-->
महामार्गाचे स्वप्न कधी सत्यात उतरणार?

महामार्गाचे स्वप्न कधी सत्यात उतरणार?

संपादकीय पान बुधवार दि. १३ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
महामार्गाचे स्वप्न कधी सत्यात उतरणार?
मुंबई-गोवा महामार्ग हा चार पदरी करण्याची घोषणा सरकारने जरुर केली परंतु अजूनही त्यादृष्टीने सकारात्मक पावले सरकारकडून पडत नाहीत. मात्र सध्याचा हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा ठरला आहे. तसेच सध्यातर पावसाळ्यात हा महामार्ग खड्यांचाच झाला आहे. येत्या गणपतीला मुंबईकडून कोकणात जाणारा चाकरमणी कसा काय बाप्पाच्या दर्शनाला जाणार ही चिंता आहेच. अशा वेळी हा रस्ता तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे. यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी सोमवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या रस्त्यावर मानवी साखळी तयार करुन सरकारला दणका देण्यात आला. आजवर या रस्त्यसाठी अनेक आंदोलने झाली परंतु सोमवारी शेकापचे झालेले आंदोलन हे सर्वसामान्यांचा सहभाग असलेले व अत्यंत प्रभावी ठरणारे असे होते. शासनाच्या दारी हे आंदोलन त्यामुळे पोहोचले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर हा पहिला ८४ कि.मी. चा टप्पा सरकारने सर्वात प्रथम हाती घेणार अशी घोषणा केली होती. त्यासाठी ठिकठिकाणी जमीनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु देखील केली. परंतु काही ना काही अडचणी निर्माण झाल्या व या रस्त्याच्या उभारणीचे काम पुन्हा रेंगाळले आहे. हे काम नेमके कशासाठी रेंगाळले आहे त्यासंबंधी सरकार काही बोलत नाही. त्यामुळे सरकारच्या कामात पारदर्शकता नाही. या रस्त्याचा विस्तार करण्यासाठी महामार्गाच्या लगतची जागा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अनेकांची घरे जाणार यात काही शंका नाही. परंतु ज्यांच्या जमीनी, घरे किंवा दुकाने जाणार आहे त्यांना योग्य नुकसानभरपाई मिळणेही अत्यंत गरजेचे आहे. अर्थातच त्यांचे पुर्नवसन अगोदर व नंतर रस्ता उभारणी हे सूत्र जरी गृहीत धरले असते तरी एवढ्यात रस्त्याचे काम सुरु व्हावयास पाहिजे होते. जर लोकांचे पुर्नवसन अगोदर केले व त्यांचा चांगली नुकसानभरपाई दिली तर येथील शेतकरी आपली जमीन द्यायला तयार आहेत. परंतु त्याबाबतही सरकार स्पष्ट नाही. त्यामुळेच ही कामे रखडली असावीत. केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे तर हा रस्ता जात असलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ही कामे रखडली आहेत. त्यामुळे सरकारने याबाबत केवळ घोषणाच केल्या खरोखरीच त्यांना काही कोकणासाठी करावयाचे आहे, याबाबत शंका येऊ शकते. सध्या तर मुंबई-गोवा रस्त्याची खड्यांमुळे चाळण झाली आहे. सध्या त्यावर डांबर टाकून हे खड्डे बुजविण्याची गरज आहे. कारण या रस्त्यावरुन जाणार्‍या दुचाकी वाहन चालकांना तर अत्यंत धोकादायक असा रस्ता झाला आहे. त्याशिवाय या मर्गावरील अपघातांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, हा मार्ग म्हणजे मृत्यूमार्गच ठरावा. मात्र अजूनही या सरकारला जाग येत नाही, याचे दुदैव वाटते. अशा या सरकारला जाग आणण्यासाठी शेकापच्या वतीने झालेले हे अभिनव आंदोलन महामार्गाचा प्रश्‍न मार्गी लागायला निश्‍चितच उपयोगी ठरेल. महामार्गाचे स्वप्न यातून लवकरच सत्यात उतरेल असे म्हणावयास काही हरकत नाही.

0 Response to "महामार्गाचे स्वप्न कधी सत्यात उतरणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel