-->
संपादकीय पान बुधवार दि. १५ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
भ्रष्टाचारी येदीयुरप्पा पुन्हा भाजपामध्ये
--------------------------------
एकेकाळी भ्रष्टाचारामुळे राजीनामा द्यावा लागलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत. खाणकामाचे बेकायदा परवाने देऊन त्या बदल्यात अफाट माया जमवल्याच्या प्रकरणात येड्डींचे पद गेले होते.  सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय या प्रकरणाची चौकशी करीत आहे. या सर्व प्रकरणात लालकृष्ण अडवाणी यांनी प्रथमपासून हे भ्रष्ट येड्डी आपल्या पक्षात नकोत अशी भूमिका घेतली होती. नरेंद्र मोदी दिल्लीच्या राजकारणात येताक्षणी बदल सुरू झाला. इतका की, पक्षाध्यक्ष राजनाथसिंह स्वत: येड्डींच्या शिमोगा इथल्या घरी जाऊन त्यांच्या पक्षपुन:प्रवेशाची घोषणा करते झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचार हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरणार आहे. याच मुद्द्याच्या आधाराने आम आदमी पक्षाने दिल्लीत सत्ता ताब्यात मिळविली. केवळ दिल्लीच नव्हे तर त्यांना देशातील  अनेक भागातून चांगला पाठिंबा मिळत आहे. येड्डीयुरप्पा हे लिंगायत समाजाचे आहेत आणि त्यांच्या पक्षातून जाण्याची या समाजाची मते भाजपाला मिळाली नव्हती. परिणामी कॉँग्रेसचा फायदा झाला होता. कर्नाटकात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी याच आधारावर भाजपची वाट लावली होती. त्यांच्या कर्नाटक जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात मते खाल्यामुळेच कॉंग्रेसला अनपेक्षित असे स्पष्ट बहुमत मिळाले होते. हे स्पष्टीकरण मान्य करायचे झाल्यास दोन प्रश्न उद्भवतात. कर्नाटक हे काही उत्तर भारतातल्याप्रमाणे कथित मागास किंवा जातींच्या बाबत कर्मठ चौकटी असलेले राज्य नाही. उलट बंगलोरच्या आयटी उद्योगामुळे सर्व जगात नाव झालेला, काहीसा संपन्न असा हा प्रदेश आहे. आम आदमी पक्षाचे जाळे अद्याप या प्रांतात तयार झालेले नाही. पण भ्रष्टाचारविरोधी लढाईचा थोडाफार परिणाम नक्कीच झाला आहे. येड्डी यांना त्यामुळेच तर खुर्ची गमवावी लागली होती. अशा स्थितीत स्वच्छ नेत्यांना पुढे करणे हे भाजपला अधिक फायदेशीर ठरणार नाही काय?  परंतु भाजपाने आपले जातीचे कार्ड वापरत पुन्हा एकदा कर्नाटकातील मते मिळविण्यासाठी येदुयुरप्पा यांना पक्षात घेतले आहे.
भ्रष्टाचारमुक्त समाज आणि राजकारण ही कल्पना सर्वांसाठी आकर्षक आहे. पण प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी सर्वांसाठीच कठीण आहे. येड्डी हे ज्या कोणत्या भल्याबु-या मार्गाने लिंगायतांचे कल्याण करतील, राखीव जागा मिळवून देतील, निधी ओढून आणतील ते लिंगायतांना हवे आहे असे यातले गृहीतक आहे. त्यामुळे भाजपा हा देखील एक भ्रष्ट राजकारण्यांना संरक्षण देणारा पक्ष आहे अशी समजूत बळावणार आहे. परंतु सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी ठेवलेल्या नरेंद्र मोदी यांना आपल्या कर्नाटकातील गमावलेल्या जागा पुन्हा मिळतील असे वाटत असेल तर तो त्यांचा निव्वळ मूर्खपणा आहे. येदुयुरप्पा यांच्या पक्षात येण्यामुळे भाजपाला मते मिळतील अशी अपेक्षा असली तरीही उलटपक्षी भाजपाचे यामुळे नुकसानच जास्त होणार आहे. एकीकडे भाजपात अशा प्रकारे भ्रष्टाचार्‍यांची पाठराखण करण्याचे काम सुरु असताना सत्ताधारी कॉँग्रेस पक्षही याहून काही वेगळा नाही. या पक्षातही अशीच स्थिती आहे. आम आदमी पक्षाने भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करुन खर्‍या अर्थाने सर्वच विरोधी पक्षांची मोठी गोची केली आहे असे म्हणावयास काहीच हरकत नाही.
----------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel