-->
संपादकीय पान शनिवार दि. २० सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
मॉन्सूनचा आता परतीचा प्रवास
-------------------------------
नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांच्या (मॉन्सून)च्या परतीची वाटचाल सुरू झाली आहे. मॉन्सून राजस्थानमधून माघारी फिरण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. केरळमध्ये ६ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने सुमारे सव्वाचार महिने देशात मुक्काम केला. राजस्थानमध्ये १७ जुलै रोजी पोचल्यानंतर मॉन्सूनने बुधवार दि. १७ सप्टेंबरपासून दोन महिन्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. देशाच्या वायव्य भागात पंजाब आणि पाकिस्तानलगत असलेली चक्राकार वार्‍याची स्थिती आता निवळली आहे, तर मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्यालगत समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. या पट्‌ट्याचा विस्तार कमी झाला आहे. मंगळवारी पंजाबच्या फिरोजपूरपर्यंत असलेला हा पट्टा बुधवारी उत्तर प्रदेशातील वाराणसीपासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत होता. राजस्थानच्या काही भागांत पाऊस थांबला असून, हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. त्यामुळे मॉन्सून या भागातून परत फिरण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात सीमांध्रचा उत्तर, तर ओडिशाची दक्षिण किनारपट्टी आणि पश्‍चिम मध्य बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदा २० सप्टेंबरनंतर सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला होता. त्यानुसार पुढील तीन-चार दिवसांत मॉन्सून राजस्थानच्या काही भागांतून बाहेर पडेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मागील वर्षी मॉन्सूनने ९ सप्टेंबर रोजी परतीची वाटचाल सुरू केली होती. १८ सप्टेंबर रोजी मॉन्सून राजस्थानच्या काही भागांतून माघारी फिरला होता. त्यानंतर परतीची वाटचाल महिनाभर रेंगाळली. १७ ऑक्टोबर रोजी मॉन्सून संपूर्ण राजस्थानातून बाहेर पडला होता. त्यानंतर चार दिवसांमध्ये (२० ऑक्टोबर) महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून मॉन्सूनने माघार घेतली. सन १९७१ पासूनची मॉन्सूनची परतीची वाटचाल विचारात घेतली तर २००५ मध्ये मॉन्सून सर्वाधिक लवकर २ सप्टेंबर रोजी तर २००७ मध्ये सर्वांत उशिरा ३० सप्टेंबर रोजी राजस्थानमधून माघारी फिरला होता. दक्षिण कोकण आणि गोव्यात दोन दिवस आता बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर उत्तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आहे, त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वार्‍यांची स्थिती आहे. पश्‍चिम किनारपट्टीलगत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा मंगळवारी (ता. १६) विरून गेला आहे. एकूणच आता पाऊस यंदाच्या परतीच्या वाटेवर आहे. यंदा पाऊस निराशा करील असे चित्र सुरुवातीला व्यक्त झाले होते. मात्र पावसाळा संपूर्ण देशात बर्‍यापैकी झाला आहे. अल् नियोचा असलेला धोका आपल्याकडे कितपत बसेल व त्यातून पाऊस किती कमी पडेल याचा अंदाज काही व्यक्त होत नव्हता. शेवटी कमी पाऊस पडण्याचा अंदाज बर्‍यापैकी खोटा ठरला आहे. त्यामुळे देशातील सर्वांनाच समाधान लाभले आहे. जम्मू काश्मिरसारख्या पट्‌यात तर दशकातील महापूर आला आहे. आपल्याकडे गेल्या वर्षी असाच महापूर उत्तरप्रदेशाच्या अनेक भागात आला होता. यंदा पावसाने आपले रौद्र रुप जम्मू-काश्मिरमध्ये दाखविले आहे. महाराष्ट्रात सुरुवातीला निराशा केली तरी पावसाने आपल्या हंगामातील मध्यानंतर मात्र सुरुवातीची सरासरी भरुन काढली. काही भागातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट जरुर आले. परंतु सरासरी विचार करता यावेळच्या पावसाने निराशा केलेली नाही. जो काही राज्यातला दुष्काळ आहे तो निसर्ग निर्मित नाही तर मनुष्य निर्मित आहे. त्यामुळे जमा झालेल्या प्रत्येक पावसाचे थेंब न थेंब जमा करुन त्याचा वापर वर्षभर करण्याची जबाबदारी आता आपली आहे. आजपर्यंत यात आपण कमी पडलो. भविष्यात जर पाण्याचे नियोजन केले नाही तर पाऊस आपल्याला माफ करणार नाही.
-----------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel