-->
इतिहासाची काढलेली खपली!

इतिहासाची काढलेली खपली!

संपादकीय पान मंगळवार दि. २२ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
इतिहासाची काढलेली खपली!
इतिहासाच्या खपल्या काढून लोकांचे अनेक ज्वलंत प्रश्‍नावरील मूळ मुद्यावरुन लक्ष विचलीत करण्याचे काम केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या करीत आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू हा नेहमीच गूढ वाटत आला होता. प्रामुख्याने त्यांच्या निधनाबाबत त्यांच्या नातेवाईकांचे कधीच समाधान झाले नाही. आज त्यांच्या निधनानंतरही त्यांचे गूढ कायम आहे. खरे तर सध्याच्या स्थितीत नेताजींच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी त्यांच्या संदर्भातील फायली खुल्या करण्याची काही गरज नव्हती. गेले कित्येक दिवस जे गूढ आहे ते गूढ अजून काही काळ राहिले असते तर काही मोठा फरक पडला नसता. परंतु स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंतचे कॉँग्रेस सरकार किती नालायक, कपटी होते हे त्यांना जनतेला दाखवून द्यायचे आहे. अशा प्रकारे कॉँग्रेसची आजवरची राजवट ही जुलमी होती असे लोकांवर बिंबविणे भाजपाचे सरकार टिकण्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच इंदिरा गांधी व पंडित नेहरु यांची टपाल तिकिटेही नष्ट करण्याचे काम हे सरकार करीत आहे. मात्र इतिहासाची हे भूते उकरुन काढल्यामुळे त्यातील एखादे भूत आपल्याही मानगुटीवर बसू शकते याची कल्पना मोदी व बॅनर्जींना असण्याची आवश्यकता आहे. परंतु कॉँग्रेस व्देशाने ठासून भरलेलल्या या नेत्यांनी नेताजींची इतिहासाची पाने चाळण्यास सुरुवात केली आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नेताजींसंबंधांतील गोपनीय अशा ६४ फायली जनतेसाठी खुल्या केल्यानंतर हे गूढ संपुष्टात यायला हवे होते; प्रत्यक्षात या १२०० कागदपत्रांमधून बाहेर आलेल्या माहितीचा जो अंश सध्या चर्चेत आला आहे, तो बघता नेताजी नावाची दंतकथा ही अधिकाधिक रहस्यमय होत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे नेताजी हे १९४५ मधील त्या विमान अपघातानंतरही जिवंत होते वा असा काही अपघातच झाला नव्हता, असे सूचित करणारी या कागदपत्रांमधून बाहेर आलेली माहिती! हे वास्तव तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनीच उघड होऊ दिले नाही, हा अर्थ काढून पंडित नेहरूंची बदनामी करणाचा घाट घालण्यात आला आहे. यामुळे खरा इतिहास पुढे यावा अशी या राजकारण्यांची इच्छा आहे की, यातून कुरघोडीचे राजकारण दामटायचे आहे अशी शंका यावी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी जनतेत प्रचंड आकर्षण आहे. स्वातंत्र्यलढा आणि दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरच्या टप्प्यात ते काय करीत होते, त्यांचे पुढे नेमके काय झाले, हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा जनतेत असणे स्वाभाविक आहे. इतिहासाभ्यासक आणि जिज्ञासूंचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळेच इतिहासाच्या कोणत्या अज्ञात कोपर्‍यांवर ही कागदपत्रे प्रकाश टाकतात, याविषयी सविस्तर चर्चा विविध अंगांनी व्हायला पाहिजे. नेताजी ब्रिटिशांच्या बंदीवासातून ते सहीसलामत निसटले आणि त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन करून, जपानच्या मदतीने ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिल्यामुळे त्यांच्या भोवतीचे वलय सतत वाढत गेले. अर्थात, नेताजी तसेच गांधी-नेहरू आणि कॉंग्रेस यांचे उद्दिष्ट एकच होते आणि ते म्हणजे गुलामगिरीच्या जोखडातून भारत मुक्त करणे. फक्त त्यांचे मार्ग भिन्न होते. गांधी-नेहरूंना देशाच्या स्वातंत्र्याइतकेच जगात लोकशाहीचे रक्षण व्हावे, असे वाटत होते. त्यामुळेच महायुद्धात हिटरलच्या फॅसिझमला विरोध हे त्यांच्या भूमिकांचे सूत्र होते. तर स्वातंत्र्यासाठी निर्माण झालेल्या अनुकूल परिस्थितीचा फायदा उठविलाच पाहिजे, अशी नेताजींची भूमिका होती. त्यासाठी ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घेण्यात काही चूक नाही, असे त्यांना वाटत होते. अर्थात भारतीय स्वातंत्र्यकाळात असे दोन प्रवाह हे नेहमीच होते. मात्र जनता ही महात्मा गांधी व नेहरु यांच्या प्रभावी व्यक्तीमत्वाने भारावली होती. त्यांची ही वैचारिक लढाई नेहमीच सुरु होती. जगातील प्रत्येक लढ्यात, संघर्षात असे दोन प्रवाह हे आढळतातच. अर्थात ज्यांच्यामागे जनता राहाते त्यांचाच नेहमी विजय होत आलेला आहे. खरे तर इतिहास कोणत्याही परिस्थितीत फायलींमधील दस्ताऐवजांमध्ये कुलूपबंद राहता कामा नये. प्रत्येक सत्य हे प्रकाशात यायलाच हवे आणि त्या सत्याचा आधार घेऊन इतिहासाच्या नोंदी करणे तसेच त्याचा अन्वयार्थ लावणे, हे अभ्यासू इतिहासकारांचे काम आहे. त्याचबरोबर इतिहासाकडे निकोपपणे पाहता आले पाहिजे. आपण मात्र तसे पाहत नाही हे आपले दुदैव आहे. पंडित नेहरुंनी व एकूणच कॉँग्रेस पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असा जर इतिहास असेल तर त्यामागचे नेहरुंची भूमिकाही तपासणे महत्वाचे ठरते. नेताजी १९४५ नंतर जिवंत असते, तर त्यांनी हिटलरशी केलेल्या कथित हातमिळवणीमुळे अमेरिकेच्या स्वाधीन करावे लागले असते. त्यामुळेच नेताजी स्वत: भारतात न परतता आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या हेतूसाठी रशियात गेले, असे आता सांगण्यात येत आहे. सर्वकागदपत्रे खुली झाल्यानंतर कदाचित या घडामोडींवर पूर्ण प्रकाश पडू शकेल. पश्‍चिम बंगालची जनता ही नेताजींना हीरो मानते आणि त्यात काही गैरही नाही. त्यामुळेच ही कागदपत्रे खुली करून, ममतादीदींनी वर्षभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीतील हुकमाचा एक्का खुला केला आहे. मोदी सरकारला इतिहास नव्याने तपासायचा असेल तर त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींच्या मृत्यूची कागदपत्रे खुली करावीत. इतिहासाच्या जखमांवरील खपली काढणे सोपे असते परंतु त्या जखमा भळाभळा वाहू लागल्या की कोणत्याही सत्ताधार्‍यांना महाग पडू शकते. सध्या आपल्याला अशा खपल्या काढण्याची आवश्यकता नाही तर विकासाकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. इतिहासातील प्रत्येक कप्पा शोधण्याचा प्रयत्न करु नये. सध्या फक्त प्रेरणादायी इतिहासच जनतेपुढे ठेवावा यातच शहाणपण आहे.
-----------------------------------------------------------------------------

0 Response to "इतिहासाची काढलेली खपली!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel