-->
भारतीयांवर भुरळ इंटरनेटची

भारतीयांवर भुरळ इंटरनेटची


 भारतीयांवर भुरळ इंटरनेटची
 Published on 11 Nov-2011 ARTICLE ON EDIT PAGE
इंटरनेटच्या मायाजालाने भारतीयांनाही भुरळ घालण्यास सुरुवात केली आहे. संगणकावर एका क्लिकवर माहितीचा साठा आपल्याला काही क्षणांत उपलब्ध होऊ लागल्याने जग अतिशय जवळ आले. साहजिकच इंटरनेटकडे सुरुवातीला विकसित देशातील जनता वळली. अमेरिका व युरोपातील इंटरनेटची बाजारपेठ आता कुंठित होण्याच्या स्थितीत आली आहे. मात्र त्याखालोखाल झपाट्याने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेत आघाडीवर असलेल्या चीन व भारत या देशातील रहिवाशांनी इंटरनेटच्या जास्तीत जास्त जुळण्या घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता इंटरनेटच्या बाजारपेठेवर विकसनशील देशांचा वरचष्मा स्थापन होण्याची चिन्हे आहेत. भारतात प्रत्येक दहा रहिवाशांपैकी एकाकडे म्हणजे 12 कोटी लोकांकडे इंटरनेट आहे. सर्वाधिक इंटरनेट जोडण्यांबाबत जगाचा विचार करता अमेरिका व चीनखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. या 12 कोटी लोकांपैकी बहुतांश लोक आठवड्यातून किमान एकदा तरी इ-मेल तपासण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात असे एका पाहणीत आढळले आहे. भारतात दरमहा 50 ते 70 लाख लोक नव्याने इंटरनेटची जोडणी घेत आहेत. इंटरनेटचा प्रसार त्यामुळे आपल्याकडे सर्वात जास्त झपाट्याने होत चालला आहे. सध्याची ही गती पाहता येत्या दोन वर्षात देशातील इंटरनेटचे ग्राहक 24 कोटींवर पोहोचतील असा अंदाज व्यक्त होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंटरनेटची ही क्रांती आता ग्रामीण भागात, प्रामुख्याने लहान व मध्यम आकारातील शहरात पोहोचली आहे. प्रामुख्याने पाच लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरात इंटरनेटचा प्रसार वाढला आहे. आजवर या क्रांतीची पाळेमुळे मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरांपर्यंतच र्मयादित होती. परंतु आता हे चित्र पालटू लागल्याचे दिसत आहे. 
इंटरनेटचा वापर शालेय मुलांमध्ये वाढत चालला आहे. प्रत्येकी दहामागे एक विद्यार्थी हा निम्न आर्थिक गटातील असल्याचे आढळले आहे. बदलत्या भारताचा विचार केल्यास हे चित्र जास्त सकारात्मक आहे. जगभरात सध्या सुमारे दोन अब्ज लोक इंटरनेटचा वापर करतात. त्यातील चीनचा वाटा 25 टक्के एवढा आहे, तर अमेरिकेचा वाटा 12.5 टक्के आहे. भारताचा यातला वाटा सहा टक्के असला तरी यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या आपल्याकडे असलेल्या इंटरनेट जोडण्यांपैकी ब्रॉडबँडच्या केवळ 12 टक्के जोडण्या आहेत. हे प्रमाण अतिशय कमी दिसत असले तरी भविष्यात ब्रॉडब्रँडच्या जोडण्या वाढतच जातील. 2000 मध्ये आपल्याकडे ‘डॉट कॉम’चा फुगा फुटला. इंटरनेटचे हे माध्यम पुरेशा प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचले नसताना याबाबतीत एक गुलाबी चित्र तयार करण्यात आले होते. त्यामुळे या सर्व अपेक्षांचा भंग झाला. आता मात्र नेमकी उलटी स्थिती आहे. इंटरनेटच्या ग्राहकांची संख्या 12 कोटींवर पोहोचल्याने एक मोठा ग्राहक तयार झाला आहे. इंटरनेट ग्राहकांपैकी सर्वात जास्त ग्राहक मुंबईतच आहेत. त्याखालोखाल दिल्ली, कोलकाता, चेन्नई व पुणे या शहरांचा समावेश होतो. तसेच गेल्या दशकात इंटरनेट या माध्यमाविषयी बर्‍यापैकी जागृती झाली आहे. ग्रामीण भागात संगणकाचा वापर गेल्या एका दशकात झपाट्याने वाढला. इंटरनेटचा वापर करून अनेक उद्योगांनी आपले चांगले बस्तान बसवले आहे. इंटरनेटद्वारे होणार्‍या व्यवहारांचे फायदे ग्राहकांनी अनुभवण्यास सुरुवात केल्याने आता ही क्रांती चांगलीच फोफावणार आहे. यासंबंधी उत्तम उदाहरण इंटरनेटवरील समभागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांबाबत देता येईल. पूर्वीसारखे शेअर दलालाकडे ऑर्डर नोंदवण्यापेक्षा इंटरनेटद्वारे व्यवहार करणे आता अतिशय सोपे झाल्याने ग्राहकांना याचे महत्त्व पटले आहे. यातून इंटरनेटद्वारे समभागांचे व्यवहार करणार्‍यांची संख्या आपल्याकडे वाढत चालली आहे. 
पुढील काही काळात जवळजवळ प्रत्येक उद्योगाबाबत हे होऊ घातले आहे. मात्र आता इंटरनेटचे व ब्रॉडब्रँडचे दर उतरण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्या इंटरनेटचे सरासरी मासिक शुल्क 750 ते 1000 रुपयांच्या दरम्यान आहे. हे दर उतरले तरच इंटरनेट आणखी जास्त संख्येने ग्रामीण भागात पोहोचू शकेल. ज्याप्रमाणे आपल्याकडे मोबाइलचे दर उतरले तसेच इंटरनेटचे दर उतरण्याची गरज निर्माण झाली आहे. इंटरनेटचे जाळे जसे वाढत जाईल तसे याद्वारे व्यवसाय वृद्धी करण्याची एक मोठी बाजारपेठ देशातील उद्योजकांना उपलब्ध होणार आहे. सध्या ‘बिझनेस टु बिझनेस’ किंवा ‘बी टु बी’ने आपल्याकडे चांगलेच मूळ धरले आहे. अनेक उद्योगधंदे आपले परस्परांतील व्यवहार इंटरनेटद्वारे करीत असतात किंवा बँकिंग उद्योगातील अनेक व्यवहार आता इंटरनेटद्वारे सुरू झाले आहेत. प्रामुख्याने शहरात हे व्यवहार फार मोठय़ा प्रमाणात होतात. परंतु सर्वसामान्य ग्राहकांची इंटरनेटद्वारे विविध प्रकारची खरेदी करण्याची मानसिकता तयार व्हायला अजून काही काळ जाईल असेच दिसते. असे असले तरीही इंटरनेटवरील खरेदीकडे आता ग्राहकांचा ओघ वाढत आहे. यातूनच या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या याहू व जीमेल यांनी देशातील वाढत जाणारी ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. इंटरनेट हे भविष्यात सर्व व्यवहारांचा कणा ठरणार आहे. यातून खर्च, वेळ आणि मनुष्यबळ या सगळ्यांचीच बचत होणार आहे. जगात आपला देश सर्वात ‘तरुण’ असल्याने आपल्याकडे ही इंटरनेट क्रांती झपाट्याने पसरणार आहे. जग ‘ग्लोबल व्हिलेज’ होण्याच्या प्रक्रियेतील इंटरनेट क्रांती हे महत्त्वाचे पाऊल ठरेल याबाबत काहीच शंका नाही.

Related Posts

0 Response to "भारतीयांवर भुरळ इंटरनेटची"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel