-->
सोन्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे स्वागतार्ह धोरण

सोन्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे स्वागतार्ह धोरण

 सोन्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे स्वागतार्ह धोरण 
Published on 07 Nov-2011 ARTHPRAVA
 प्रसाद केरकर
 गेल्या वर्षात सोन्याचे व्यवहार करणार्‍या म्हणजे सोने तारण ठेवून कर्ज देणार्‍या कंपन्यांचे देशात पीक आले आहे. या कंपन्यांच्या व्यवहारांवर आता रिझर्व्ह बँकेने लक्ष ठेवण्याचे ठरवले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या धोरणाचे स्वागत व्हावे. आपल्याकडे एखादा व्यवसाय जोरात असला की त्या उद्योगातल्या कंपन्यांचे पीक येते आणि त्यातूनच अनेकदा गैरव्यवहारांना खतपाणी घातले जाते. पूर्वी बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, लिझिंग कंपन्या, मायक्रोफायनान्स कंपन्या यांच्याबाबतीत असे झाले आहे. या उद्योगातील धंदा तेजीत आल्यावर कंपन्यांचे अमाप पीक आले आणि यातून पुढे गैरव्यवहार झाले. सोन्यावर कर्ज देणार्‍या कंपन्यांमध्ये सध्या तरी काही गडबडी नाहीत. मात्र सावधगिरी बाळगण्याच्या हेतूने रिझर्व्ह बँकेने ही उपाययोजना हाती घेतली आहे
सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने तसेच बाजारातील सोन्याची तरलता लक्षात घेता सोन्यावर कर्ज देणार्‍या कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अर्थात पूर्वीदेखील हा व्यवसाय तेजीत होता; परंतु सोनारांच्या पेढय़ाच कर्ज देण्याचा व्यवसाय करीत असत. आता मात्र हा व्यवसाय कंपन्यांनी काबीज करण्यास सुरुवात केली आहे. सध्या तरी या व्यवसायात काही गैरप्रकार नाहीत. अर्थात भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रिझर्व्ह बँकेने आतापासूनच या व्यवसाय करणार्‍या कंपन्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. सोन्यावर कर्ज देणार्‍या कंपन्या या मालमत्तेवर कर्ज देत आहेत. त्यामुळे यात विशेष काही गैरप्रकार होण्याची शक्यता नाही. हा व्यवसाय आकर्षक असल्याचे आढळताच अनेकांनी या व्यवसायाची माहिती नसतानादेखील यात पाऊल टाकले. सध्या या व्यवसायात असलेल्या बँकांवर रिझर्व्ह बँकेचे बरोबर लक्ष असते. मात्र सध्या ज्या कंपन्या या व्यवसायात आल्या आहेत त्यांची नोंदणी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून करण्यात आली आहे. सोन्यावर कर्ज देणार्‍या कंपन्या सध्या ग्राहकांकडून 24 टक्के व्याज आकारतात. गेल्या वर्षात सोन्याच्या किमती जवळपास 35 टक्क्यांनी वाढून 27 हजार रुपयांवर पोहचल्या. सोन्यावर कर्ज देणार्‍या कंपन्या ‘तीन मिनिटात कर्ज’ देण्याच्या जाहिराती देऊन ग्राहकांना भुलवत आहेत. व्यापारी बँकांकडून कर्ज घेताना अनेक कागदपत्रे तर द्यावीच लागतात आणि प्रत्यक्षात कर्ज मिळायला महिनाभर थांबावे लागते. यातून बँकांना ही कज्रे देण्यासाठी सुलभता यावी म्हणून रिझर्व्ह बँकेने प्राधान्यतेच्या कर्जातून सोन्याची कज्रे वगळण्याचा निर्णय घेतला. 
सध्या सोने तेजीत असल्यामुळे या कंपन्यांसाठी कोणतेही चिंतेचे कारण नाही. मात्र सोन्याच्या किमती कोसळल्या तर मात्र या कंपन्या धोक्यात येऊ शकतात. सोन्यावर कज्रे देणार्‍या या कंपन्या बँकांकडून, रोखे विक्रीस काढून वा खासगी मार्गाने पैसे उभारत असतात. जर सोन्याचे दर कोसळले तर या कंपन्यांपुढे त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे कठीण जाईल; परंतु सोने जोपर्यंत तेजीत आहे तोपर्यंत तरी या कंपन्यांपुढे काही धोका नाही. केरळस्थित सोन्यावर कर्ज देणार्‍या एका कंपनीने यंदा आपली उलाढाल 110 टक्क्याने वाढवली तर निव्वळ नफा त्यांचा 88 टक्क्यांनी वधारला. यावरून कज्रे देणार्‍या या कंपन्या किती झपाट्याने विस्तारत आहेत ते समजते. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अंदाजानुसार, भारतातील घरोघरी सुमारे 18 हजार टन सोने असावे असा अंदाज आहे. देशात एकूण असलेल्या 256 अब्ज डॉलरच्या घरगुती बचतीपैकी सोन्याचा वाटा सुमारे सात टक्के आहे. सोन्याची देशातली मागणी झपाट्याने वाढत असून सोने महाग झाले तरी ही मागणी कायमच आहे. 
सोन्यावर कर्ज देण्याच्या कंपन्यांचे पीक आलेले असले तरी सोन्याच्या किमती चढय़ा आहेत तोपर्यंत तरी या कंपन्यांना कोणताही धोका नाही; परंतु भविष्यात या कंपन्यांच्या कारभारात गैरप्रकार आढळून ग्राहकांवर संकट येऊ नये म्हणून रिझर्व्ह बँकेने आतापासूनच या कंपन्यांवर लक्ष ठेवण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह ठरावी. 
Prasadkerkar73@gmail.com

0 Response to "सोन्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे स्वागतार्ह धोरण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel