-->
लोकशाहीचा अविष्कार

लोकशाहीचा अविष्कार

मंगळवार दि. 12 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
लोकशाहीचा अविष्कार
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील 90 कोटी मतदार आपल्या मताचा हक्क बजावण्यास सज्ज झाले आहेत. मुख्य निवडणुक आयुक्तांनी रविवारी 10 मार्च रोजी 17 व्या लोकसभेसाठी मतदानाचा कार्यक्रम व निकालांची तारीख जाहीर केली तो लोकशाहीचा एक मोठा अविष्कारच म्हणावा लागेल. स्वातंत्र्यानंतर गेल्या सात दशकात आपल्याकडे लोकशाहीची पाळेमुळे चांगलीच रुजली आहेत. तर आपल्या एक दिवस अगोदर धर्माच्या आधारावर स्थापन झालेल्या पाकिस्तानची याच काळात दोन शकलेही झाली व तेथे लोकशाही नव्हे तर हुकूमशाही रुजली. आपल्याकडे लोकशाहीच्या माध्यमातून रक्तहिन क्रांती झाली आहे. आपल्या देशात आजही शंभर टक्के साक्षरता गाठली नसतानाही जनता आपल्या मतदानाच्या हक्कातून सत्ताधारी बदलण्याची किमया करुन दाखवितात. ही ताकद आपल्या लोकशाहीची आहे व त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सार्वभौम घटनेची आहे. आता देखील पुन्हा एकदा या देशातील 90 कोटी मतदार आपल्या मनातील सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा प्रथमच दीड कोटी युवक आपला मतदानाचा हक्क बजावतील. देशात सात टप्प्यात हे मतदान होईल व त्यासाठी दहा लाख मतदान केंद्रें स्थापन केली जातील. जगातील हा सर्वात मोठा लोकशाही सोहळा पार पाडण्यासाठी कोट्यावधींच्या संख्येने सरकारी यंत्रणा राबेल. अमेरिका असो किंवा आपण जिथून लोकशाही घेतली तो ग्रेट ब्रिटन असो किंवा युरोपातील विकसीत असलेले लहान देश असो आपल्या या लोकशाहीच्या सोहळ्याबद्दल नेहमीच आदर राखून असतात. अमेरिकेतील 35 कोटी लोकसंख्या ही आपल्या मध्यमवर्गीयांच्या लोकसंख्येएवढी आहे. एवढेच कशाला आपल्याकडे जो चाळीशीच्या आतला तरुण मतदार आहे तेवढी अख्ख्या युरोपाची लोकसंख्या आहे. ही सर्व आकडेवारी पाहता आपल्या लोकशाहीला आणखी बळ मिळते. गेल्या काही वर्षात आपण संगणकाच्या मतदीने मतदानाची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. मात्र त्यात अनेक गैरव्यवहार झाल्याचे आरोपही झाले. अर्थात तसे आरोप प्रत्येक राजकीय पक्ष विरोधात असताना करीत आला. परंतु ही प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी आपल्याकडे विविध उपाय केले जात आहेत. त्याबाबतीत दुमत असले तरीही आता यातून पुन्हा मागे जाणे नाही. संगणकाच्या मतदान प्रक्रियेत सुधारणा करुन त्यातील दोष दूर करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. आता त्यादृष्टीने व्हीव्हीपॅट ही यंत्रणा त्यात जोडण्यात आली आहे. असो, या प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी भविष्यात अजूनही प्रयोग करावे लागतील. लोकसभेच्या 543 जागांसाठी 23 मे रोजी मतमोजणी होऊन नवीन सरकार कोणाचे येणार हे स्पष्ट होईल. यावेळी खरी लढत ही सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी व कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी यांच्यात तसेच कॉँग्रेस व भाजपा वगळता विरोधी पक्षांच्या तिसर्‍या आघाडीत होईल अशी चिन्हे दिसत आहेत. यावेळी कॉँग्रेसने भाजपाविरोधात महागटबंधन उभारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. परंतु त्याला काही शंभर टक्के यश लाभले नाही. याला पहिला सुरुंग उत्तरप्रदेशात मायावती व अखिलेश यादव यांनीच लावला. या दोघा नेत्यांनी एकत्र येऊन कॉँग्रेसला केवळ दोन जागा दिल्या. त्यामुळे कॉँग्रेसला यांच्यासोबत जाण्यात काही रस राहिला नाही. महाराष्ट्रात मात्र कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप व अन्य मित्र पक्षांची आघाडी होणार आहे. यात फक्त वंचित आघाडीने वेगळी चूल उभारल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भाजपा-सेनेलाच होणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील विचार करता यावेळी भाजपाला फारशी अनुकूल स्थिती नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे गेल्या पाच वर्षात भाजपाने जनतेला दिलेली अनेक आश्‍वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे लोकांची पूर्ण निराशा झाली आहे. सरकारने दिलेल्या आश्‍वासनांमध्ये काळा पैसा आणणे, दोन कोटी नोकर्‍या, महागाईला आळा, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दुष्काळ, भ्रष्टाचार थांबलेला नाही, अनेक योजना कागदावरच राहिल्या आहेत. त्यांची केवळ जाहिरातबाजीच सुरु असून प्रत्यक्ष जनतेला काही लाभ मिळालेला नाही. जाती-धर्माच्या वानावे गेल्या पाच व्रषात अनेकदा तेढी निर्माण झाल्या. याचा परिणाम म्हणून आजवर असेलला जातिय सलोख ढळला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये  त्यामुळेच तीन राज्ये कॉँग्रेसच्या ताब्यात गेली. त्यानंतर नरेंद्र मोदी व भाजपाची लोकप्रियता रसातळाला जात असल्याचे दिसले होते. मात्र त्यानंतर आगामी निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचा बदला घेण्यासाठी हवाई हल्ला करण्यात आला. याव्दारे मोदी यांना आपली प्रतिमा सुधारण्यास मदत झाली. जवानांच्या हौत्याम्यावर स्वार होत सरकारने यावेळी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. याला अनेकांनी विरोधही केला. परंतु भाजपाने एअर स्ट्राईकचे भांडवल करीत देशात देशप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. गेल्या वेळी भाजपाला देशातील झालेल्या मतदानात 31 टक्के मते मिळवून 282 जागा मिळविल्या होत्या. याचा अर्थ 69 टक्के लोकांना भाजपाच्या विरोधात मतदान केले होते. मात्र गेल्या तीस वर्षात देशात प्रथमच एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले होते. आता मात्र भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. यावेळी लोकसभा त्रिशंकूच असेल असे त्यांचेच सहकारी पक्ष म्हणतात. आता यावेळच्या रणसंग्रामास सुरुवात झाली आहे...पुढे पाहूया काय होते ते...
-------------------------------------------------------------------

0 Response to "लोकशाहीचा अविष्कार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel