-->
संपादकीय पान सोमवार दि. २२ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
शिवतीर्थावरील नवी फ्लोअर ऍडजेस्टमेंट
----------------------------
लोकसभा निवडणुकीनंतर गेले महिनाभर ज्या निवडणुकीची प्रामुख्याने चर्चा सुरु होती त्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुरेश टोकरे व उपाध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्षाचे अरविंद म्हात्रे हे अपेक्षेप्रमाणे विजयी झाले आहेत. अशा प्रकारे प्रदीर्घ काळानंतर राष्ट्रवादी पुन्हा एकदा रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या वर्तुळात आला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बंडखोर उमेदवार महेंद्र दळवी यांनी आपल्याला पक्ष उमेदवारी देत नाही हे स्पष्ट झाल्यावर बंडखोरी केली आणि अध्यक्षपदाची निवडणूक लढविली. शिवसेनेच्या सदस्यांनी त्यांच्या बंडखोरीला खतपाणी घालूनही त्याच काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांच्या पदरी अपेक्षेप्रमाणे पराजय आलाच. यापूर्वी जिल्हा परिषदेत शेकापच्या सदस्यांना शिवसेनेच्या सदस्यांनी पाठिंबा देऊन गेली अडीज वर्षे कारभार केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेकापने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेऊन आपण स्वबळावर उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यावेळीपासूनच जिल्हा परिषदेतील शेकाप-शिवसेना यांची सत्ता संपुष्टात येणार अशी चर्चा रंगत होती. या पार्श्‍वभूमीवर राज्यात शिवतीर्थावर काही नवीन समिकरणे मांडली जाणार अशी चर्चा रंगत होती. सध्याचे विविध पक्षांचे बलाबळ पाहता शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांच्यापैकी कुणाला तरी एकाला शेकापचा पाठिंबा घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेतील बहुमत सिध्द करता येणार नव्हते. शेकाप फ्लोअर ऍडजेस्टमेंटमध्ये कुणाला साथ देणार? राष्ट्रवादीला की शिवसेनेला अशी चर्चा जिल्ह्यात होती. सध्या असलेली सत्ताच कायम राहाणार की, काही नवीन समिकरणे मांडली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शेवटी शेकापच्या सदस्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देऊन त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला विजयी केले तर शेकापच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराला राष्ट्रवादीने मतदान करुन विजयी केले. ज्यावेळी विधानसभेपासून ते जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतीत कुठेही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसते त्यावेळी पक्षांना अशा प्रकारची फ्लोअर ऍडजेस्टमेंट करणे भाग पडते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर राजकारण नको अशी भूमिका असली तरीही राजकारण काही डावलता येत नाही. त्यामुळे तेथे कोणतीही विचारधारा किंवा पक्षीय राजकारण गौण ठरते. यातून केल्या जाणार्‍या आघाड्या किंवा युत्या या तात्कालीन स्थानिक पातळीवरील सत्ता चालविण्यासाठी केलेल्या फ्लोअर ऍडजेस्टमेंट असतात. यातून त्या पक्षाने आपल्या विचारधारेशी तडजोड करण्याचा प्रश्‍नच नसतो. सत्तेच्या मोहाने एका रात्रीत पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात उडी मारणारे बेडून आपल्याला सध्याच्या निवडणुकीच्या काळात बरेच पहावायास मिळतात. ही त्यांची सत्ता किंवा कंत्राटे मिळविण्याची केविलवाणी धडपड ठरते. रायगड जिल्ह्यात असे दलबदलू सध्या भरपूर सापडतील. नुकताच प्रशांत ठाकूर यांनी कॉँग्रेसचा त्याग करुन भाजपात केलेला प्रवेश हे त्याचे एक उत्तम उदाहरण ठरावे. मात्र अशा गलिच्छ राजकारणापासून शेकाप नेहमीच अलिप्त राहिला आहे. शेकापने मार्क्सवादाशी आपली नाळ कायम राखत आपल्या डाव्या, पुरोगामी विचारसरणीचा नेहमीच पुरस्कार केला आणि त्यादृष्टीने राजकारण केले. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी डाव्या विचाराच्या पुरोगामी पक्षांना एकत्र आणून त्यांची संयुक्त आघाडीच्या धर्तीवर समिती स्थापन करण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे व त्यातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारही घोषित झाले आहेत. रायगड जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेकापने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या घटनच्यापार्श्‍वभूमीवर राज्यातील डाव्या पक्षांच्या राजकारणावर त्याचा काडीमात्र फरक पडणार नाही. काही पत्रकबाज यातून काही संशोधन करुन नवीन समिकरणे मांडण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्याने शेकापच्या राजकारणावर व राज्यातील एकूणच डाव्या राजकारणावर काही फरक पडणार नाही. या नवीन फ्लोअर ऍडजेस्टमेंटमुळे जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलणार आहे हे मात्र निश्‍चित. या निवडणुकीत राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज भरुन भूईसपाट झालेले महेंद्र दळवी हे आता शिवसेनेत प्रवेश करतील व आगामी निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवतील. केवळ सत्तेच्या लोभाने पक्ष बदलणार्‍यांना जनता कधीही माफ करीत नाही. अशा वेळा धनशक्तीचा नव्हे तर पक्ष निष्ठेचा विजय होतो. शेकाप म्हणजे डाव्या विचाराची बांधिलकी ज्यांनी सोडली ते संपले आहेत, असा इतिहास सांगतो. गेल्या सहा दशकांचा जिल्ह्यातील इतिहास पाहता शेकापचे काही नेते असे एका रात्रीत पक्ष सोडून गेले मात्र कार्यकर्ते शेकापबरोबर राहिले. त्यामुळे या नेत्यांची अवस्था दारुण झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर व आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अशाच प्रकारे इतिहासाची पुनरावृत्ती होईल. शेकाप वाढत जाईल आणि संधीसाधू अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्‍या तथाकथीत नेत्यांना जनता माती दाखविल.
-------------------------------------    

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel