हिंदुस्थानी भाऊच्या निमित्ताने...
06 फेब्रुवारी 2022च्या मोहोरसाठी चिंतन
हिंदुस्थानी भाऊच्या निमित्ताने...
एक हिंदुस्थानी भाऊ या टोपणनावाचा उटपसुंभ सोशल मिडियावर आपली हजेरी लावतो आणि १० व १२ च्या मुलांना आवाहन करतो की, तुमची ऑफलाईन नव्हे तर ऑनलाईन परीक्षा झालीच पाहिजे, तसे जर सरकार करणार नसेल तर त्याविरुध्द आंदोलन करा, रस्त्यावर या... अर्थात या आवाहनाला विद्यार्थी जोरदार प्रतिसाद देतात आणि मुंबईतसह काही महानगरात आंदोलन होते. या विद्यार्थ्यांना आवरण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागतो. त्यानंतर लगेचच चॅनेल्सवर व सोशल मिडियावर बातम्यांचा, पाठिंब्यांचा पाऊस पडतो. जणू काही हीच एक खूप महत्वाची बातमी आहे व या आवाहनातून विद्यार्थ्यांच्या संवेदना जागृत झाल्या आहेत आणि आता बस्... विद्यार्थ्यांचा सरकारशी संघर्ष अटळ आहे... विद्यार्थ्यांच्या मागण्या किती रास्त आहेत..इत्यादी... इत्यादी... या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या उपस्थित केलेल्या गेलेल्या मागण्या आपण एकवेळ बाजूला ठेऊ, परंतु सोशल मिडियाचा वापर कोणत्या थराला जाऊन पोहोचला आहे, त्याचा प्रत्यय गेल्या काही वर्षात आपल्याला अनेकदा आला आहे. आता त्याचे आणखी एक उदाहरण या निमित्ताने बघायला मिळाले. मात्र यासंबंधी अनेक शंका उपस्थित होऊ शकतात. केवळ सोशल मिडियावरील आवाहनाला डोळ्यापुढे ठेऊन काही तासातच लोक जमा होऊ आंदोलन करतील एवढी उर्त्सुफर्तता आपल्याकडे आहे, असे वाटत नाही. त्यासाठी कोणाचा तरी निश्चितच छुपा पाठिंबा आवश्यक आहे. यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रस्त्यावर कुणीतरी या जमावाच्या मागे ठामपणे उभा असतो किंवा असला पाहिजे. एरव्ही मुंबईसारख्या अन्य महानगरात लोकांना फारसे कुणाचे देणेघेणे लागत नाही. गेल्या काही वर्षात मुंबई तर आत्मकेंद्रीत झाली आहे. आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहातो त्याची माहिती नसल्याबद्दल धन्यता मानणारे मोठ्या संख्येने मुंबईत असतात. मात्र तरुण मुले सोशल मिडीयाच्या एका हाकेवर जमा होतात व आंदोलनासाठी सज्ज होतात, हे सर्व अनपेक्षीत असेच आहे. त्यामुळे सरकारने या भाऊला अटक केली असली तरी यामागे कोणत्या शक्ती आहेत, ते शोधले पाहिजे. त्यातून यामागचे खरे गुन्हेगार पुढे येतील. आता ऑनलाईन परीक्षेबद्दल. कोरोनामुळे नाईलाज म्हणून सरकारला ऑनलाईन परीक्षा घेणे भाग पडले आहे. खरे तर अशा प्ररीक्षा घेणे हा एक प्रकारचा अनैतिकपणाच आहे. कारण यातून आपल्याकडे त्या विद्यार्थ्यांची नेमकी क्षमता जोखता येणार नाही. ऑफलाईन परीक्षेत कॉपी कॉपी करणारे असतात, त्यातुलनेत घरुन दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत तर कॉपी ही होणारच. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा ही केवळ हंगामी व्यवस्था आहे. ती कायम स्वरुपाची नाही. आपल्याकडे परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या तपासणीसाठी होत नाही तर जास्तीत जास्त गुण मिळवून भविष्यातील करिअर घडविण्यासाठी घेतली जाते. आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेतील हा मूलभूत दोष समजला गेला आहे. परंतु गेल्या काही वर्षात गुणांना एवढे अवास्तव महत्व दिले गेले व जीवघेणी स्पर्धा त्यासाठी सुरु झाली. त्यात विद्यार्थ्यांबरोबर पालकही सामिल झाले. आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या या दोषामुळे अनेकदा आपण चांगले विद्यार्थी घडवित नाही तर गुणवत्तेवर आधारित चांगले मार्क मिळविणारेच विद्यार्थी चमकविले जातात. केवळ चांगले मार्क मिळविले की तो विद्यार्थी हुषार हे एकदा गणित मान्य झाल्यावर विद्यार्थी आणि त्यांचे पालक व शिक्षकांचाही दृष्टीकोन बदलतो. सध्याच्या ऑनलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचीच एक प्रकारे मजाच झाली. सर्वच विद्यार्थी कॉपी करतात असे म्हणणे चुकीचे ठरेल परंतु मार्क्स मिळविण्याच्या या गर्दीत आपणही कॉपी करुन चांगले मार्क मिळवू अशी सर्वसाधारण धारणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे. आपण जो अभ्यास शिकतो तो आपल्या ज्ञानाजर्नासाठी आहे व त्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला भविष्यात करिअर घडवायचे आहे. अशी भावना सध्याच्या शिक्षणव्यवस्थेतील दोषामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाही. गेल्या काही वर्षात आपल्याकडे गुण जाऊन ग्रेड देण्यास सुरुवात झाली. परंतु ग्रेड ही देखील मार्क्सच्याच आधारावर दिली जात असल्याने त्या ग्रेड पध्दतीचे रुपांतर मार्क्समध्ये केले जाते व विद्यार्थ्यांची क्षमता तपासली जाते. त्यामुळे आपल्याकडे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेचा पॅटर्नच बदलण्याची आवश्यकता आहे. केवळ दहावी-बारावी- पदवी असा पॅटर्न बदलून पूर्वीचा अकरावीचा पॅटर्न आणून हे काम होणार नाही. ज्या प्रकारे अभ्यासक्रम बदलला जाण्याची गरज आहे तसेच प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्याला शिक्षण घेण्याची व्यवस्था असली पाहिजे. सर्वच विद्यार्थ्यांना एकाच तागडीत घालून त्यांची परीक्षा घेऊन गुणांवर आघारीत त्यांचे मापन करणे म्हणजे हुषार व ढ अशा दोन्ही विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यासारखे आहे. एखादा विद्यार्थी शिक्षणात कमी असेल तर त्याचा नेमका कल कोठे आहे ते जाणून घेऊन त्याला त्यातील ज्ञान देण्याकडे कल असला पाहिजे. त्यासाठी सध्याचा अभ्यासक्रम व परीक्षा पध्दतीत बदल करण्याची आवश्यकता आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी हे जे कथीत आंदोलन झाले त्याचे मूळ शोधताना आपल्याकडील अभ्यासक्रमाकडेही पाहाण्याची गरज आहे. विद्यार्थांवर परीक्षेचा व त्यानंतर पास-नापास व उत्तम गुण मिळविण्याची स्पर्धा याचा बोजा असता कामा नये, मार्क्स कमविण्याची धडपड असता कामा नये. परीक्षा ही ज्ञानप्राप्तिसाठी आहे, दुसऱ्या मुलांशी स्पर्धा करण्यासाठी नाही, असे एकदा मनावर बिंबविले की, मुलांपुढे परीक्षेला कितीही कॉप्या समोर ठेवल्या तरी ती करण्यास मुले धजावणार नाहीत. अशा पध्दतीची शिक्षण पध्दती आपल्याकडे ज्यावेळी विकसीत होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा विकास होईल.
0 Response to "हिंदुस्थानी भाऊच्या निमित्ताने..."
टिप्पणी पोस्ट करा