-->
चीनी मालावरील बहिष्कार; किती खरा किती खोटा

चीनी मालावरील बहिष्कार; किती खरा किती खोटा

रविवार दि. ३० ऑक्टोबर २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
चीनी मालावरील बहिष्कार; किती खरा किती खोटा
--------------------------------------
एन्ट्रो- चीन सध्या बौध्दीक संपत्तीत मागे आहे. सध्या त्यांची उत्पादनात ढोर मेहनत सुरु आहे. मात्र यातून त्यांनी जगावर आपले अधिराज्य स्थापन केल्यासारखी स्थिती आहे. आपल्याला जर चीनी मालावर मात करायची असले तर चीनपेक्षा स्वस्त उत्पादने कशी उत्पादीत करता येतील ते पहावे लागेल. चीनच्या मालावर बहिष्कार घालणे हे काही त्यावरील उत्तर ठरणार नाही. आपला राष्ट्रवाद जर व्यक्त करावयाचा असेल तर चीनला अस्वस्थ करण्यासाठी त्यांच्या पेक्षा स्वस्त माल उत्पादीत करणे हेच त्यावरील उत्तर ठरु शकते. चीनी मालावर बहिष्काराची भाषा वापरुन आपण बाष्कळ राष्ट्रप्रेम व्यक्त करण्यात काहीच अर्थ नाही...
-------------------------------------------------------
सध्या चीनचा माल न वापरण्याविषयी ठिकठिकाणी शपथा घेतल्या जात आहेत. एका जैन धर्मगुरुने तर आपल्या धर्मातील व्यापार्‍यांना चीनशी व्यापार व व्यवहार तोडण्याचेे आवाहन केले आहे. जर त्यांनी चीनशी व्यवहार केला तर तो राष्ट्रद्रोहच ठरेल असे सांगितले आहे. यावेळी मुंबईतील लालबागच्या काही व्यापार्‍यांनी चीनी माल विकणार नाही असे फलक लावले आहेत. सरकारने मात्र अधिकृतरित्या चीनशी काही व्यापारी व औद्योगिक संबंध तोडलेले नाहीत. आज बाजारात प्रत्येक वस्तू चीनी मिळत आहेत व या वस्तू स्वस्तात मिळतात हेच त्यांचे मुख्य आकर्षण ठरले आहे. सध्याच्या महागाईत ग्राहकांना अनेक वस्तू कमी किंमतीत उपलब्ध करुन एक प्रकारचा दिलासा दिला आहे. मात्र आता जर चीनी मालाच्या बहिष्काराचे आवाहान पाळावयाचे झाल्यास काही गोष्टी आपल्याला पूर्णपणे वापरावयाच्या सोडून द्याव्या लागतील. यातील पहिली वस्तू म्हणजडे, मोबाईल. सध्या प्रत्येकाचा जीव की प्राण असलेला हा मोबाईल चीनमध्येच बनविला जातो. अगदी या क्षेत्रातली उत्कृष्ट तंत्रज्ञान असलेल्या ऍपल या मोबाईलचे उत्पादनही चीनमध्येच होते. एवढेच कशाला आपल्याकडे भारतीय मोबाईल कंपन्या म्हणून ज्या मायक्रोमॅक्स, लावा, इंटेक्स कंपन्यांची उत्पादने ओळखली जातात त्यांचे सुटे भागही चीनमध्येच तयार केले जातात. त्यामुळे आपल्याला मोबाईलचा वापर पूर्णपणे थांबवावा लागेल. सध्या ई बाजारपेठ जबरदस्त फुलली आहे. कारण ग्राहकांना स्वस्त माल याच कंपन्या पुरवू शकतात. त्यामुळे फ्लिफकार्ट, ऍमेझॉन, स्नॅपडिल या कंपन्या भरभरून चीनी माल विकत आहेत. चीनमधून सध्या अनेक महत्वाच्या बाबी आयात केल्या जातात. यातील भारतात आयात केल्या जाणार्‍या कच्च्या तेलापैकी सुमारे ३४ टक्के कच्चे तेल चीनवरुन येते. एकूण आयातीच्या १२ टक्के सोने आणि चांदी ही चीनमधून आयात होते. यंत्रसामग्री  एकूण आयातीच्या सुमारे १० टक्के चीनवरुन येते. मे २०१५ मध्ये चीनची ही आयात २ अब्ज ८५ कोटी डॉलरची होती. तर सप्टेंबर २०१५ मध्ये ती ४ अब्ज ३८ कोटी डॉलरवर पोहोचली. त्यावरुन आपली चीनवरुन केली जाणारी आयात किती वाढली आहे हे लक्षात येते. चीनचा आपला व्यवहार वाढत चालला आहे याचे एकमेव कारण म्हणजे चीनी माल हा अतिशय स्वस्त असतो. चीनी मालावर बहिष्कार घालण्यापेक्षा आपण आपल्या देशात स्वस्तात माल कशा प्रकारे उत्पादीत करु शकतो हे तपासणे गरजेचे आहे. आपण आपले नेहमीच गुणगान गाताना आपल्याकडे असलेली लोकशाही, इंग्रजी भाषेचे ज्ञान, अत्याधुनिक शेअर बाजार, तंत्रज्ञ या जमेच्या बाजू आहेत असे सांगतो. मात्र चीनकडे या बाबी नसूनही त्यांनी भारतावर मात करुन जगातील उत्पादनाचे एक महत्वाचे हब म्हणून नाव कमाविले आहे. चीनने आपल्याकडे गुंतवणूक आकर्षित करताना प्रामुख्याने उत्पादन क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याकडे रोजगारही उपलब्ध झाला व जगात ते निर्यात करु शकतात. त्यांनी पहिल्यापासून जगातील सर्वात मोठे उत्पादन आपल्याकडे झाले पाहिजे याबाबत आग्रह धरला होता. ज्यावेळी चीनमध्ये ऑलिंम्पिकची तयारी सुरु होती त्यावेळी त्यांनी जगातील सर्वाधिक पोलाद उत्पादन करण्यासाठी पावले उचलली. आज ऑलिंम्पिक झाले तरीही चीन जगाला सर्वाधिक पोलादाची निर्यात करतो. जागतिक खेळण्यांच्या बाजारातील ७० टक्के, झिपर्सच्या उत्पादनातील ६० टक्के हिस्सा, इतकेच काय जगभरात व्यापार होणार्‍या कापड, सोलर फोटोव्होल्टेक सेल्स, आयटीपूरक सामग्री व हार्डवेअरचा तिसरा हिस्सा हा चीनमधून तयार होतो. आपण आज कितीही गप्पा केल्या तरी आपल्यापुढे चीन किमान पन्नास वर्षे गेला आहे. त्यांनी ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत त्या विकसीत देशांनाही मागे टाकणार्‍या आहेत. चीन उद्योगाला आकर्षित करण्यासाठी त्यांना सर्व पायाभूत सुविधा एका झटक्यात देतो. त्यामुळे तेथे जागतिक गुंतवणूकदार आकर्षित होतो. त्याउलट आपल्याकडे अजून पायाभूत सुविधांच्या नावाने बोंबच आहे. उद्योगांना जमीन ताब्यात घेण्यासाठी मोठी सर्कस करावी लागते. त्यामुळे आज अनेक प्रकल्प रखडले आहेत. जागतिक पातळीवर भारतीयांच्या बौद्धिक प्रवीणतेला मोठे मोल आहे, त्यात चीनला आपण खूप मागे टाकले आहे. आपल्या याच गुणाचे व्यावसायिक सामर्थ्य अधिकाधिक पुढे आणले जाईल, हाच खरा आर्थिक राष्ट्रवाद ठरेल. भारतीयांच्या कल्पकतेला तोड नाही. पण त्या कल्पकतेला प्रत्यक्ष उद्यमशीलतेची जोड मिळेल असे वातावरण तयार व्हायला हवे. अनेक भारतीय वैज्ञानिक बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) मिळविताना दिसतात, पण या संशोधनांनी प्रत्यक्ष नवनिर्माणाचे रूप धारण केल्याचे क्वचितच आढळून येते. भविष्यात आपल्याकडील संशोधनाचे उद्योगात रुपांतर झाल्यास आपण जगावर अधिराज्य स्थापन करु शकतो. त्याचबरोबर चीन सध्या बौध्दीक संपत्तीत मागे आहे. सध्या त्यांची उत्पादनात ढोर मेहनत सुरु आहे. मात्र यातून त्यांनी जगावर आपले अधिराज्य स्थापन केल्यासारखी स्थिती आहे. आपल्याला जर चीनी मालावर मात करायची असले तर चीनपेक्षा स्वस्त उत्पादने कशी उत्पादीत करता येतील ते पहावे लागेल. चीनच्या मालावर बहिष्कार घालणे हे काही त्यावरील उत्तर ठरणार नाही. आपला राष्ट्रवाद जर व्यक्त करावयाचा असेल तर चीनला अस्वस्थ करण्यासाठी त्यांच्या पेक्षा स्वस्त माल उत्पादीत करणे हेच त्यावरील उत्तर ठरु शकते. भारतात मेक इन इंडियाला प्रोत्साहन दिले जात असले तरी चीनमधून आयात होणार्‍या वस्तू येथे तयार करणे व्यावसायिकदृष्टया परवडणारे नाही, असा विशेषत: सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा दावा आहे. त्याला पहिले सबळ कारण हे चीनमधील किमान उत्पादन खर्च. त्यालाही कमीत कमी कर्मचारी-कामगार वेतन हे निमित्त आहे. शिवाय कमी कर रचनाही त्याला कारणीभूत आहे. भारतात करांबाबत तर सामान्य ग्राहकांपासून ते मोठया उद्योजकांपर्यंत सर्वाचीच सरकारबद्दल ओरड आहेच. शिवाय कमी वेतनात आणि मुळातच कमी संख्येने उपलब्ध होणारे कुशल मनुष्यबळ ही कमतरताही येथे जाणवते. परिणामी अशा व्यवसाय वातावरणात एवढया स्वस्तात इथे उत्पादन निर्मिती करणे शक्यच नाही, अशी भारतीय उद्योजकांची मानसिकता आहे. त्यासाठी सरकार काही उपाययोजना आखणार आहे किंवा नाही ते पहावे लागेल. अन्यथा चीनी मालावर बहिष्काराची भाषा वापरुन आपण बाष्कळ राष्ट्रप्रेम व्यक्त करीत बसू.
---------------------------------------------------------

0 Response to "चीनी मालावरील बहिष्कार; किती खरा किती खोटा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel