-->
आरोग्याविषयी अनास्था

आरोग्याविषयी अनास्था

संपादकीय पान सोमवार दि. २१ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आरोग्याविषयी अनास्था
सरकारच्या प्रमुख जबाबदार्‍यांमध्ये अन्न, वस्त्र व निवारा पुरविणे याला सर्वोच्च प्राधान्याने आहे, त्याचबरोबर शिक्षण व आरोग्य यालाही तेवढेच महत्व आहे. शिक्षण व आरोग्य या दोन्ही बाबतीत सरकारचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे किंवा ते जाणूबुजून करण्यात आले आहे. शिक्षण हे तर आता सरकारने शिक्षणसम्राटांच्या हाती सोपविण्यात आले आहे. तसेच आरोग्य हे खासगी डॉक्टरांच्या हाती सुपूर्द करण्यात आले आहे. खरे तर सरकारने या दोन्ही गोष्टी कमीत कमी खर्चात पुरविणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकार ही जबाबदारी झटकत आहे. सध्या देशात प्रामुख्याने महाराष्ट्रातील मोठ्या शहरात तसेच ग्रामीण भागात तापाची जी साथ फैलावली आहे ते पाहता सरकारचे आरोग्याकडे किती लक्ष आहे ते समजू शकते. सध्या एच.१ एन१ या जीवाणूंव्दारे होणार्‍या तापाची मोठी साथ सर्वत्र फैलावली आहे. अर्थात सध्याच्या दिवसात ही साथ नेहमीच फैलावते. अक्टोबर हिट सुरु झाल्यावर ही साथ संपुष्टात येते आणि सरकार सुस्कारा सोडते. कारण ऑक्टोबर हिटमध्ये हे जीवाणू काही जगत नाहीत. त्यामुळे ही साथ आपोआट आटोक्यात येते. या तापाच्या जनजागृतीसाठी सरकार करोडो रुपयांच्या जाहीराती करते परंतु याचा प्रत्यक्षात काहीच उपयोग होत नाही. अर्थात ही साथ आली की हजारो लोक आपले जीव गमावून बसतात. यंदा या तापाच्या साथीमुळे ६७४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरवर्षी या तापामुळे प्राण गमाविणार्‍यांची संख्या वाढत जात आहे ही सर्वात चिंतेची बाब आहे. २००८ साली जगात हा ताप आढळला आणि हा जीवघेणा ताप आपल्याकडेही आला. यंदा या तापाची लागण सुमारे ७३०० जणांना झाल्याची अधिकृत आकडेवारी सांगते. परंतु प्रत्यक्षात याहून ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. देशतील एच१ एन१ तापाच्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यात आढळतात. या तापाने जे रुग्ण आपला प्राण गमावतात त्यांना योग्य औषधउपचार न मिळाल्याने निधन पावतात. २००९ ते २०१० साली हा ताप उफाळून वर आल्यावर काही वर्षे थंड झाला होता. २०१२ साली हा ताप आता संपुष्टात येतो की काय असे वाटत होते मात्र पुन्हा त्याने २०१५ साली उसळी घेतली. यात यामुळे निधन पावणार्‍यांचीही संख्या वाढली. केवळ हाच नव्हे तर दरवर्षी आपल्याकडे सर्वसाधारण तापाच्या दोन वेळा साथी येतात. अर्थात ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आहे त्यांना हा ताप पटकन होतो. सर्दी, खोकला झालेल्यांना हा ताप पटकन पकडतो. महत्वाचे म्हणजे अनेक सरकारी दवाखान्यातून याची औषधे गायब होतात. त्यामुळे अनेकांना परवडत नसताना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. मुंबईसारख्या शहरी भागात तीन-चार दिवस रुग्णालयात दाखल झाल्यास किमान तीस हजार रुपये आकारले जातात, अशी बातमी प्रसिध्द झाली होती. अशा प्रकारे डॉक्टर रुग्णांकडून लूट करीत आहेत. निमशहरी व ग्रामीण भागात एवढा खर्च येत नसला तरीही ग्रामीण भागातील लोकांना दहा हजार जरी खर्च झाला तरी तो मोठा ठरतो. सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारी रुग्णालयात ही सोय उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णालयात त्यांना यावे लागते. म्हणजेच सरकार अप्रत्यक्षपणे खासगी डॉक्टारंचे खीसे भरण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. अर्थातच यात सर्वसामान्य माणूस नाडला जातो. चांगली आरोग्य सेवा पुरविणे हे सरकारचे कर्त्यव्य आहे आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांनी हे तर्त्यव्य पार पाडले पाहिजे. अनेकदा सरकारी योजना चांगल्या असतात परंतु त्याला उपयोग सर्वांपर्यंत पोहोचत नाही. राजीव गांधी ही अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी जीवनदायी योजना ठरली आहे. यात अनेक महागडी ऑपरेशन्स केली जातात. परंतु गेल्या काही महिन्यात सरकारनेच त्यापायी दिली जाणार्‍या निधींची पूर्तता न केल्याने ही ऑपरेशन्स बंद पडली होती. खासगी रुग्णालयात आपल्याकडील अल्प उत्पन्नगटातील रुग्ण जाऊ शकत नाही, त्याला तो खर्च परवडत नाही हे देखील खरे आहे. त्यामुळे सरकारने या रुग्णांना दिलासा देण्यासाठी या योजनांमध्ये पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. सरकारची ही अनास्था गरीबांचे आयुष्य संपवू शकते. साधा ताप असो किंवा एखादा मोठा रोग प्रत्येकाला त्यावर औषधउपचार करता आला पाहिजे. जगात नवनवीन औषधांचा शोध लागल्यामुळे लोकांचे जीवनमान वाढले आहे. आपल्याकडे मात्र परवडणार्‍या किंमतीत औषधे उपलब्ध झाल्यास त्याचा जनतेला उपयोग होऊ शकतो.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "आरोग्याविषयी अनास्था"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel