-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १९ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
मैत्रीचे नवे पर्व मात्र...
-----------------------------------------------
चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांचे तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर बुधवारी आगमन झाल्यानंतर अवघ्या तासा-दोन तासांत भारत आणि चीन या दोन्ही देशांदरम्यान ३.४ अब्ज डॉलर गुंतवणुकीच्या तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. अशा प्रकारे या दोन्ही देशांदरम्यान सहकार्याच्या एका नव्या पर्वाला सुरवात झाली असे आपल्याला म्हणता येईल. मात्र एकीकडे हे सहकार्य करार करी असताना दुसरीकडे चीनचे सैन्य आपल्या सीमेत घुसत होते. बुधवारी सकाळी चीनच्या पीपल्स लिपरेशन आर्मीचे (पीएलए) १०० हून अधिक सैनिक भारतीय सीमेवरील लडाखच्या चुमारमध्ये चार-पाच किलोमीटर आत घुसले. चीनी सैनिकांची ही संख्या १००० च्या आसपास असल्याचे वृत्तात म्हटले आहे. ही घटना जिनपिंग अहमदाबादहून दिल्लीला येण्याच्या काही तास आधी घडली आहे. गेल्या एक आठवड्यात चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची ही तिसरी घटना आहे. याआधी चुमार आणि डेमचोक येथे चीनी सैनिकांनी तळ ठोकला होता. भारत आणि चीन यांच्यात घुसखोरीवरुन फ्लॅग मिटींग सुरु असताना चीनच्या जवानांनी घुसखोरी केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री काही चीनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले. मात्र, त्यानंतर काही वेळातच आणखी १०० चीनी सैनिक चुमारच्या पाहाडी मार्गाने परत आले. चीनचे हे सैनिक देखील परत फिरतील असा कयास लावला जात होता. मात्र, तसे न होता घुसखोर चीनी सैनिकांची संख्या १०० वरुन वाढून ३५० वर पोहोचली. चीनच्या घुसखोरीनंतर भारताने चुमार मधील नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या तीन बटालियन पाठविल्या आहेत. आता दोन्ही देशांचे १००० सैनिक समोरासमोर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे स्थिती तणावपूर्ण झाली आहे.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या अध्यक्षांचे शिष्टाचार बाजूला ठेवत जोरदारपणे स्वागत केले आहे. मात्र त्यापूर्वी आदल्याच दिवशी चीनने आपल्या सीमेवर घुसखोरी केल्याने सर्वांच्या मनात एक शंका उपस्थित होते.  दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत या वेळी तीन करारांवर सह्या झाल्या. हे करार गोंझाऊच्या धर्तीवर अहमदाबादचा विकास, चीन विकास बँक महामंडळ आणि गुजरात औद्योगिक विकास मडामंडळाच्या माध्यमातून राज्यात औद्योगिक पार्क उभारणे आणि गुजरातच्या विकासासाठी चीनच्या ग्वांगडोंग प्रांताची मदत घेण्याच्या संदर्भात आहेत. औद्योगिक पार्कवर गुजरात सरकारचा मालकी हक्क असेल. या करारांची अंमलबजावणी पुढील तीन वर्षांत होणार आहे. अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठीही चीन मदत करणार आहे. सुरतमधील हिरे उद्योगातही चीन मोठी गुंतवणूक करणार असून, आज या सामंजस्य करारांप्रसंगी सुरतमधील काही बडे हिरे व्यापारी उपस्थित होते. भारताबरोबरच्या व्यापार संबंधांना चालना देण्याच्या दृष्टिकोनातून चीनने यापूर्वीच भारतीय रेल्वेमध्ये लाखो डॉलरची गुंतवणूक करण्याचे संकेत दिले होते. त्याशिवाय या दौर्‍यात उत्पादन आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही चालना देण्यावर चीनचे लक्ष असणार आहे. भविष्यात चीन भारतात ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे या वेळी ठरले. चीन हा एक आपला चांगला शेजारी आहे. ही गोष्ट खरी असली तरीही चीनवर आपण पूर्णपणे विश्‍वास टाकू शकत नाही, कारण आपले चीनबरोबर एकदा युध्द झाले आहे. मात्र आता सध्याच्या आन्तरराष्ट्रीय राजकारणाचा विचार करता चीनला व भारताला परस्परांची दोस्ती हवी आहे. चीनला अमेरिकेला अटकाव करावयाचा आहे आणि जागतिक महासत्ता होण्याची त्यांची स्वप्ने आहेत ती पूर्ण करण्यासाठी त्यांना भारताची साथ हवी आहे. कारण भारतासारखा एक विकसनशील देश व तिसर्‍या जगातील एक चांगला साथीदर त्यांना जगात मित्र म्हणून पाहिजे आहे. आपण चीनच्या शेजारी असल्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या जवळ आहोत. आपला त्या देशांशी व्यापारही भरपूर आहे. पूर्वीचे शत्रुत्वाचे दिवस विसरण्याची आपण केव्हाच तयारी दाखविली आहे. मात्र चीन हे शत्रुत्व पूर्णपणे विसरण्यास तयार नाही असेच दिसते. मध्यंतरी ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचा दौरा केला व सहकार्याचा हात त्या देशापुढे पुढे केला त्यावेळी चीन काहीसा नाराज होणे स्वाभाविक होते. मात्र भारताने ापल्याला जपानही पाहिजे आहे व चीनशीपण मैत्री पाहिजे आहे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे चीनची नाराजी काही प्रमाणात दूर होऊ शकते. चीन आता जगात एक महासत्ता म्हणून पुढे येत आहे. त्यांची निदान तशी तयारी तरी सुरु आहे. भारत व चीन हे दोन एकत्र आल्यास जगात एक मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशांची जगात लॉबी तयार होऊ शकते. यशातून अमेरिकेला शह देता येऊ शकतो. ही चीनची गणिते पक्की आहेत, त्यामुळे एकीकडे घुसखोरी करीत असताना चीन मैत्रीचा हात भारतापुढे करीत आहे. चीन सध्याच्या स्थितीत भारताशी युध्द करणार नाही, मात्र त्याचबरोबर सीमेवरील आपला दावाही संपविणार नाही. चीनचे हे धोरण जुने आहे. मात्र कॉँग्रेस सत्तेत असताना याच भाजपाने चीनला धडा शिकविण्याची भाषा केली होती. आता मात्र सत्तेत आल्यावर चीनशी एकीकडे मैत्री व दुसरीकडे त्यांनी केलेली घुसखोरी खपवून घेत आहेत. सत्ता आल्यावर समीकरणे कशी बदलतात याचे उत्तम उदाहरण याबाबतचे देता येईल. चीन आपल्याशी एकीकडे मैत्रीचा हात पुढे करीत आहे तर दुसरीकडे मात्र सीमेवर घुसखोरी करीत आहे. अर्थात हे असेच चालू राहाणार आहे. यातून आपल्याला आपले हीत साधण्यासाठी चीनशी सांस्कृतीक व व्यापारी संबंध वाढवावेच लागतील.
-----------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel