-->
‘स्लमडॉग मिलेनियर’ वास्तवात उतरवणारा सुशीलकुमार

‘स्लमडॉग मिलेनियर’ वास्तवात उतरवणारा सुशीलकुमार

 ‘स्लमडॉग मिलेनियर’ वास्तवात उतरवणारा सुशीलकुमार
 प्रसाद केरकर, मुंबई 
अमिताभ बच्चन सूत्रधार असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्हीवरील मालिकेत ‘स्लमडॉग मिलेनियर’ची कथा खरी करून दाखवणार्‍या सुशीलकुमारच्या घरी टीव्हीदेखील नाही. त्याने मागच्या वेळी ही मालिका शेजारच्या घरातील टीव्हीवर पाहिली होती. त्या वेळी त्याने पुढच्या वेळी आपण या स्पर्धेत जायचे, असा पक्का निश्चय केला होता. केवळ निश्चयच नाही तर त्याने अमिताभसमोर ‘हॉट सीट’वर बसून तब्बल पाच कोटी रुपयांचा ‘ज्ॉकपॉट’ पटकावला आहे. बिहारमधील मोतीहारी या छोट्या शहरात राहणारा सुशीलकुमार संगणक ऑपरेटर असून त्याचे मासिक उत्पन्न फक्त सहा हजार रुपये आहे. ग्रामीण भागात वाढलेल्या सुशीलच्या बोलण्यातही टिपिकल बिहारी उच्चार आहेत. सुशीलकुमारचे वडील शेतमजूर होते. सुशीलसह घरी पाच भावंडे होती. घरची गरिबीच होती. त्यामुळे सुशीलला आपले शालेय शिक्षण जेमतेम पूर्ण करता आले. पुढे शिकण्याची सुशीलची जबरदस्त इच्छा होती, परंतु आर्थिक स्थिती वाईट असल्याने शालेय शिक्षणाच्या पलीकडे शिकता आले नाही. सुशीलकुमारचे लग्न सीमा पटेल हिच्याशी झाले. लग्न झाल्यावर आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यास त्याने प्रारंभ केला. शाळेतील मुलांना शिकवत त्याने आपलाही अभ्यास पूर्ण करण्यासाठी पावले टाकली. शेवटी त्याने मानसशास्त्रात एम.ए. केले. खरे तर सुशीलला लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावयाची होती, परंतु आर्थिक पाठबळाअभावी ही परीक्षा देणे काही शक्य झाले नाही. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करूनही सुशीलला कॉम्प्युटर ऑपरेटरची 6 हजार रुपये मासिक पगाराची नोकरी मिळाली. कवी असलेल्या सुशीलने ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभ बच्चनसमोर कविता करून त्यांना ऐकवून दाखवली होती. आता या स्पर्धेत ‘ज्ॉकपॉट’ लागल्याने तब्बल पाच कोटी रुपये सुशीलला मिळाले आहेत. यावर कापला जाणारा 33 टक्के कर वगळला तर सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा लाभ सुशीलला झाला आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाने आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रसारासाठी सुशीलकुमारची नियुक्ती केली आहे. Prasadkerkar73@gmail.com

0 Response to "‘स्लमडॉग मिलेनियर’ वास्तवात उतरवणारा सुशीलकुमार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel