-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १९ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
अदानींसाठी अच्छे दिन; मालमत्तेत १५२ टक्के वाढ
---------------------------------
उद्योगधंदा करीत असताना संबंधित उद्योगपतीला राजकीय लागेबांधे जपावे लागतातच का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. अगदी सोपप्या भाषेत उत्तर द्यावयाचे झाल्यास याची काही गरज नाही असे म्हणता येईल. मात्र जर तुम्हाला झटपट श्रीमंत व्हायचे असेल व सरकारी नियम वाकविण्यासाठी प्रयत्न करुन आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर मात्र तुम्हाला राजकीय हितसंबंध जपावे लागतात. याबाबतीत अदानी उद्योग समूहाचे उदाहरण देता येईल. नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याची गेले वर्षभर जोरात चर्चा असलेल्या या उद्योगपतीला मात्र मोदी सत्तेत आल्यामुळे अच्छे दिन दिसू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सतत चर्चेत राहिलेल्या अदानी उद्योगसमूहाचे कार्याध्यक्ष गौतम अदानी यांनी देशातील टॉप टेन लक्ष्मीवंतांच्या यादीत स्थान मिळवण्याची किमया करून सगळ्यांनाच चकित करून टाकलंय. त्यांच्या संपत्तीत तब्बल १५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. अदानी ग्रूपचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी खास संबंध असल्याचं बोललं जात असल्यानं, मोदी सरकारमुळेच त्यांना अच्छे दिन आल्याची चर्चा रंगली आहे. अर्थात, या देशातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत रिलायन्स उद्योगसमूहाचे कार्याध्यक्ष मुकेश अंबानीच आहेतच. त्यांच्या संपत्तीत ३७ टक्क्यांची वाढ झाली. त्यातुलनेत अदानी यांची झालेली वाढ ही अत्यंत लक्षणीय आहे व डोळ्यात भरणारी आहे. त्यामुळे अदानी यांना आपल्या उद्योगधंद्याच्या विस्तारासाठी मोदींचा वरदहस्त फारच उपयोगी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील ऊर्जानिर्मिती क्षेत्रात मोठा दबदबा असलेला अदानी उद्योगसमूह यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वादाच्या, संशयाच्या भोवर्‍यात अडकला होता. नरेंद्र मोदींचं या उद्योगसमूहासोबत सेटिंग आहे, त्यांनी या कंपनीला मातीमोल किमतीनं जमिनी दिल्यात, असा आरोप संपूर्ण निवडणुकीत विरोधक करत होते. त्यामुळे अदानींचं नेमकं गौडबंगाल काय, यावरून बरीच चर्चा झाली होती. ही प्रसिद्धी, हा प्रचार अदानींसाठी भलताच फायद्याचा ठरला आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासूनच अदानींचे शेअर तेजीत आहेत. त्या जोरावर गौतम अदानींच्या संपत्तीत १५२ टक्क्यांची वाढ झाल्याचं चीनमधील एका संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. त्यांची एकूण संपत्ती ४४ हजार कोटी रुपये आहे. त्यांच्याशिवाय, या टॉप टेन धनवंतांच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल स्थानावर ( संपत्ती १.६५ लाख कोटी), सन फार्मा कंपनीचे प्रमुख दिलीप शंघवी दुसर्‍या स्थानावर (१.२९ लाख कोटी) आणि लक्ष्मी मित्तल तिसर्‍या स्थानावर (९७ हजार कोटी) हे उद्योगपतीही आहेत. भारतातील अब्जाधीशांची संख्या गेल्या वर्षभरात ५९ वरून १०९ वर जाऊन पोहोचली आहे. त्यांपैकी सर्वाधिक ७० जण मुंबईतले आहेत. उद्योगधंदा करुन स्वत:चा व्यवसाय कराव व सचोटीने पैसा मिळवावा तसेच शासनाच्या तिजोरीत कररुपाने भर घालावी हे केव्हांही चांगलेच. मात्र अनेक उद्योगपती सरकार दरबारी आपले वजन खर्ची घालून अनेकदा वेगळ्या मार्गाने सवलती लाटून आपल्या तुंबड्या भरतात, हे मात्र देशासाठी विघातक कृत्य ठरते. आपल्याकडील एका पिढीत झपाट्याने अब्जोपती झालेले अनेक उद्योगपती या रांगेत बसतील. त्यांच्याबाबतीत तशी जाहीर बोंबाबोंबही होते. मात्र सचोटीने व्यवहार करुन एका पिढीत अब्जोपती होणारे अनेक उद्योगपतीही आपल्याला आढळतात. यात नारायणमूर्तींपासून अनेक आय.टी. उद्योगातील दिग्गजांचा समावेश होतो. त्यामुळे प्रत्येक वेळी काही सरकारी आश्रयाने किंवा कोणत्यातरी राजकीय पक्षाला हाताशी धरुन मोठे होण्याची गरजच असते असे नाही. प्रत्येकाने आपण कसा उद्योगव्यवसाय करायचा हे ठरवायचे आहे. अदानी यांनी आपल्या मागे जाहीरपणे मोदींचा आशिर्वाद लाभलेला माणूस असा शिक्का मारुन घेतला आहे. त्याचे अनेक पुरावेही आढळतात. अलीकडेच मोदी यांनी केलेल्या नेपाळ दौर्‍यात जे तेथे वीज प्रकल्प मंजूर केले त्यातील अनेक प्रकल्प अदानींना बहाल केले आहेत. अशा प्रकारे अच्छे दिन अदांनीसाठी आले आहेत, सर्वसामान्यांसाठी नाहीत.
--------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel