-->
अवघे राज्य ओलेचिंब

अवघे राज्य ओलेचिंब

संपादकीय पान बुधवार दि. १३ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अवघे राज्य ओलेचिंब
दुष्काळाने होरपळलेला व पाण्याच्या एकेका थेंबाने त्रासलेला महाराष्ट्र आता पावसाने ओलाचिंब झाला आहे. राज्याच्या सर्व कानाकोपर्‍यात चांगलाच मुसळधार पाऊस पडलेला आहे. त्यामुळे हे राज्य आता सुखावले आहे. केवळ नुसताच पाऊस नव्हे तर अनेक भागात दुथडी भरुन नद्या वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये तर पूराने थैमान घातले आहे. संपूर्ण कोकणपट्टीत पावसाने हाहा कार केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तर अनेक भागात पूर आले आहेत. चिपळूणात पूर आला आहे. रायगड जिल्ह्यात तर गेल्या पंधरा दिवसात सूर्यदर्शन नाही. रायगडातील धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून तो आता ८० टक्क्यांच्या घरात गेला आहे. राज्यातील २५ हून जास्त ठिकाणी २०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जून महीन्यात पाऊस समाधानकारक नव्हता. मात्र जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावून सर्वानाच सुखद धक्का दिला आहे. त्यामुळे पावसाने जून महिन्यातील आपली अनुपस्थिती आता चालू महिन्यात भरुन काढली आहे. नंदुरबारमध्ये काही भागात ढगफुटी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईकरांवरही पर्जन्यराजाची कृपादृष्टी झाली असून मुंबईला पाणीपुरठा करणार्‍या तलावात एका दिवसात ३६ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला. जून महिन्यात या तलाव क्षेत्रामध्ये पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आता मात्र पावसाने दिलासा दिला आहे. सध्याचा पावसाची ही गती पाहता यंदा पाऊस चांगलाच पडेल असे दिसत आहे. ऑगस्ट संपूर्ण महिना व सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यास यंदा पाण्याचा तुटवडा भासणार नाही असेच दिसते. तसेच सरकारने जलयुक्त शिवारची कामे कितपत चांगली केली आहेत त्याची परीक्षा ही नंतरच्या काळात लागेल. कारण यातील नदी,नाल्यांमध्ये जर चांगला पाणीसाठा राहिला तर दुष्काळी भागास मोठा फायदा होईल. कारण येथे पाणी चांगले झिरपल्यास तेथील विहीरींना पाणी लागेल तसेच बोअरवेल देखील चांगले पाणी देऊ शकतील. मात्र सध्याचे पावसाचे पाणी जमिनीत साठवणूक करुन ते मुरविण्याची गरज आहे. जलयुक्त शिवार योजनेत झालेली कामे खरेखरीच चांगल्या प्रतिची झाली असतील तर त्याचे चांगले परिणाम जनतेला पाहायला मिळतील. कोकणात पाण्याचा प्रश्‍न फारसा भेडसावित नाही, मात्र दुष्काळी मराठवाडा व विदर्भाच्या भागात याचा चांगला परिणाम दिसेल. सद्या जे राज्य ओलेचिंब झाले आहे त्याचा फायदा पहायला मिळेल आणि हे पाणी जर जमिनीत न मुरता वाहून गेले तर दुष्काळाची पूर्वस्थीती यायला काही वेळ लागणार नाही.
---------------------------------------------------------------  

0 Response to "अवघे राज्य ओलेचिंब"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel