भाजपाविरोधी आघाडी की बिघाडी?
27 फेब्रुवारी 2022च्या मोहोरसाठी चिंतन
भाजपाविरोधी आघाडी की बिघाडी?
उत्तरप्रदेशासह पाच राज्यांचे निकाल जसे जवळ येऊ लागले आहेत तसे देशातील विरोधी पक्षांच्या उर्मी जाग्या होण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालची निवडणूक जिंकल्यानंतर ममत बॅनर्जी यांनी भाजपेत्तर व कॉँग्रसेत्तर विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची हाक दिली होती. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. परंतु त्यापुढे फारसे काही झाले नाही. कारण ममता दिदींचा जो अक्राळविक्राळ स्वभाव आहे तो सर्वांना एकत्र बांधून ठेऊ शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे दिदींचा भावी पंतप्रधान बनण्याचा मनसुबा सध्या तरी त्यांना बसनात गुंडाळावा लागणार आहे. सध्याच्या अंदाजानुसार, उत्तरप्रदेशात भाजपाला भारी नुकसान होणार आहे (कदाचित सत्ताही जाऊ शकते) हे स्पष्ट होत असताना पुन्हा एकदा विरोधकांना बळ येऊ लागले आहे. उत्तरप्रदेशासह पाच राज्यात होणारी निवडणूक ही देशातील भविष्यातील राजकीय दिशा ठरविणारी आहे, हे नक्की. यंदा उत्तरप्रदेशात भाजपाच्या विरोधात समाजवादी पक्ष जीवाची बाजी लावून सर्व पातळ्यांवर लढत आहे. आपली मर्यादीत ताकद लक्षात घेऊनही कॉँग्रेसतर्फे प्रियांका गांधी यांनी जोर लावला आहे. त्यांच्या सभांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे, तसेच प्रियांका गांधी ज्या प्रकारे पत्रकारांना उत्तरे देत असतात ते पाहता स्वर्गिय इंदिरा गांधींची आठवण यावी. मात्र बहुजन समाज पक्षाच्या मायावतींनी भाजपापुढे सफशेल शरणागती पत्करली आहे. उत्तरप्रदेशात निकाल काहीही लागो, भाजपाची ताकद कमी होणार हे शंभर टक्के खरे आहे. मोदी व योगी विरोधकांवर प्रामुख्याने कॉँग्रेस व अखिलेश यादव यांच्यावर ज्या प्रकारे शब्दिक हल्ले चढवित आहेत ते पाहता भाजपाची जमीनीखालील वाळू घसरु लागली आहे, हे स्पष्ट दिसत आहे. देशातील स्थानिक व देशव्यापी राजकीय पक्षांना याची चाहूल लागली आहे. त्यामुळेच तेलंगणाचे मुख्यमंत्री राजेश्वरराव हे मुबंई दौऱ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटले व भाजपाविरोधी आघाडी करण्यासाठी त्यांनी गुफ्तगू केले. राजेश्वर राव हे काही कट्टर भाजपा विरोधक म्हणून ओळखले जात नाहीत. परंतु सध्या तरी त्यांनी मोदी विरोधी लाईन आक्रमकपणे घेतली आहे. भाजपाने यावेळच्या तसेच यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये हिंदू मते कशी एकवटतील व आपल्या पदरात कशी ती पडतील याची जबरदस्त आखणी गेल्या काही निवडणुकात केली आहे. आजवर गेल्या सात वर्षात त्यांना या सुत्रातून मोठे यश लाभले आहे. परंतु यावेळी त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होतो का ते पहावे लागले. जर भाजपाचा उत्तरप्रदेशात पराभव झाला तर तो भाजपासाठी मोठा धक्का असेल व केंद्रातील सरकार भविष्यात म्हणजे २०२४ साली पाडले जाऊ शकते याचे यातून सुतोवाचच होईल. मात्र काहीही करुन भाजपाचे पुन्हा योगी सरकार आले तर भाजपासाठी तो एक मोठा विजय असेलच, मात्र विरोधकांसाठी एक मोठा सेटबॅक ठरु शकतो. मात्र उत्तरप्रदेशात भाजपाचे सरकार आले तरीही २०२४ साली केंद्रातले भाजपा सरकार पाडले जाऊ शकते. अर्थातच त्याची काही गणिते लक्षात घेतली पाहिजेत. २०१९ साली भाजपाला जवळपास ४० टक्के मते पडली होती व भाजपाच्या विरोधकांना ६० टक्के मते होती. याचा अर्थ विरोधकांची मते एकवटली तर भाजपाचा पराभव करणे सहज शक्य आहे. यावरुन एक स्पष्ट जाणवते की मोदी विरोधातील मते जास्त आहेत, मात्र ती विखुरलेली आहेत. ही मते एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले तरच भाजपाचा पराभव शक्य आहे. परंतु विरोधी पक्षांना एकत्र आणणे ही काही सोपी बाब नाही. भाजपा सध्या विरोधकांच्या फुटीच्या जीवावरच ४० टक्के मते पदरात असतानाही संसदेत जास्त जागांवर विजयी होत आहे. यापूर्वी सत्तेत असताना कॉँग्रेसलाही विरोधी पक्षांच्या फुटीचा नेहमीच फायदा मिळत आला होता. आज परिस्थिती बदलली आहे, कॉँग्रेसच्या जागेवर सत्ताधारी म्हणून भाजपा आला आहे व त्यांना देखील विरोधकांच्या फुटीचा फायदा होतो आहे. जर विरोधकांना खरोखरीच भाजपाचा पराभव करावा असे वाटत असेल तर त्यांनी एकत्र येऊन निवडणुकांमध्ये मतांची विभागणी टाळण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात एकच उमेदवार दिला पाहिजे. तसे केले तरच भाजपाला एक मोठे आव्हान ठरेल. अशा प्रकारेच भाजपाचा पराभव करणे शक्य आहे. परंतु आपल्याकडे विरोधक अशा प्रकारे एकत्र येत नाहीत, एकास एक उमेदवार देणे आजवर शक्य झालेले नाही. परंतु विविध पक्षांनी त्याची आखणी केल्यास ही बाब अशक्यच आहे असे नव्हे. त्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केवळ एकाच व्यासपीठावर एकत्र येत असताना खालच्या कार्यकर्त्यापर्यंत ही एकजूट नेली पाहिजे. त्यासाठी ज्या पक्षाचे प्रभाव क्षेत्र आहे त्यांना तेतील उमेदवारी देऊन अन्य पक्षांनी त्या उमेदवारांला पाठिंबा दिला पाहिजे. असे झालेच तर भाजपाचा पराभव करणे शक्य आहे. सध्या मोदी सरकारची जी जनविरोधी धोरणे आहेत, त्याचा फायदा विरोधकांना उठविणे शक्य आहे. मात्र त्यासाठी योग्य आखणी केली गेली पाहिजे. शरद पवारांचा पक्ष जरी लहान असला तरी पवारांकडे सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची कसब आहे. महाराष्ट्रात पवारांनी शिवसेना-राष्ट्रवादी-कॉँग्रेसची मोट चांगली बांधून हे सरकार भाजपाशी पावलोपावली संघर्ष करीत गेली दोन वर्षे टिकले आहे. त्यामुळे अशी बांधणी करण्यासाठी शरद पवार देशव्यापी महत्वाची कामगिरी बजावू शकतात. भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत असताना आपल्या पहिला शत्रू हा कॉँग्रेस नसून भाजपा आहे हे सुत्र अगोदर लक्षात घेतले पाहिजे. अनेक पक्ष भाजपा व कॉँग्रेसला एकाच पारड्यात मोजतात, त्यामुळे अप्रत्यक्षरित्या भाजपालाच मदत होते. त्यामुळे भाजपाविरोधी आघाडी करताना वरील पथ्ये पाळल्यास भाजपाला सत्ताभ्रष्ट करता येऊ शकेल, अन्यथा मोदीं व भाजपाचा पराभव अशक्य आहे.
0 Response to "भाजपाविरोधी आघाडी की बिघाडी?"
टिप्पणी पोस्ट करा