वर्षे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर म्हणून तो वावरत होता. म्हणजे त्याने देखील किती लहान वयात या क्षेत्रात पाऊल टाकले याचा आपल्याला अंदाज येतो. काश्मीरातील तरुण हे दिशाहीन झाले आहेत. त्यांना ना धड शिक्षण मिळत आहे किंवा रोजगार मिळत आहे. अशा स्थितीत ते अतिरेक्यांच्या जाळ्यात सहजरित्या अडकले तर त्या आश्‍चर्य वाटावयास नको. यातून बाहेर पडून काश्मीरमध्ये शांतता व सुव्यवस्था स्थापन होण्याची आवश्यकता आहे. यासाठी सरकार काय करणार हा सवाल आहे.

0 Response to "काश्मीर जळतेय!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel