-->
मिशन सत्ता वाचविणे!

मिशन सत्ता वाचविणे!

शुक्रवार दि. 08 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मिशन सत्ता वाचविणे!
संपर्क फॉर समर्थन या अभियानाअंतर्गत बुधवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्याचबरोबर उद्योगपती रतन टाटा, अभिनेत्री माधुरी दिक्षित यांची भेट घेतली. लता मंगेशकर यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे त्यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करण्यात आली असे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले. अमित शहा यांच्या या मुंबई भेटीत झालेल्या या भेटीगाठी पाहता, भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीनंतर सत्ता वाचविण्याचे मिशन आत्तापासूनच हाती घेतले आहे हे सिध्द होते. या भेटीत त्यांनी निवडलेल्या व्यक्ती याला फार महत्व आहे. उद्योगपती रतन टाटा यांचे उद्योगक्षेत्रातील वजन पाहता त्यांची भेट घेतल्याने या क्षेत्रातील पितृस्थानी असलेल्या व्यक्तीला भेटून आपण देशाच्या या आर्थिक राजधानीत आल्यावर उद्योजकांचे कसे मित्र आहोत, ते शह यांना दाखवायचे आहे. त्यांनी सध्या भाजपाशी चांगलीच दोस्ती असलेल्या अंबांनींची त्यांनी भेट घेतली नाही, हे एक त्यांच्या भेटीचे वैशिष्ट्य. चित्रपटसृष्टीशी निगडीत एवढे कलाकार मुंबईत आहेत, अनेक जण भाजपाशी अगदी चांगली दोस्ती करुन आहेत, परंतु शहा यांनी माधुरी दिक्षीतला भेटणे पसंत केले. यामागचे मुख्य कारम म्हणजे, माधुरीने आपले गेल्या तीन दशकात चित्रपटसृष्टीत चांगले बस्तान बसविले आहे व तिच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये आदराचे स्थान आहे. अशी व्यक्ती जर आपल्याला राज्यसभेवर पाठविता येते का किंवा आगामी लोकसभेसाठी माधुरी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे का याची त्यांनी चाचपणी केली असावी. माधुरीसारखी कलाकार जर भाजपाच्या कंपूत आली तर त्याचा प्रचारासाठी चांगला उपयोग होईल अशी शहा यांची निश्‍चितच गणिते असणार. या सर्व भेटीच्या पार्श्‍वभूमीवर अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीकडे अनेकांचे डोळे लागले होते. कारण याच अमित शहांचे वर्णन शिवसेनेने अफझलखान असे केले होते. परंतु या अफझलखानाच्या स्वागतासाठी गुजराती मेनू ठेवण्यात आला होता, अशी चर्चा भेटीअगोदर रंगली होती. सत्तेत आल्यापासून शिवसेना विरोधात असल्यासारखीच वागत आहे. गेल्या वर्षात तर भाजपाच्या विरोधात सडकून टिका ठाकरे करीत होते. याचे एक टोक म्हणजे, यापुढे शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर पालघरच्या निवडणुकीत जरी भाजपा विजयी झाली असली तरी शिवसेनेशिवाय आपली राज्यात डाळ शिजणार नाही असे त्यांना वाटू लागले होते. कारण पालघरमध्ये जर शिट्टी वाजली नसती तर शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय नक्की होता. त्याचबरोबर कर्नाटकातील विचक्यानंतर सर्व विरोधक एकवटले असल्यामुळे भाजपाची आता धडकी भरली आहे. त्याचबरोबर सत्तेची पाच वर्षे पूर्ण होतील, परंतु त्यानंतर सत्ता जर पुन्हा मिळवायची असले तर भाजपा स्वबळावर ती कमवू शकत नाही, हे सत्य आता भाजपाला पटले आहे. किंबहूना हे सत्य पटल्यामुळे आता आपल्या सर्व घटक पक्षांची मोट बांधण्यास आता शहा यांनी सुरुवात केली आहे. यातील तेलगू देसम यापूर्वीच भाजपाप्रणित आघाडीतून बाहेर पडला आहे. आता पुन्हा तेलगू देसम भाजाच्या व्याससपीठावर येणे कठीण आहे. शिवसेना भाजपाच्या विरोधात गरळ ओकत आहे, मात्र शिवसेना आपला हा विरोध किती काळ ठेवते ते पहायचे. ठाकरे-शहा यांच्या भेटीनंतर या दोघांनी प्रेस पुढे येऊन बोलण्याचे टाळले. दोन्ही नेत्यांत सुमारे दोन तास बंदद्वार चर्चा झाली. नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर खलबते झाली हे मात्र गुलदस्त्यातच आहे. कारण, चर्चेनंतर उद्धव ठाकरे स्वत: शहा यांना दारापर्यंत सोडण्यास आले. शहांनी निरोप घेतला आणि ते मातोश्रीहून निघाले. दोन्ही नेत्यांनी बैठकीतील चर्चेबाबत कोणतेही भाष्य केले नाही. सूत्रांनुसार, मातोश्रीवर दोन टप्प्यात बैठक झाली. पहिल्या टप्प्यात अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही होते. त्यानंतर शहा आणि उद्धव यांच्यात बंदद्वार चर्चा झाली. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस व आदित्य या दोघांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीत उद्धव यांनी आपली नाराजी अमित शहा यांच्यासमोर व्यक्त केल्याचे समजते. तसेच राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्याबाबत काय करता येईल याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याला दुजोरा मिळू शकला नाही. परंतु, शहा यांच्या मातोश्रीवरील भेटीमुळे शिवसेना आणि भाजपमधील दुरावा काही अंशी कमी होईल, असे मानले जात आहे. या भेटीत इतर वादाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी जागावाटप किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली नसल्याची माहिती देण्यात आली. अर्थात ही दोघा नेत्यांची प्रदिर्घ काळानंतर झालेली चर्चा असल्याने लगेचच दरी काही सांधली जाणार नाही. त्यासाठी काही काळ जावा लागेल. शिवसेना सत्ता सोडू शकत नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात जादा जागा देण्याचा प्रस्ताव शहा यांनी ठेवला असेल तर शिवसेना लगेचच नाही म्हणणार नाही. सद्या भाजपाला शिवसेनेची साथ हवी आहे, त्यामुळे शिवसेनेपुडे झुकल्यासारखे करतील. त्यावर शिवसेना कितपत विश्‍वास ठेवते ते पहावे लागेल. मात्र शिवसेनेने भाजपासोबत निवडणुका लढविल्या तर लोकांचा शिवसेनेवरील विश्‍वास उडेल. तसेच सर्वसामान्य शिवसैनिक गोंधळून जाईल. त्याचबरोबर भाजपाविरोधी आज जे देशात जनमत संघटीत होते आहे, त्याचा रोष शिवसेनेलाही पत्करावा लागेल. भाजपाच्या सत्तेच्या गाजरापुढे शिवसेनेने किती झुकायचे हा त्यांचा प्रश्‍न आहे, परंतु त्यामुळे शिवसेनेची मते कमी होणार हे नक्की.
-------------------------------------------------

0 Response to "मिशन सत्ता वाचविणे!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel