-->
गणपती बाप्पा मोरया ...

गणपती बाप्पा मोरया ...

संपादकीय पान गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
गणपती बाप्पा मोरया ...
-----------------------------------
गणेशोत्सव म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग... आनंदाच्या तळ्यात आनंदाचेच तरंग उठतात तसेच या काळात आनंदाच्या सागराला आनंदाचे भरते येते. उसळणार्‌या या भक्तीच्या लाटेत लोक न्हाऊन निघतात. या उत्सवाचे दिवस चराचरात जाणवतात. हे मंगलमय दिवस कधीच संपू नयेत असं वाटतं... गणपती बाप्पा मोरया चा गजर करत गुंजणर्‍या ललकार्‍या, प्रौढांच्या पूजा-आरतीनं भारावलेलं वातावरण, ज्येष्ठांच्या धीरगंभीर मंत्रोच्चारानं त्यात आलेलं आगळं गांभिर्य हे सर्व वातावरण अनोखा उल्हास देणारं... चैतन्य निर्माण करणारं... आजपासून दहा दिवस हेच चैतन्य अनुभवायला मिळणार आहे. यंदा मात्र गणराय आले आहेत त्यापूर्वी दुष्काळ व पाणी टंचाईचे संकट आले आहे. त्यामुळे सध्याच्या चिंतेच्या, निराशेच्या वातावरणातही आपण मोठ्या उत्साहाने गणरायाचे स्वागत करीत आहोत. विद्या, शक्ती, बुद्धीची ही देवता अगदी लहानपणापासून सर्वांच्या परिचयाची. आबालवृद्धांना या देवतेचं आकर्षण आहे. गणेशाविषयी सांगावं, बोलावं आणि लिहावं तेवढं थोडंच. श्री गणेशाचं आदिकाळापासून रुप बघायचं तर त्याचे चार टप्पे आहेत. निर्माणकाळात बृहस्पती, ब्रम्हणस्पती आणि इंद्र या देवतांशी श्री गणेशाची एकरुपता मानली जाणं हा श्री गणेश दर्शनाचा पहिला टप्पा. श्री गणेश आणि विनायक या देवता आदिकाळात भिन्न होत्या असं म्हटलं जातं. या देवतांच एकीकरण म्हणजे एक स्वरुप हा दुसरा टप्पा. श्री गणेश किंवा श्री विनायक ही नावं वेगळी-वेगळी म्हटली तरी, या दोन्ही नावांनी श्री गणेशाचंच रुप डोळ्यापुढे यावं, हा श्री गणेशाचा तिसरा टप्पा. गजमुख किंवा गजवदन अशा स्वरुपाची हत्तीचं तोंड असलेली श्री गणेशाची मूर्ती पूजेसाठी वापरली जाणं, हा श्री गणेश दर्शनाचा आजचा चौथा टप्पा. सध्या आपण अशाच मूर्तिची पूजा करतो. वेदांच्या काळात ऋग्वेदात गणपती या शब्दाचा उल्लेख आढळतो. वेद आणि उपनिषद या नंतर मुद्गलपुराण हा श्रीगणेश सांप्रदायातील त्या मानाने अर्वाचीन ग्रंथ आहे. यामध्ये बत्तीस प्रकारच्या गणपतीमूर्तीचे वर्णन आहेत. इसवी सन ५०० ते ६०० च्या सुमाराला भमरा येथील शक्तिगणपती आणि मथुरा येथील स्थानक गणपतीचे उगम आढळतात. इसवी सनच्या आठव्या-नवव्या शतकात नेपाळ आणि तिबेटमध्येही श्रीगणेशाची उपासना प्रचलित होती असं दिसून येतं. गणपतीची वाहनं अनेक तशीच त्याच्या हातामधली शस्त्रही वैशिष्टपूर्ण आहेत. गणपती हा शंकराच्या गणांमधील एक असल्याने त्रिशूल हे गणपतीचं एक शस्त्र ठरलं. कलियुगात प्रत्येकाला हवं ते देणारी आणि सर्वकाळ दातृत्त्वाची जबाबदारी पार पाडणारी देवता म्हणजे गणपती. सध्याच्या काळात गणपती बाप्पाला आपल्याकडील समाजविघातक शक्तींना चांगली बुध्दी देण्यास सांगण्याची वेळ आली आहे. कारण आपल्याकडे गेल्या काही वर्षात अपप्रवृंचा फैलाव झपाट्याने झाला आहे. सर्व काही बाबी आर्थिक निकषांवर तोलल्या-मोजल्या जाऊ लागल्या आहेत. यातून माणूसकी मागे पडत आहे. भ्रष्टाचार हा पावलोपावली बोकाळला आहे. त्यातून सर्वसामान्यांचे जीनव कठीण होऊन बसले आहे. आता नुकत्याच तीन महिन्यांपूर्वी लोसकभा निवड़णुका जाल्या. त्यात भ्रष्टाचार व महागाईला आळा घालण्याचे आश्‍वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. आता मात्र पंतप्रधानपदी सत्तेत बसल्यावर नरेंद्रभाई आपले हे आश्‍वासन विसरल्यासारखे झाले आहेत. तर बाप्पा आता याची आठवण नरेंद्र मोदींना करुन देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. कारण पूर्वी नरेंद्रभाई सर्वांना भेटायला मोबाईलपासून टी.व्ही.वर यायचे. आता त्यांचे कुठेच दर्शन होत नाही. गेल्या सव्वा वर्षात तर त्यांच्या २२ विदेशवार्‍या केल्या. गणपती बाप्पा, कोकणातील आमचा चाकरमनी मोठ्या-मोठ्या खड्यातून प्रवास करुन तुमच्या पायाशी आलेला आहे. मात्र पुढील दोन वर्षात रस्ता चार पदरी पूर्ण करण्याचे आश्‍वासन नितीन गडकरींनी जे आश्‍वासन दिले आहे त्यांच्या प्रयत्नांना बाप्पा तुम्ही बळ द्या. बाप्पा आता या भूतलावरच्या प्रत्येकाला सुबुध्दी देण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकमान्य टिळकांनी तुम्हाला घरातून सार्वजनिक ठिकाणी आणले व स्वातंत्र्याचे स्पुलिंग जागृत केले. आता बदलत्या काळात तुम्हाला नवीन भूमिका बजावायची आहे व लोकांचे जीवन सुखकर कसे होईल यासाठी सुबुध्दी द्यावयाची आहे... गणेश मंडळांनी सध्याची दुष्काळाची स्थिती पाहता आपल्याकडील निधीतून काही खर्च दुष्काळनिवारणावर खर्च करावे असे आव्हान आम्ही केलेले आहे. त्याला प्रतिसाद देण्यासाठी या मंडळांना सुबुध्दी देण्याचे काम आपण आपल्या दहा दिवसांच्या मुक्कामी कराल यावर आमचा विश्‍वास आहे...
-------------------------------------------------------------

0 Response to "गणपती बाप्पा मोरया ..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel