-->
संपादकीय पान मंगळवार दि. १४ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्‌या बदलत चाललेला भारत
---------------------------------
गेल्या काही वर्षात आपल्याकडे झपाट्याने बदल होत आहेत. हे बदल केवळ शहरातच होत आहेत असे नव्हे तर ग्रामीण भागातही होत आहेत. आपला देश हा जगातील सर्वात तरुण देश असून ७० टक्क्‌याहून जास्त नागरिक हे ४० वर्षाहून कमी वयाचे आहेत. गेल्या दोन दशकात आपण आर्थिक उदारीकरण स्वीकारल्यापासून जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा आपण भाग झालो. यातून आपल्याला विकसीत जगाशी जवळीक साधता आली. तरुणांनी ही जवळीक झपाट्याने साधली आणि यातून आपल्या समाजात, संस्कृतीत बदल होऊ लागले. अर्थात हे बदल काही झपाट्याने होत नाहीत. बदलांची प्रक्रिया ही किमान एक पिढीतून दुसर्‍या पिढीत होत असते. मोठ्या शहरांमध्ये संयुक्त कुटुंब पध्दती ही संपुष्टात आली. विभक्त कुंटुंब पध्दती ही आपण मागच्या पिढीत स्वीकारली होती. अर्थात शहरात जागेच्या अभावामुळे ही पध्दती लवकर अस्तित्वात आली. आता महिलांना उशीरा लग्न व मुले देखील उशीरा व्हावीत असे वाटू लागले आणि त्यातून लग्ने उशीरा होऊ लागली. त्यातूनच एका मुलाची (मग तो मुलगा असो वा मुलगी) संस्कृती आपण स्वीकारली. ६०च्या दशकात प्रत्येक कुटुंबात किमान चार-पाच मुले असायची. आता एवढी मुले असणारे कुटुंब अषधालाही शोधून सापडणार नाही. हा बदल आपण झपाट्याने स्वीकारला. अठराव्या शतकात आपल्याकडे बालबिवाहाची पध्दत होती. ही प्रथा आपण संपुष्टात आणली आणि स्त्रीयांना आपल्या पायावर उभे केले. आता याच स्त्रियांना उशीरा लग्न करावयाचे तर आहेच शिवाय मुलांना जन्म देखील उशीरा द्यावा असे वाटते. अनेक महानगरात तर कमवित्या करिअर करणार्‍या स्त्रियांना एखाद्या मुलाला जन्म देण्यापेक्षा मुल दत्तक घेणे पसंत करतात. उशीरा मुलांना जन्म दिल्याने पालक व मुलांमधील अंतर जास्त असते. याचे अनेक तोटेच आहेत. पालकांमध्ये जर जास्त अंतर असेल तर मुलांमध्ये पिढीपेक्षा जास्त अंतर होते व मुलांना समजणे पालकांना कठीण जाते. त्याचबरोबर उशीरा मुलाचा विचार केल्यावर स्त्रियांमध्ये गर्भधारणेस विलंब होऊ शकतो. कारण स्त्रियांमध्ये गर्भधारणेचा काळ हा २०ते२९ दरम्यान जास्त असतो. त्यामुळे या काळात गर्भधारणा झाल्यास केव्हाही शास्त्रियदृष्ट्‌या चांगले असते. परंतु अनेकदा शहरातील नोकरी करणार्‍या महिलांचे करिअर याच काळात फुलत असते. त्यामुळे त्यांना मुलाच्या जन्माकडे पाहाण्याचा त्यावेळी विचारही करवत नाही. मध्यंतरी शहरी जीवनावर प्रकाशझोत टाकणारा एक अहवाल प्रसिध्द झाला होता. यात लग्न न करता एकत्र राहाण्याकडे किंवा लग्न न करता एकटे राहाण्याकडेही कल वाढल्याचे आढळले होते. अर्थातच पाश्चिमात्य जीवनशैलीचे आपण अशा प्रकारे अंधानुकरण करीत आहोत असेच म्हणावे लागेल. कोणी कसे जगावयाचे हा ज्याचा त्याच वैयक्तीक प्रश्न असला तरी आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे जे काही चांगले नियम आहेत ते आपण पाळण्यात काहीच गैर नाही. आपल्याकडे बालविवाह, सती, केशवपन या सारख्या वाईट प्रथांना तिलांजली केव्हाच दिली आहे. या प्रथा समाजाला घातकच होत्या. परंतु आता फॅन म्हणून आलेल्या प्रथा प्रामुख्याने उशीरा लग्न करणे, मुलाचा जन्म उशीरा करणे, लग्न न करता राहणे किंवा लग्नच न करणे या पध्दती म्हणजे केवळ पाश्चिमात्य जगाचे अंधानुकरण ठरावे. बदलत्या भारताचे हे सांस्कृतीक व सामाजिक बदल आपण कायम स्वरुपी स्वीकारणार का, हाच सवाल आहे.
---------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel