-->
पॅडमॅनची जनजागृती

पॅडमॅनची जनजागृती

सोमवार दि. 19 फेब्रुवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पॅडमॅनची जनजागृती
अक्षय कुमार या अभिनेत्याचा सध्या पॅडमॅन हा चित्रपट गाजत आहे. अक्षय कुमारने आपल्याकडे महिलांच्या मासिकपाळीबद्दल असलेले गैरसमज व सॅनेटरी नॅपकिन्सवर टाकलेला प्रकाश आपल्याला चांगलाच धडा शिकविणार आहे. अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल अक्षयकुमारचे आभार मानावे तितकेच थोडे आहेत. गेल्या काही वर्षात आपण विज्ञानापासून दूर जात उगाचच नको त्या जातीधर्माच्या विळख्यात अडकत आहोत. त्यातून आपण आपल्याभोवती अज्ञानाचे एक जाळे तयार करीत आलो आहोत व त्यातून आपण गैरसमजूतीच्या वेढ्यात अडकले आहोत. आपण चांगले शिक्षण घेतो, समाजात वावरतो, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतो, परंतु अनेक वस्तुस्थितींपासून दूर पळत असतो. खरे तर त्याची आवश्यकता नसते. मुला-मुलींमधील भेदभाव, अशस्त्रीय दृष्टीकोन, आपले शरीरशास्त्र यासंबंधी उगाचच काही पूर्वापार चालत आलेल्या कल्पना, गैरसमजूत यापासून बाहेर येऊन नवे विज्ञानवादी जीवन जगण्याचे आपण टाळत आलो आहोत. यामुळे आपण चांंगले शिक्षण घेऊनही पूर्वापार चालत आलेल्या अनावश्यक संस्कृतीच्या जंजाळात गुरफटले जातो. महिलांची मासिक पाळी व त्यात घ्यावयाची निगा याविषयी आपल्याकडे अनेक पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या समजुती याला आपण आधुनिक जगातही कवटाळून बसलो आहोत, यासारखे आणखी दुदैव ते काय? गेल्या काही दिवसांपासून सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल खूप चर्चा होते आहे. महाराष्ट्र सरकारने खेड्यातल्या महिला आणि मुलींसाठी स्वस्त दरात हे नॅपकिन देण्यासाठी तीन कोटी रुपये खर्चाची अस्मिता योजना जाहीर केली. त्या पाठोपाठ मुंबई महापालिकेनेसुद्धा आपल्या ताज्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपये खर्च करून शाळांमध्ये व्हेंडिंग मशीन्स आणि वापरलेले नॅपकिन नष्ट करण्याचे इन्सिनरेटरदेखील बसवण्याची घोषणा केली. स्वस्त नॅपकिन्स तयार करण्यासाठी झटणार्‍या माणसाच्या संघर्षावर आधारित पॅडमॅन हा चित्रपटसुद्धा गाजतो आहे. सॅनिटरी नॅपकिन हा मासिक पाळीविषयीचे आरोग्य व स्वच्छता याच्याशी निगडीत असा विषय आहे. हा केवळ महिलांचा विषय आहे, त्यात पुरुषांनी दखल घेण्याचे कारण नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण मासिक पाळी येणे हे माणसाच्या शरीरशास्त्राचा एक भाग आहे. याची परिपूर्ण माहिती जशी महिलांना हवी तशी पुरुषांनाही असणे गरजेचे असते. कारण हे शास्त्र आहे. यात अश्‍लिलता काही नाही. यामागे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. महिलांना तयार सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध झाले तरी ते बदलण्यासाठी स्वच्छतागृहच नसतील तर बायका कित्येक तास ते तसेच अंगावर वागवत राहणार, त्यातून वेगेवेगळ्या प्रकारचे संसर्ग होण्याचा धोका असतो. आपल्या देशात सध्या फक्त 17% महिला तयार सॅनिटरी नॅपकिन वापरतात. खेड्यात तर हे प्रमाण अगदीच नगण्य आहे. अस्मिता योजनेमध्ये खेड्यातल्या महिलांना 24 ते 29 रुपयांना आठ डिस्पोझेबल पॅड्सचे एक पाकीट मिळणार आहे आणि जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या मुलींना हेच पाकीट पाच रुपयांना मिळेल असे सांगितले जाते. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात सर्व शाळांमध्ये व्हेंडिंग मशीन बसवण्याची योजना जाहीर झाली आहे. कदाचित अन्य शहरांमध्येही अशा योजना आणल्या जातील. या मशीनमध्ये ठरावीक पैसे टाकले की, त्यातून एक किंवा दोन पॅड्स मिळू शकतात. अनेक मुलींना शाळा सुरू असताना अचानक पाळी येते, अशा वेळी त्यांची गैरसोय होऊ नये, अशी यामागची कल्पना असावी. सध्या अनेक महापालिका शाळांत अशी मशीन्स बसवलेली आहेतच. पण बहुतेक ठिकाणी ती वापरली जात नाहीत, कारण एक तर ते मशीन कसे वापरायचे हे माहीत नसते, त्यात टाकायची विशिष्ट प्रकारची नाणी उपलब्ध नसतात किंवा एकदा त्यात भरलेले नॅपकिन वापरून झाले की त्यात पुन्हा भरलेच गेलेले नसतात. मुंबई महापालिकेने वापरलेले नॅपकिन नष्ट करण्याचे इन्सिनरेटरदेखील बसवण्याची घोषणा केली आहे. विजेवर चालणार्‍या या इन्सिनरेटरमध्ये वापरलेले पॅड टाकले की, ते जाळून टाकले जाते. शहरातल्या बायका अनेक वर्षांपासून असे तयार नॅपकिन वापरत आहेत, पण अजूनही त्यांची विल्हेवाट कशी लावायची त्याचा प्रश्‍न शहरातदेखील सुटलेला नाही. खेडोपाडी जेव्हा हे स्वस्त दरात मिळालेले नॅपकिन बहुसंख्य महिला वापरायला लागतील तेव्हा त्यांची विल्हेवाट कशी लावली जाणार आहे? की खेड्यातही असेच इन्सिनरेटर बसवले जाणार आहेत? कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी यांनी कापसापासून बनविलेल्या नॅपकिन्स तयार करण्याची योजना आखली आहे. असा प्रकारची वापरलेली नॅपकिन्स नष्ट करमे सोपे जाते. करेजतचे हे उदाहरण देशासाठी आदर्श ठरु शकते. डिस्पोझेबल पॅडव्यतिरिक्त कापसारखे पर्यायसुद्धा असू शकतात. आपल्याला विविध पर्यायांमधून स्वत:साठी योग्य पर्याय निवडायची संधी असायला हवी. जगात डिस्पोझेबल नॅपकिनचे 14.5 अब्ज डॉलर्सचे मार्केट आहे. जगात ही मोठी बाजारपेठ आहे. परंतु या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तयार केलेल्या नॅपकिन्सच्या मागे जाण्याएवजी आपण कापसाचे पॅड तयार करण्यावर भर दिला पाहिजे. यातून वापरलेले पॅडस् नष्ट करण्याची समस्याही दूर होऊ शकते. पॅडमॅनने यातून फार मोठे शिक्षण केले आहे. यातून आपण बोध घेऊच, परंतु आपण या समस्येकडे विज्ञानवादी दृष्टीकोनाने पाहून त्याविषयी जनजागृती केली पाहिजे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "पॅडमॅनची जनजागृती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel