-->
घरं उजाड केलेली माणसं...

घरं उजाड केलेली माणसं...

सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
घरं उजाड केलेली माणसं...
पुण्यातील नामवंत बिल्डर व शून्यातून आपले विश्‍व उभारणारे मराठमोळे उद्योजक डी.एस.कुलकर्णी यांच्या अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेले सहा महिने डी.एस.के. यांच्या उद्योगसमुहावर अनेक वादळे घोंघावत होती. मात्र डी.एस.के. यांनी आपल्या मुदत ठेवी धारकांना व फ्लॅटमधील गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र ते हे आश्‍वासन अखेर पाळू शकले नाहीत आणि डी.एस.के.च्या विश्‍वासला तडा गेला. घराला घरपण देणारी माणसं असी त्यांच्या उद्योगसमूहाची टॅगलाईन होती. मात्र आता या बदल करुन घरे उजाड करणारी माणसं अशी करावेसे वाटते. कारण त्यांनी ठेवींवरील व्याज न दिल्याने तसेच फ्लॅटधारकांचे पैसे न दिल्याने अनेकांची घरे उजाड झाली आहेत. आजवर ठेवींवर व्यवस्थित मुदतीत व्याज देणारे व फ्लॅटधारकांना ठरलेल्या वेळेनुसार फ्लॅटचा ताबा देणारे बिल्डर अशी त्यांची ख्याती होती. आपल्याकडे बिल्डर म्हटला की तो फसवणूक करणार अशी लोकांच्या मनात नेहमी धाकधूक असते. मात्र या पलिकडे जाऊन डी.एस.के.यांनी लोकांच्या मनात विश्‍वासाचे एक नाते तयार केले होते. आता अन्य फसवणूक करणार्‍या बिल्डरांच्या रांगेत डी.एस.के. जाऊन बसले हे दुदैवी म्हटले पाहिजे. फुटलेली काच पुन्हा जुळविता येत नाही त्याचप्रमाणे उद्योगात मिळालेली विश्‍वासार्हता एकदा गमावली की पुन्हा मिळविणे कठीण असते. सध्याची डी.एस.के.वर आलेली स्थिती आपण एकवेळ बाजूला ठेवू, परंतु ज्या शून्यातून डी.एस.के.नी आपले उद्योगविश्‍व उभारले तो इतिहास तरुणांना प्रेरणादायी ठरावा. डीएसके हे केवळ उद्योगातच रमले नाहीत. समाजकारणात सहभागी होण्यासाठी त्यांनी डीएसके फाऊंडेशन, डीएसके गप्पा असे लोकप्रिय उपक्रम घेतले. 2004 साली थेट राजकारणात यायचा निर्णय त्यांनी घेतला. लोकसभा निवडणुकीत मायावतींच्या सोशल इंजिनियरिंगचा भाग म्हणून त्यांनी बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली मात्र त्यांचा दणकून पराभव झाला. 2009 मध्ये ही आपकडून निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत होते, परंतु शेवटी त्यांनी तो विचार सोडून दिला असावा. डीएसके भाजपच्या व्यासपीठावर गेल्यानंतर राजकारणात त्यांच्या वाट्याला फारसे यश आले नाही. सुरुवातीला फोनमध्ये सेंट भरण्यापासून ते पेपर टाकण्यापर्यंत लहान-मोठ्या नोकर्‍या व उद्योग करीत मोठ्या कष्टाने डीएसकेनी उद्योगात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली. पुण्यातल्या रास्ता पेठेतल्या अश्‍विनी या एका इमारती पासून सुरू झालेला बांधकाम व्यवसायाचा त्यांचा प्रवास अगदी सहा हजार उंबर्‍यांच्या डीएसके विश्‍व या मॉडर्न गावापर्यंत पोहोचला. परदेशातही त्यांनी घरे बांधायचा उद्योग यशस्वी केला. मुंबईत प्रीमियम पध्दतीची केवळ उच्चमध्यमवर्गीयांचा तसेच श्रीमंतासाठी इमारते बांधण्याचा प्रयोग यशस्वी केला. घरे केवळ आमंत्रितांसाठी विकून एक नवा पायंडा पाडला. डीएसके टोयोटा, डीएसके ह्योशांग या सारख्या वाहन उद्योगातही डीएसके यांनी भक्कमपणे पाय रोवले होते. हे सर्व सुरु असताना अचानकपणे त्यांचे धनादेश वटत नसल्याच्या घटना पुढे आल्या. यातून डीएसके गोत्यात आल्याची चर्चा सुरू झाली. पुण्याच्या मांजरीजवळ अतिभव्य अंतर्गत जलवाहतूक असलेला दहा हजार घरांचा प्रकल्प बांधण्याची तयारी डीएसके यांनी केली होती त्यासाठी जमिनी घेण्यात आली. डीएसके यांनी या प्रकल्पाची तुफान जाहिरात केली. परदेशात असते तशी रहिवासी प्रकल्पात कृत्रिम नदी तयार करण्याचा त्यांचा संकल्प होता त्यासाठी सगळी भांडवली ताकद डीएसकेंनी ड्रीमसिटी मध्ये गुंतवली. दरम्यानच्या काळात झालेल्या नोटबंदीने बांधकाम व्यवसायावर मंदी आली. घरांची विक्री होत नव्हती, नवी गुंतवणूक थांबली आणि ज्यांनी ठेवीदार म्हणून पैसे डीएसके कडे विश्‍वासाने ठेवले होते त्यांचे पैसे ही डीएसके यांनी या प्रकल्पात गुंतवले तरीही परिस्थिती सुधारलीच नाही. डीएसके टोयोटा,ह्योशांग या कंपन्यांची भांडवली गुंतवणूक ही ड्रीमसिटीकडे वळल्याने हे उद्योग बंद पडले. या सगळ्या आर्थिक धक्क्यांनी डीएसके यांची भांडवली बाजारातली पतही संपुष्टात आली. डीएसके उद्योगसमूहात काही तरी गडबडी आहेत, हे लोकांना पटू लागले. असे असले तरीही डीएसके सर्वकाही आलबेल असल्याचा दावा करीत होते व कोणाचेही पैसे बुडणार नाहीत याची खात्री देत होते. परंतु लोकांनी किती काळ वाट बघायची हे देखील महत्वाचे आहे. आर्थिक अडचणीमुळे अडचणीत आलेल्या डीएसकेंवर ठेवीदारांचे पैसे न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. ठेवीदारांचे पैसे परस्पर वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये गुंतवल्यामुळे एमपीआयडीए कायद्यांतर्गत डीएसकेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्याद्वारे ठेवीदारांच्या पैशातून खरेदी केलेल्या मालमत्ता गोठवून त्याची विक्री करून ठेवीदारांचे पैसे देण्याची तरतूद केली जाईल. त्यामुळे किती पैसे ठेवीदारांना मिळणार की नाही असा प्रश्‍नच आहे.
ठेवीदारांच्या पैशातून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये भांडवली गुंतवणूक डीएसकेंनी केली होती त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने डीएसकेंचे या वेगवेगळ्या कंपन्या, कार्यालयांवर छापे घातले आहेत. डीएसके यांनी ठेवीदारांचे घेतलेले पैसे परत न केल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीच्या 420 आणि एमपीआयडीए कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे ज्यामध्ये 7 वर्षापर्यंत डीएसकेना शिक्षा होऊ शकते. ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याची प्रक्रिया ही मोठी आहे. डीएसकेंसारख्या एका मोठ्या उद्योजकावर अशी पाळी का आली याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. उद्योगात कोणताही निर्णय घेताना सावधरित्या पावले टाकणे आवश्यक असते. प्रामुख्याने ज्या उद्योगसमूहाकडे गुंतवणूकदारांची फौज असते त्यांनी विशेष दक्षता घेणे गरजेचे असते. जादा नफा कमविण्याच्या नादात आपल्या ताकदीपेक्षा मोठे प्रकल्प हाती घेतले तर अनेकदा आर्थिक गणिते बदलून आंगलटी येऊ शकतात. डीएसकेंचे नेमके असेच झाले. सर्वात निराशेची बाब म्हणजे मराठी माणसांपुढे आदर्श ठेवावा अशा या उद्योजकाचे बाभाडे निघावेत हे दुदैवी आहे.
-----------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "घरं उजाड केलेली माणसं..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel