-->
स्मरण ऑक्टोबर क्रांतीचे!

स्मरण ऑक्टोबर क्रांतीचे!

मंगळवार दि. 7 नोव्हेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
स्मरण ऑक्टोबर क्रांतीचे!
रशियात 7 नोव्हेंबर 1917 रोजी घडलेल्या क्रांतीला आज बरोबर शंभर वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशी ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार 7 नोव्हेंबर 1917 ही तारीख असली तरीही ती ऑक्टोबर क्रांती म्हणून जगात ओळखली जाते. कुठलीही क्रांती कालांतराने कालबाह्य वाटली तरीही जगावर आपला ठसा त्या क्रांतीने उमटविलेला असतो. मानवाच्या प्रगतीच्या वाटेतील तो एक मोलाचा टप्पा असतो. फ्रेंच राज्यक्रांतीने समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा नारा दिला. आणि ही मूल्ये जगाला आकर्षित करून, आपला शिक्का कायमचा उमटवून गेली. मात्र काळाच्या ओघात ही फ्रेंच राज्यक्रांती असफल झाली. त्यातुलनेत ऑक्टोबर क्रांती तब्बल 60 वर्षे टिकली. तिने जगाला कामगार, कष्टकर्‍यांची अधिसत्ता व त्यांचे राजकारण काय असते हे दाखवून दिले. अमेरिकन भांडवलशाहीला तब्बल सहा दशके एक सशक्त पर्याय उभा केला. त्यादृष्टीने ऑक्टोबर क्रांतीला शंभर वर्षे झाली असताना त्याचे स्मरण करणे म्हणजे या घटनेला ऐतिहासिक न्याय देणे ठरेल. रशियात राज्यक्रांती घडून येण्याला तेथील कित्येक शतकांचा सामाजिक व आर्थिक इतिहास कारणीभूत आहे. 19 व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत रशिया दोन सामाजिक गटात विभागला गेला होता. एकीकडे झार राझ्याची जुलमी सत्ता, जमीनदार, अमीर-उमराव यांचे ऐश्‍वर्यसंपन्न जग तर दुसरीकडे अज्ञानी, उपाशी, दारिद्र्यात जखडलेली जनता. त्यातच पहिल्या महायुध्दाने रशिया पूर्णपमे खिळखिळा झाला होता. 1861 साली भूदासमुक्तीचा कायदा संमत होईपर्यंत तेथे गुसामगिरी अस्तित्वात होती. गुलामांना जमीनदारांची मरेपर्यंत गुलामी करावी लागे, त्यांना कोणत्याही सोयी-सवलती नव्हत्या. शिक्षण, घर, मानाचे जीवन यापैकी काहीही भूदासांकडे नव्हते. 1861 च्या कायद्याने त्यांना सामाजिक समानतेचे अधिकार मिळाले, कित्येक शतकांची गुलामगिरीची पध्दत संपुष्टात आली. कायद्यानुसार कोणी कोणास गुलाम म्हणून ठेऊ शकत नसल्याने भूदासांना काम मिळत नव्हते. तर त्यांच्याकडे शिक्षण नसल्याने नोकरी किंवा इतर कामे करणे त्यांना अशक्य होतेे. त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. सामाजिक विषमता, मानहानी, आर्थिक संकट यामुळे कोट्यावधी सामान्य लोकांच्या मनात तत्कालीन सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थितीबद्दलचा असंतोष वाढतच गेला. ती परिस्थिती बदलून टाकल्याशिवाय काही गत्यंतर नाही असे मत सर्वसामान्य जनतेचे झाले होते. त्यातच 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले. युद्धात सहभागी होण्यासाठी रशियाजवळ लष्करी किंवा आर्थिक सामर्थ्य नव्हते. सुमारे 15 लाख सैनिकांपैकी 5 लाख सैनिकांजवळ साधी बंदुकही नव्ह्ती. शस्त्रास्त्र, अन्नधान्य यांचा प्रचंड तुटवडा होता, दळणवळणाची साधने विकसीत झालेली नव्ह्ती. त्यातच जर्मनी विरूद्ध पराभव पत्करावा लागल्याने पहिले महायुद्ध संपण्याच्या सुमारास रशियात बेसुमार महागाई, आवश्यक वस्तुंचा प्रचंड तुटवडा, मोठ्या प्रमाणात झालेली प्राणहानी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीस जबाबदार असलेल्या अकार्यक्षम झारशाही विरूद्ध जनप्रक्षोभ वाढत गेला. 1917 च्या प्रारंभी लाखो सैनिक कोण्त्याही परवानगीची वाट न पाहता, कोणताही नेता, अधिकारी नसतांना स्वतःच्या शस्त्रांसह युद्धभूमीतून मागे हटले. सैनिक, कामगार, शेतकरी - सर्वसामान्य जनता रस्त्यावर जमली. रशियात त्यावेळी पूर्णपणे अराजकाची स्थिती होती. या गडबडीतच झार निकोलसने मंत्रीपरिषदेचे (ड्यूमा) विसर्जन केले, सर्व सत्ता स्वतःकडे एकवटली. समाजवादी पक्षासह ड्यूमाचे सदस्य एकत्र आले आणि 14 मार्च रोजी प्रिंस जॉर्जी लवोव यांच्या नेतृत्वाखाली उदारमतवादी आणि मवाळ समाजवादी यांचा समन्वय साधला गेल्याने एक मोठी शक्ती एकत्र झाली. लवोव यांच्या पुढाकाराने हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. कोणताही पर्याय समोर न राहिल्याने 15 मार्च 1917 ला झार निकोलसने राज्यत्याग केला व सुमारे तीन शतके रशियावर राज्य करणार्‍या रोमानोव्ह घराण्याची सत्ता संपुष्टात आली. हंगामी सरकार आणि समाजवादी विचारांच्या लोकांमध्ये लवकरच मतभेद सुरू झाले. लोकांच्या परिस्थितीबद्दल हंगामी सरकारने हालचाली सुरू केल्या नसल्याने पुन्हा क्रांती होऊन रशियाचे नेतृत्व नव्या लोकांकडे देण्याची चिन्हे दिसू लागली. झालेली क्रांती काही महिन्यातच फसणार की काय अशी स्थिती दिसू लागली. समाजवाद्यांच्या दबावामुळे सायबेरियात हद्दपारीची शिक्षा भोगणार्‍या जोसेफ स्टालिन आणि रशियाबाहेर राहणार्‍या लेनिन, ट्रॉट्स्की, कामनेव्ह, रादेक हे नेते रशियात परत आले. हंगामी सरकार विरूद्ध लेनिनच्या नेतृत्त्वाने क्रांतीला जहाल वळण दिले. क्रांतीनंतर सोव्हिएत संघ एकत्र करण्यात व त्याची सूत्रे समर्थपणे हाताळण्यात लेनिन यांचा मोलाचा वाटा होता. लेनिनच्या राजवटीनंतर स्टॅलिन, ब्रेझनेव्ह यांची कारकिर्द विविध अंगांनी गाजली होती. मिखाईल गोब्रोचेव्ह यांनी 85 साली पेरेस्त्रोईका व ग्लासनोस्त (आर्थिक सुधारणा व खुलेपणा) सुरु केल्यावर मात्र सोव्हिएत युनियनचे पोलादी कवच ढासळू लागले. तोपर्यंत सोव्हिएत युनियनने अमेरिकेच्या बरोबरीने जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात तुल्यबळ लढत दिली. जगात आपली पाठराखण करणारी देशांची एक फौज तयार केली होती. त्यावेळी जग हे सोव्हिएत युनियनच्या समाजवादी विचारसारणीत व अमेरिकेच्या भांडवलशाहीत विभागले गेले होते. सोव्हिएत युनियनचा डोलारा मात्र 88 नंतर कोसळू लागला. 91 साली तर सोव्हिएत युनियन हा देशच विभाजन झाल्यामुळे संपुष्टात आला. आता आपण ज्याला रशिया म्हणतो तोच एक त्या समूहातील एक मोठा देश म्हणून शिल्लक उरला आहे. त्यानंतर फुटून बाहेर पडलेले देश आजही गरीब अवस्थेत आहेत. रशियातील कामगारांची सत्ता संपुष्टात आल्यावर समाजसत्तावादी विचारांची एक मोठी जगातील सत्ता संपली असली तरीही चीनने मात्र हा विचार जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सोव्हिएत युनियनने सत्ताकारण करताना ज्या चुका केल्या त्या टाळण्याचा प्रयत्न चीनने केला व ते आजही भांडवलशाही व समाजवादाचा मेळ घालून जगातील महासत्ता होण्याची स्वप्ने पहात आहेत. ऑक्टोबर क्रांती आज फसल्यासारखी दिसत असली तरीही तिने जगाला दिलेला संदेश आजही जीवंत आहे हे विसरता येणार नाही.
------------------------------------------------------------- 

Related Posts

0 Response to "स्मरण ऑक्टोबर क्रांतीचे!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel