-->
कॅमेर्‍यांची नजर / दुष्काळाची झळ वाढतेय

कॅमेर्‍यांची नजर / दुष्काळाची झळ वाढतेय

बुधवार दि. 13 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
कॅमेर्‍यांची नजर
नेहमी पघात होणार्‍या महामार्गांवर वेगाने वाहन हाकून स्वत:बरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालणार्‍या चालकांना वेसण घालण्यासाठी पोलिसांनी रडारयुक्त कॅमेर्‍यांचा वापर सुरू केला आहे. ही बाब स्वागतार्ह ठरावी. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांची चाचणी सुरू असून, गेल्या दोन दिवसांत 150हून अधिक बेशिस्त चालकांना दंडही आकारण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्य महामार्ग किंवा अन्य महत्त्वाच्या रस्त्यांवर चालकांना वेगमर्यादा पाळावीच लागेल. राज्यात गेल्या दोन वर्षांत 72 हजार रस्त्यांवरील अपघात घडले असून त्यात 25 हजार 596 जणांचा मृत्यू झाला आहे. 40 हजारांहून अधिक प्रवासी, चालक, पादचारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत, तर 22 हजार 529 जण किरकोळ जखमी झाले आहेत. वाहतूक पोलीस, महामार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार वेग हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण आहे. वेगाला वेसण घातल्यास अपघात कमी होऊन मनुष्यहानी रोखणे शक्य होईल, असा विश्‍वास पोलिसांना आहे. वेगाच्या जोडीने मद्यपान करुन वाहन चालविणे हे देखील कारण आहे. परंतु आता मद्यपान करुन वाहन चालविण्यासंदर्भात बरीच जनजागृती झाल्याने तसेच पोलिसांचे ठिकठिकामी तपास होत असल्याने याला बराच आळा बसला आहे. मुंबईत जागोजागी सीसीटीव्हीचे जाळे, वेग मोजणारे विशेष कॅमेरे आहेत. त्याआधारे वाहतूक पोलीस मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावणार्‍या वाहनांविरोधात परस्पर ई चलन पाठवतात. मुंबई वाहतूक पोलीस महिन्याकाठी अडीच लाख बेशिस्त चालकांना ई चलन पाठतात.
गेल्या काही दिवसांपासून देशी-विदेशी कंपन्यांच्या रडारयुक्त कॅमेर्‍यांची चाचपणी महामार्ग पोलिसांकडून सुरू आहे. सध्या एका भारतीय कंपनीने आपला रडारयुक्त कॅमेरा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पळस्पे येथे लावला. यातील रडार मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावणार्‍या प्रत्येक वाहनाची जाणीव कॅमेर्‍याला करून देतो. कॅमेरा त्या वाहनाची छायाचित्रे टिपतो. या छायाचित्रात वाहनाच्या नोंदणी क्रमांकासह ठिकाण, तेथील वेगमर्यादा आणि वाहनाचा प्रत्यक्ष वेग आदी तपशील अधोरेखित होतात. या उपकरण पोलीस चौकीतील संगणकाशी जोडण्यात आले आहे. वाहने तिथल्या तिथे पकडणे अशक्य आहे. त्यामुळे पुढील टोल नाक्याला सूचना देऊन हा दंड वसूल केला जातो किंवा त्यांना ई चलन पाठवले जाते. या उपकरणाने रात्रीच्या अंधारात, वाहनाचा हेड लाइट सुरू असताना टिपलेले छायाचित्र स्पष्ट असावे, नोंदणी क्रमांक दिसावा, वेगाची मोजणी अचूक असावी या अपेक्षा आहेत. चाचणी सुरू असलेल्या एका उपकरणाने रात्री टिपलेली छायाचित्रे अत्यंत स्पष्ट आहेत. वाहनाच्या नोंदणी क्रमांकासोबत चालक आणि त्याशेजारी बसलेल्या प्रवाशाने सीट बेल्ट बांधलेला आहे किंवा नाही हेही त्यात स्पष्टपणे दिसले. या चाचणीनंतर वेगमर्यादेच्या अंमलबजावणीसाठी रडारयुक्त कॅमेर्‍यांच्या आवश्यकतेबाबत महामार्ग पोलीस शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहेत. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास भविष्यात राज्यातील महत्त्वाच्या, व्यस्त महामार्गावर रडारयुक्त कॅमेरे उभारण्यात येतील. त्याआधारे वेगमर्यादा ओलांडणार्‍या वाहनचालकांना ई चलन बजावले जाईल, दंड आकारला जाईल. आपल्याकडे वाहतुकीचे नियम मोडण्याचा अभिमान वाटतो, त्याची कुणाला लाज वाटत नाही हे मोठे दुर्दैव आहे. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलिसांना अशा प्रकारे कॅमेर्‍याच्या नजरेतून चुका करणार्‍यांना पकडणे आता शक्य होणार आहे. त्यामुले लोकांना शिस्त लागेल अशी अपेक्षा करुया.
दुष्काळाची झळ वाढतेय
ना विहिरीला पाणी, ना चारा अशा गंभीर स्थितीत पशुधन कसे जगवावे, या चिंतेने मराठवाडा व विदर्भातील शेतकर्‍यांना ग्रासले आहे. जिथे माणसांनाच पिण्यासाठी पाणी नाही तिथे जनावरांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे पाणी आणावे तरी कुठून, असा सवाल या भागातील शेतकर्‍यांना पडला आहे. विहिरींची खालावत चाललेली स्थिती तर जनावरांच्या चार्‍याची टंचाई, त्यावर उपाय म्हणून शासनाने तातडीने चारा छावणी सुरू करावी, अशी मागणीही शेतकर्‍यांनी केली. परंतु अजून प्रशासन काही हलत नाही अशी स्थिती आहे. अनेक सरकारी योजना केवळ कागदावरच आहेत. अनेक भागातील विहिरी कोरड्या पडल्या असून पाऊसच झाला नसल्याने शेततळी रिकामी आहेत. ओसाड पडलेल्या माळरानावर जनावरांना चरण्यासाठी गवताची काडी नाही. खरीप हातचा गेल्याने त्यावर असलेली जनावरांच्या चार्‍याची आशा धुळीस मिळाली. दुसरीकडे अल्प झालेला पाऊस व पुरेशी ओल नसल्याने रब्बीकडूनही चार्‍याची फारशी आशा नाही. आता बाहेरुन कडबा विकत आणावा तर त्यांच्या किंमती तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति शेकडा झाल्या. खर्च पेलणारा नसल्याने अशा स्थितीत जनावरे कशी जगावायची हा प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे आहे. पशुधन जगले पाहिजे. त्यांचा आम्ही मुलांप्रमाणे सांभाळ करतो, मात्र जनावरांचे खपाटीला गेलेले पोट बघवत नाही, ही शेतकर्‍यांची खंत आहे.
शेतातून काहीच हाती लागले नाही. आता कामेसुद्धा शिल्लक नाही. अशा स्थितीत शेतकर्‍यांच्या मुला-मुलींचे लग्न सुद्धा रखडली आहे. शेतकर्‍यांना या बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी चारा छावणी सुरू करणे आवश्यक आहे. सरकारने केवळ घोषणा केल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र शेतकर्‍यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. आता तर सत्ताधार्‍यांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे त्यांना दुष्काळग्रस्तांकडे लक्ष देण्यापेक्षा पुन्हा सत्तेत य्ेण्यात रस आहे.
-------------------------------------------------------------

0 Response to "कॅमेर्‍यांची नजर / दुष्काळाची झळ वाढतेय "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel