-->
मनोहर व्यक्तिमत्व

मनोहर व्यक्तिमत्व

मंगळवार दि. 19 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मनोहर व्यक्तिमत्व
माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची गेले वर्षभर सुरु असलेली कॅन्सरची झुंज अखेर संपली व मनोहर तसेच स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याची अखेर झाली. केवळ भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांच्या जाण्याने चटका बसला आहे. गेले वर्षभर त्यांची स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज सुरु होती. सातत्याने त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत होते. कधीही पदाचा लोभ नसलेल्या या सदगृहस्थाला पक्षाच्या आदेशामुळे प्रकृती योग्य नसतानाही शेवटपर्यंत मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी लागली. मध्यंतरी ते गोवा विधानसभेत आले होते व त्यावेळी त्यांची खालावलेली परिस्थिती पाहता हे मनोहर व्यक्तिमत्व आपल्यात फार काळ असणार नाही अशी शंका आली होती. पर्रिकर यांच्या जाण्याने भाजपाला सर्वात मोठे नुकसान गोव्यात तर होणार आहे, तसेच पक्षातील एक निष्ठावान, स्वच्छ नेता गेल्याचे दु:ख आहे. एक जाणता, सुजाण राजकारणी कसा असावा याचा मापदंड पर्रिकरांनी आपल्या वर्तनातून आखून दिला होता. भाजपाला त्यांनी गोव्यात शून्यातून सत्तेकडे नेले होते. आज त्यांच्या शिवाय भाजपा गोव्यात शून्य असल्यासारखी स्थिती आहे. गोव्यात शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी आय.आय.टी.मध्ये अभियांत्रिकी केले. भारतीय राजकारणात जे काही मोजके उच्चशिक्षित आहेत त्यात त्यांचा समावेश होता. आय.आय.टी. तून अभियांत्रिकी केल्यावर खरे तर त्यांना विदेशात जाण्याची व तेथे गडगंज पगाराची नोकरी करण्याची संधी सहजरित्या चालून आली असती. अगदी देशातही त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात चांगले पॅकेज मिळू शकले असते. परंतु त्यांनी हे सर्व लाथाडून गोव्यात स्वयंरोजगार सुरु केला व त्या जोडीला ते स्वयंसेवक होतेच. संघाच्या मुशीतून तयार झालेले ते एक निष्ठावान कार्यकर्ते होते. आपण संघाचे स्वयंसेवक असल्याचा त्यांना सार्थ अभिमान होता. उत्तर गोव्यातून त्यांनी संघाच्या कामास प्रारंभ केला. 80च्या दशकात त्यावेळी संघ व भाजपा गोव्यात जवळजवळ नव्हतेच. परंतु संघाशी एकनिष्ठ असलेल्या पर्रिकरांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपले काम सुरु ठेवले. यातून ते 94 साली गोव्यात आमदार झाले. यानंतर त्यांनी कधीच मागे पाहिले नाही. विरोधी पक्षनेते, तीन वेळा मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री अशी अनेक मानाची पदे भूषवली. परंतु त्यांच्या मनाला कधीच अहंकार शिवला नाही. अन्य राजकारण्यांप्रमाणे ते कधीच वागले नाहीत. आपली स्वच्छ प्रतिमा त्यांनी कायम टिकविली. गोव्यात त्यांनी आपला हिंदुत्ववादी चेहरा राजकारण करताना कधीही लपवला नाही. मात्र असे असले तरी ख्रिश्‍चन समुदायांची मते मिळविण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले व त्यात त्यांना यश आले. गोव्यात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या असलेल्या पारंपारिक मतपेढीला छेद दिला, ही बाब सोपी नव्हती परंतु त्यांनी ते शक्य करुन दाखविले. एकीकडे हिंदुत्ववादी विचार व दुसरीकडे ख्रिश्‍चनांची मते जिंकणे हे त्यांनी शक्य करुन दाखविले. यातूनच भाजपाला त्यांनी गोव्यात सत्तेकडे नेले. पर्रिकर आणि गोव्याचे मुख्यमंत्रीपद हे जणू समिकरणच झाले असताना त्यांना 2014 सालच्या केंद्रातील यशानंतर भाजपानेे केंद्रात संरक्षणमंत्रीपदाची ऑफर दिली. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी त्यांचा मोलाचा हातभार होता. त्यामुळे त्यांना केंद्रात संरक्षणपदासारखे मोठे मंत्रीपद बहाल करण्यात आले. काहीसे नाराजीतच त्यांनी हे पद स्वीकारले. तेथेही त्यांनी आपली चोख कामगिरी बजावली. त्यांच्याच काळात पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. आपल्या पदाची सुत्रे स्वीकारल्यावर लगेचच त्यांनी संरक्षण खात्यातील शस्त्रास्त्र खरेदीतील दलाली थांबविण्यासाठी त्यांनी महत्वाचे निर्णय घेतले. मोदींचे खंदे समर्थक तसेच संघाचे निष्ठावान यामुळे पर्रिकर यांचे दिल्लीत चांगलेच बस्तान बसत होते. परंतु त्यांचा मूळ पिंड हा दिल्लीत रमणारा नव्हता. त्यांना सतत गोव्याची ओढ असे. त्यामुळे संरक्षणमंत्री असतानाही दर शनिवार-रविवारी गोव्यात हजर असत. गोव्यातील जनताही त्यांच्याकडेच येऊन आपली गार्‍हाणी मांडत असे. अखेर त्यांना पुन्हा गोव्याला परतण्याची संधी चालून आली. गोव्यात 2017 साली विधानसभेची निवडणूक झाली व त्यात भाजपाला सत्ता टिकविणे कठीण गेले. अशा स्थितीत स्थिर सरकार देण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन जाण्यासाठी गोव्यात पर्रिकरच हवेत अशी सर्वांची ठाम समजूत झाली आणि ते पुन्हा गोव्यात खुशीने परतले. गोव्यात परतल्यानंतर जेमतेम एका वर्षानंतरच त्यांना कॅन्सरने गाठले. आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर ते या रोगावर मात करतील असे चित्र काही काळ दिसत असतानाच त्यांनी ही झुंज संपली. आज पर्रिकर गोव्यात नाहीत हा भाजपाला मोठा धक्का आहे. त्यांची जागा घेणारा एकही नेता राज्यात नाही, हे मोठे दुर्दैव आहे. पर्रिकरांनी आज जो आदर्श आपल्यापुठे ठेवला आहे तो भाजपासह सर्व पक्षीय राजकारण्यांनी शिकण्यासारखा आहे. गोव्याच्या भूमीतील एक मनोहर, आदर्श व्यक्तिमत्व गेले आहे.
------------------------------------------------------------------   

0 Response to "मनोहर व्यक्तिमत्व"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel