-->
समाजवादी पक्षातील यादवी

समाजवादी पक्षातील यादवी

संपादकीय पान शनिवार दि. २९ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
समाजवादी पक्षातील यादवी
उत्तरप्रदेशात आगामी निवडणुकीच्या तोंडावर सध्या समाजवादी पक्षात काका-पुतण्यात व एकूणच मुलायमसिंग यादव यांच्या घरात सुरु असलेली भांडणे व उखाळ्यापाखाळ्या पाहता या पक्षात सध्या यादवी सुरु आहे असेच म्हणावे लागेल. पक्षाचे सर्वेसर्वा असलेले मुलायमसिंग यादव यांचे चिरंजीव व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपले काका शिवपाल यादव यांना व त्यांच्या काही समथर्र्कांना मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. त्यानंतर यादव घरातील काका-पुतण्या हा वाद उफाळून वर आला. मात्र त्यावर लेपन करण्यात आले व हा वाद मिटला असले भासविण्यात आले. मात्र पक्षातील या भांडणाला कुठकुठे ठिगळ लावणार अशी स्थिती आहे. आता पुन्हा एकदा पक्षातील भांडणे चव्हाट्यावर आली आहेत. आगामी काळात कॉँग्रस समवेत युती करण्याचे घटत आहे तसेच अनेक ठिकाणी पक्षातील आमदारीकासाठी असलेल्या इच्छुकांची यादी मोठी आहे. त्यामुळे त्यांना कुठे समावून घेणार ही चिंता लागून राहिली आहे. अशात घरातील कलह जनतेसमोर आल्याने मुलायमसिंग हैराण आहे. अशा प्रकारची भांडणे-वाद प्रत्येक पक्षात असे सांगून त्यांनी सावरुन घेण्याचा प्रयत्न केला असला तरीही जनतेला हे काही पटणारे नाही. त्यामुळे यावेळी पक्षाची सत्ता यावेळी जाणार हे जवळपास नक्की झाले आहे. किंबहूना अनेकांना आपल्या पक्षाचा पराभव होणार याची कल्पना असल्यामुळे अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. मात्र समाजवादी पक्षाने एक लक्षात घेतले पाहिजे की, आपण याचा फायदा भाजपाला करुन देत आहोत. सध्याच्या यादवी स्थितीत पक्षातील नेत्यांपासून ते कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांच्यातील विश्‍वास संपुष्टात आला आहे. मात्र अशा वर्तनामुळे समाजवादी पक्ष भाजपाला अप्रत्यक्षरित्या मदत करीत आहे. उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्ष हा लोहियावादाचा वारसा सांगणारा आता एकमेव पक्ष शिल्लक राहिला आहे. जयप्रकाश नारायण यांच्या तालमीत तयार झालेल्या मुलायमसिंग यांच्या पक्षाला अशा प्रकारे यादवीने घेरावे ही दुदैवी बाब म्हटली पाहिजे. पाच वर्षांपूर्वी अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाला मिळवून दिलेले यश हे लोहियावादाचे पुनरुज्जीवन मानले जात होते. अखिलेश यांचे सार्वजनिक जीवनात कॉम्प्युटर, इंग्रजीला महत्त्व मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आधुनिक काळातील राजकारण हा वडील मुलायमसिंह यांच्या प्रतिगामी, बुरसटलेल्या राजकारणाला छेद होता. त्यात मायावती, भाजपला नेस्तनाबूत केल्याने त्यांच्याबद्दल एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. त्या वेळी अखिलेश यांची मुख्यमंत्रिपदी झालेली निवड घराणेशाहीचा भाग असला तरी पक्षाला एक तरुण चेहरा देण्याचे शहाणपणाचे राजकारण मुलायमसिंह खेळलेे होते. अखिलेश सरकारची पहिली तीन-साडेतीन वर्षे गुंडगिरी, जातीय दंगली, महिला अत्याचार अशा आरोपांनी गाजली. तरीही या काळात अखिलेश यांची पक्षावरची पकड कमी झाली नव्हती किंवा त्यांची लोकप्रियता वेगानेही घसरलेली नव्हती. दुसरीकडे सत्ता घरातल्या माणसांमध्ये वाटून गेल्याने मुख्यमंत्रिपदाला धोकाही नव्हता. पण जसे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले तसे घरातून एकेकाचे विरोधाचे सूर बाहेर येऊ लागले. शिवपाल यादव, रामगोपाल यादव, मुलायमसिंह, अमरसिंह, आझम खान अशा प्रभावशाली नेत्यांनी आपले स्वार्थाचे राजकारण सुरू केले आणि समाजवादी पक्षाचा पाया खिळखिळा होऊ लागला. आता पक्षावर कब्जा करण्यासाठी अखिलेश त्यांचे रामगोपाल यादव यांच्यासारखे समर्थक मुलायमसिंह-अमरसिंह-शिवपाल यादव असे दोन गट पुढे सरसावले. सध्याच्या स्थितीत अखिलेश यांच्या मागे पक्षातला बडा कुणीही नेता नाही. मात्र त्यांनी तरुणांमध्ये एक स्थान मिळविले आहे आणि त्यामुळेच मुलायमसिंह यादव यांना अखिलेशला पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करताना घरातूनच विरोध झेलावा लागतोय. अखिलेश यांनी पक्षामध्ये स्वत:चा गट जन्मास घातलेला नाही. समाजवादी पक्षात अन्य पक्षांसारखे प्रादेशिक प्रभावशाली नेते आहेत. प्रत्येक नेत्याने आपला प्रदेश वाटून घेतला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात रामगोपाल यादव, दुआब-मैनपुरी-इटावा भागात शिवपाल यादव, रोहिलाखंडमध्ये आझम खान यांचा दबदबा आहे. अमरसिंहसारखे पक्षात पुनर्वापसी केलेले नेते जोडाजोडीच्या राजकारणापेक्षा तोडातोडीचे राजकारण करण्यात माहीर आहेत. प्रत्येक नेत्याने आपल्या जनाधाराच्या माध्यमातून राज्यात पक्ष विस्तारत नेला आहे. अखिलेश त्या तुलनेत नवखे आहेत. पण त्यांची लोकप्रियता तरुण वर्गात अधिक आहे. एकुणात समाजवादी पक्ष ज्या पद्धतीने वाटचाल करत आहे त्यात मूळ लोहियावादाची तत्वे मागे पडत चालली आहे. मुलायमसिंह पक्षावर पुन्हा मांड ठोकून लोहियावाद आजही जिवंत असल्याचे सांगत असले तरी उत्तर प्रदेशातील तरुण मतदाराला लोहियावाद या घडीला उलगडून सांगणे पक्षाच्या आवाक्याबाहेरचे आहे. नेतेच स्वत:चा गड सांभाळण्यासाठी बंडखोरीचे झेंडे उभे करत असतील तर त्यात तत्त्वज्ञानाचा बळी जातो हा इतिहास आहे. यादव घराण्यातील ही यादवी त्यांच्या पायावर धोंडा पाडून घेणार आहे. कारण यातून मुलायमसिंग यांच्यापुढे अनेक प्रश्‍नचिन्ह उभी राहिली आहेत. एकीकडे आपला मुलगा तर जुसरीकडे आपल्या दुसर्‍या पत्नीचा आग्रह या कात्रीत मुलायमसिंग अडकले आहेत. पक्षावर आज घराणेशाहीची पूर्ण पकड आहे. अर्थात हाच पक्षाचा आत्मा आहे. यापासून दूर जाण्याचे काम मुलायमसिंग आता करु शकत नाहीत. अशा प्रकारे या यादवीच्या गोंधळात पक्षाला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. उत्तरप्रदेशात मुलायमसिंग यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष पुनह सत्तेत येण्याची चिन्हे धुसर दिसत आहेत.
-----------------------------------------------------------

0 Response to "समाजवादी पक्षातील यादवी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel