-->
मांसबंदीची नसती उठाठेव

मांसबंदीची नसती उठाठेव

संपादकीय पान बुधवार दि. १६ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मांसबंदीची नसती उठाठेव
धार्मिक उत्सवांच्या काळात मांसविक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती देणारा एक महत्वाचा क्रांतीकारी निर्णय मुंबई उच्च न्यायायलयाने दिला आहे. त्याबद्दल आपल्या न्यायव्यवस्थेचे आभार मानले पाहिजेत. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने पर्युषण काळात आठ दिवस मांसविक्रीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. तो प्रत्यक्षात अस्तित्वात आला नाही. पण त्या प्रस्तावाचे अनुकरण करीत मुंबई महानगरपालिकेनेही पर्युषण काळात चार दिवस मांसविक्रीवर बंदी घातली. मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपची सत्ता असल्याने तेथे ते जैनांचा अनुनय करत असल्याची टीका शिवसेना व अन्य पक्षांनी केली. परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता असून तेथेही अशीच बंदी घातली गेल्यानंतर खरे तर शिवसेनेने तोंड लपवायला हवे होते. परंतु शिवसेनेने आपल्यावरील जबाबदारी झटकून भाजपवरच तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी, जैन मंडळींनी मुस्लिमांच्या मार्गाने जाऊ नये, तुमचा धर्म तुमच्या घरात पाळा, आमच्या चुलीपर्यंत याल तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. राज ठाकरे यांनी, महाराष्ट्र हा गुजरात नाही. येथे काय करायचे ते जैन लोकांनी ठरवायचे नाही. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मांसविक्रीवर बंदी घातल्याबद्दल भाजप, शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवला होता. हे टीकेचे प्रहार प्रत्येक पक्षाने एकमेकांवर केले ते योग्यच झाले. २००४ सालापासून पर्युषण काळात मांसविक्रीवर दोन दिवस बंदी घालण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयानुसारच मुंबईसह काही पालिका आपल्या हद्दीतही ही बंदी लागू करत असत. ही वस्तुस्थिती राज्याचे हंगामी अधिवक्ता अनिल सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने दोन दिवसांची घातलेली बंदी पर्युषण काळात आठ दिवसांवर नेण्यासाठी भाजप भलतेच उतावीळ झाले होते. सगळा वाद पेटला तो भाजपच्या याच भूमिकेमुळे. मांसाहार करणार्‍यांच्या विरोधात पर्युषणाचे निमित्त करून शाकाहारी लोकांनी कारस्थान रचले आहे, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न झाला. आपला धर्म घरात पाळा असा उध्दवरावांचा सल्ला योग्यच आहे. परंतु शिवसेनेच हिंदु धर्म रस्त्यावर आणला त्याचे काय? मांसविक्री बंदीच्या निर्णयाचे लोण भाजपचे स्वबळावरील सरकार असलेल्या राजस्थान, गुजरात आदी राज्यांतही लगेच पसरले. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपीचे आघाडी सरकार असले तरी तेथील न्यायालयानेच पर्युषण काळात मांसविक्रीला बंदी केली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर व अमित शहा हे भाजपचे पक्षाध्यक्ष झाल्यानंतर विविध राज्यांतील तसेच काही देशांत स्थायिक झालेल्या गुजराती मंडळींच्या आकांक्षा व अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत. जैन मंडळीही पर्युषण काळात मांसविक्रीवर बंदी घालावी यासाठी भलतीच आग्रही झालेली आहेत. कुणी कधी कोणता आहार घ्यायचा हा प्रत्येकाचा वैयक्तीक विचार झाला. त्याचा तो अधिकार झाला. दुसर्‍याने एख्यादाला काय खाणे हे सांगणे म्हणजे त्याच्या हक्कांवर गदा येते. परंतु धर्माचा अभिनिवेश डोक्यात चढलेल्या राजकीय पक्षांना प्रामुख्याने भाजपा-शिवसेनेला कुणी काय खायचे याचा अधिकार दिला कुणी? मुंबई उच्च न्यायालयानेही चपराक देऊनही हे राजकारणी गप्प बसलेले नाहीत, ही दुदैवी बाब म्हटली पाहिजे. आता केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी नवरात्रीच्या काळात नऊ दिवस मासांहारावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सध्या केंद्रात भाजपा व राज्यातही त्यांचे सरकार आल्यापासून अशा प्रकारच्या बंदी घालण्याचे प्रकार बोकाळले आहेत. हे केवळ कुणा धर्मीयांचे लांगूनचालून नाही तर दुसर्‍याच्या धार्मीक भावना भडकाविण्याचा प्रकार आहे. अगदीच स्पष्ट भाषेत बोलायचे तर मुस्लिमांना भडकाविण्याचा प्रकार आहे. परंतु केवळ मुस्लिमच मांस किंवा मच्छी खातात असे नव्हे तर सवज्ञधर्मियातील लोक खातात. हिंदु धर्मीयातील मोठ्या संख्येने लोक हे मासांहारी आहेत. अगदी हिंदुसाठी पवित्र समजल्या जाणार्‍या श्रावणातही मासांहार केला जातो. त्याचबरोबर हा महिना कडकपणे पाळणारेही आढळतात. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. मुस्लिमांमध्येच केवळ मांसाहारी लोक आहेत असे नव्हे तर शाकाहारीही आहेत. कारण कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. मध्यंतरी मुंबईत प्रामुख्याने दक्षिण मुंबईचा संपूर्ण विभाग हा शाकाहारी करण्याचा डाव आखला जात होता व त्याला भाजपाची फूस होती. यातून मुंबईचे जे कॉस्मोपॉलिटन व सेक्युलर जे स्वरुप आहे त्याला धक्का देण्याचा प्रय्तन केला जात होता. अर्थात अशा प्रकारचा डाव कुणी मुंबईकर यशस्वी होऊ देणार नाही. कारण मुंबईचे बहुवैविध्य हाच त्याचा आत्मा आहे. आता देखील भाजपाने केलेला ही मासबंदीची नसती उठाठेव त्यांच्या आंगलटी आल्याशिवाय राहाणार नाही.
----------------------------------------------------------------------

0 Response to "मांसबंदीची नसती उठाठेव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel