-->
कोरोना आणि पर्यंवरणाचा असमतोल

कोरोना आणि पर्यंवरणाचा असमतोल

30 जानेवारी 2022च्या मोहोरसाठी चिंतन
कोरोना आणि पर्यावरणाचा असमतोल कोरोनाचा जन्म चीनमध्ये झाला हे खरे असले तरीही कोरोनाचे उगमस्थान नेमके कशातून झाले, यावर कोणी प्रकाश टाकलेला नाही. परंतु त्यासंबंधी असे बोलले जाते की, चीनने या विषाणूची कृत्रिमरित्या निर्मिती केली व त्याचा प्रसार झाला. ही थेअरी अजून जगाने मान्य केलेली नाही. काहींच्या मते प्राण्यातून याचा प्रसार झाला. म्हणजे वटवाघळातून त्याचा प्रसार माणसाकडे झाला. चीनमध्ये विविध प्रकारचे पक्षी व जनावरे यांचे सेवन केले जाते, त्यातून तो विषाणू तेथील नागरिकांच्या शरीरात आला व त्यानंतर त्याचा जगभर प्रसार झाला. ही थेअरी देखील अजून मान्य पावलेली नाही. परंतु प्राणांच्या शरीरात असलेले विषाणू मानवात पसरुन त्यातून रोग झालेली अनेक उदाहरणे आजवर आहेत. अलिकडची उदाहरणे म्हणजे इबोला, सार्स, चिकन गुन्या इ. सुदैवाने हे रोग जगभर पोहोचले नाहीत तर काही मर्यादीत भागातच राहिले. कोरोनाचे मात्र तसे झाले नाही. कोरोना हा झपाट्याने जगभर पसरला आणि करोडो लोकांचा त्यात मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाची यासंबंधी नोंद घेणे गरजेचे ठरते. कोरोनाचा फैलाव व पर्यावरणात गेल्या काही वर्षात झालेले बदल याचा देखील संबंध आहे. गेल्या काही वर्षात पर्यावरणाचा समतोल ढळला आहे. सतत येणारे पूर, वादळे, पावसाचे बिघडलेले वेळापत्रक, पावसाची अनियमितता, अतिशय उष्णता, बर्फ मोठ्या प्रमाणात पडून गारठा वाढणे अशी त्याची अनेक उदाहरणे देता येतील. हे केवळ आपल्याकडेच नव्हे तर जगभरात सुरु आहे. गेल्या काही दशकात आपण पर्यावरणाचा जो ऱ्हास केला त्याचा परिणाम आता आपण भोगत आहोत. मानवाचा स्वर्थी दृष्टीकोन त्यातून दिसतो. अर्थात आज पर्यावरणाचा हा ऱ्हास थांबवावा यासाठी ज्या विकसीत जगात जागृती झाली आहे त्याच देशातून पर्यावरणाचे जास्त नुकसान झाले आहे. गंमतीचा भाग म्हणजे हेच विकसीत जग आता आपल्यासारख्या विकसनशील देशाला यासंबंधीच धडे देत आहे. असो. पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या समस्येकडे वेळीच लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर या वसुंधरेवरील सजीव सृष्टीसमोर भविष्यात मोठी संकटे येतील. याचा गांभीर्याने विचार करून कोणी काही तरी करील यापेक्षा आपण यासाठी काय करू शकतो याचा विचार करा. केवळ आपल्या कुटुंबाचा विचार न करता सजीव सृष्टीसाठी व भावी पिढीसाठी सामाजिक योगदान म्हणून पर्यावरण समतोलासाठी प्रयत्नांची स्वत:पासून सुरुवात करणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. तथापि सध्याच्या काळात पर्यावरण समतोल ही मानवाच्या दृष्टिकोनातून, तसेच या पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी महत्त्वाची गरज असल्याचे आहे. वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढलेल्या गरजा, वाढते शहरीकरण, कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन, जंगलांचा ऱ्हास, जंगलातील वणवे, वाढते तापमान, कचरा, ई-कचरा, प्लास्टिकचा अतोनात वापर आदीमुळे पर्यावरणास हानी पोहोचत आहे. वाढत्या तापमानामुळे ऋतुमानात बदल झाला आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र याबाबत आपण स्वत: काय करू शकतो याचा आता गांभीर्याने विचार करायला हवा. आपण घरी फ्रीज, बॉडी स्प्रे, एअर कंडिशनर आदींचा वापर करतो, पण यामधून क्लोरो फ्युरो कार्बन वायू वातावरणात मिसळतो. तो अत्यंत घातक आहे. अतोनात प्लास्टिकचा वापरही टाळायला हवा. एक प्लास्टिकची कॅरी बॅग नष्ट व्हायला ५०० वर्षे लागतात. कागदी बॅग सहा आठवडय़ात नष्ट होते. पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे तसेच विविध वायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीच्या ओझोन वायूच्या आवरणाला खिंडार पडले आहे. यामुळे सूर्यापासून येणारे अतिनील किरण तडक पृथ्वीवर येतात. त्यामुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोका आहे. तापमानवाढीने उत्तर व दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे देशातील समुद्र किनाऱ्यावरील लोकवस्ती पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. असेही बोलले जाते की अजून पन्नास वर्षांनी मुंबईसारखे किनारपट्टीवर असलेल्या शहरासह अनेक गावे पाण्याखाली येऊन बुडू शकतात. या सर्वाचा प्रत्येकाने विचार करायला हवा. वृक्षलागवड करुन वृक्ष व्यवस्थित वाढविणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, क्लोरो प्युरो कार्बन उत्सर्जित करणाऱ्या साधनांचा वापर टाळणे, सौर ऊर्जेचा वापर वाढविणे, वाहनांचा वापर कमीत कमी करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे, ध्वनिप्रदूषण टाळणे, यासारखे वैयक्तिक स्तरावर आपण प्रयत्न केल्यास पर्यावरण पूरक कार्यास आपण निश्चित हातभार लावू शकतो. निसर्गात दोन घटक महत्त्वाचे आहेत. हवा, पाणी, जमीन-माती, प्रकाश व ऊर्जा या पाच बाबी प्रदूषणमुक्त ठेवणे ही मानवाची जबाबदारी आहे. लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती वाढत नाही. नैसर्गिक चक्र आबाधित राखून पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी किमान एक वृक्ष लागवड व त्याची जपणूक करणे आता गरजेचे ठरले आहे. कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर, गाड्यांसाठी इंधन जाळल्याने होणारा धूर, चुलीसाठी जाळलेल्या लाकडाचा धूर, या सर्वांमुळे हवा दूषित होते. या प्रदूषणामुळे माणसांना श्वसनाच्या विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. सांडपाणी, कारखान्यातून निघणारे रसायनमिश्रित पाणी, तसेच शेतात वापरली जाणारी रासायनिक खते हे सर्व पाणी¬प्रदूषणास कारणीभूत ठरतात. यामुळे नद्या व समुद्रात प्रदूषण होते. अनेक प्रकारच्या वस्तू समुद्रात फेकण्यात येतात. तसेच, जमिनीवर कचरा टाकल्यामुळे जमीन दूषित होते आणि अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीतले क्षारांचे प्रमाण वाढते. परिणामी जमीन नापीक होते. याच प्रकारे आपले भूजलही दूषित होते. गाड्यांचे हॉर्न, भोंगे, फटाके, लाउडस्पीकर इत्यादी ध्वनी प्रदूषण करतात. ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य या दोन्हीवर परिणाम होतो. रक्तदाब वाढतो आणि हृदयरोगाला आमंत्रण मिळते. पर्यावरणाच्या या बदलाचा केवळ माणसावरच नाही तर पशू-पक्ष्यांवरही परिणाम होतो. त्यांच्यातील बेचैनी वाढते व त्यांच्यात रोगराई वाढल्याने त्याचे परिणाम माणसालाही भोगावे लागतात. कोरोना हे देखील त्याचेच एक फलीत आहे असे मानणारा शास्त्रज्ञांचा एक मोठा समूह आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणाकडे प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर आपल्या किंवा पुढच्या पिढीला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

0 Response to "कोरोना आणि पर्यंवरणाचा असमतोल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel