-->
संपादकीय पान--चिंतन--२४ऑक्टोबर २०१३साठी-
---------------------------
भारतीय उद्योजकांची आफ्रिकन सफारी
------------------------
गेल्या दोन दशकात आपल्याकडील उद्योजक हे खर्‍या अर्थाने जागतिक भरारी घेऊ लागले आहेत. एखाद्या भारतीय कंपनीने विदेशातील कंपनी आपल्या ताब्यात घेणे ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. केवळ देशातल्याच नव्हे तर जागतिक पातळीवर गुंतवणुकीच्या ज्या चांगल्या संधी आहेत तेथे आपले पंख विस्तारण्यास भारतीय उद्योजकांनी सुरुवात केली आहे. सध्या भारतीय उद्योजकांसाठी दक्षिण आफिका हे एक हॉट डेस्टिनेशन झाले आहे. यातील सर्वात पहिली सुरुवात भारती उद्योगसमूहाने तेथील टेलिकॉम कंपनी खरेदी करुन केली. भारतीने आफ्रिकेत पाऊल टाकल्यावर अन्य भारतीय उद्योजकांनाही आपल्या उद्योगांच्या वाढीसाठी आफ्रिकन सफारी करावीशी वाटते.
दक्षिण आफ्रिका हा सध्या मागास असला तरी आता झपाट्याने येथील बाजारपेठ विस्तारीत आहे. आपल्यापेक्षा हा देश किमान २० वर्षांनी मागे आहे. टेलिकॉम उद्योगाची आपली बाजारपेठ आता वाढण्याची थांबली आहे. त्याउलट तेथील बाजारपेठ विस्तारण्यास आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. हे नेमके हेरुन सुनिल मित्तल यांनी एअरटेलचा विस्तार तेथे सुरु केला. आफ्रिकेतल्या या विस्तारणार्‍या बाजारपेठेचा फायदा उठविण्यासाठी अनेक तरुण उद्योजक पुढे येत आहेत. आयसीआयसीआय बँकेचे आफ्रिकेतील प्रमुख युगंधरप्रसाद जस्ती यांनी आपली नऊ वर्षांची नोकरी सोडून आफ्रिकेत व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी तेथे कंपन्यांसाठी सल्लागार कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी विविध प्रकारचे कायदेशीर सल्ले, कंपन्या ताब्यात घेणे व त्यांचे विलिनीकरण याविषयी तेथील कंपन्यांना सल्ला देणार आहे. भारतीय उद्योजकांना तसेच तेथील कंपन्यांना भारतात गुंतवणुकीची असलेल्या संधीची माहिती देण्याचे काम ही कंपनी करेल. तसेच पटणा येथे जन्मलेल्या आणि पुण्यात शिक्षण घेतलेला रोहीत सिंग हा तरुण २००५ साली आफ्रिकेत आला. त्याने तेथे वीमा कंपनीसाठी एक सॉफ्टवेअर तयार केला. यातून त्याने आपले पाय तिकडे चांगले घट्ट रोवले. गेल्या तीन वर्षांपूर्वी त्याने आपली स्वत:ची कंपनी स्थापन केली आणि आता आफ्रिकेतील विविध उद्योगांना लागणार्‍या सॉफ्टवेअर तयार करण्याच्या कामात तो व्यग्र आहे. हे करीत असताना तेथील भारतीयांसाठी त्याने एक रेस्टॉरंट काढले आणि त्याचा हा व्यवसायही चांगलाच चालू लागला आहे. अशीच यशोेगाथा पोनुगोपती सतिश यांची आहे. या तरुणाने २००३ साली नोकरीच्या निमित्ताने येथे पाऊल टाकले. आता दोन वर्षांपूर्वी त्याने ट्रेडिंग व्यवसायात पाऊल टाकले आणि त्याला त्यात चांगले यशही आले. भारतातून विविध प्रकारचे अन्नधान्य तो आयात करतो आणि तेथे त्याची विक्री करतो. सध्या तेथे असलेल्या भारतीयांना याची जाणवत असलेली चणचण त्याने नेमकी हेरली आणि यात पाऊल टाकण्याचे ठरविले. असे अनेक लहान मोठे उद्योजक भारतातून येऊन आफ्रिकेत स्थिरावले आहेत.
अर्न्स्ट अँड यंग या जागतिक पातळीवरील नामवंत सल्लगार कंपनीच्या एका अहवालानुसार, आफ्रिका खंडाची वाढ झपाट्याने होत आहे. तेथील मध्यमवर्गीयांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढते आहे. येथे उद्योगव्यवसाय सुरु करणे हे देखील सुलभ आहे. यात भारतापेक्षा व विकसनशील देशांपेक्षा आफ्रिकेत व्यवसाय करणे अधिक सुलभ असल्याचे या अहवालात म्हटले आहे. डोळ्याचे डॉक्टर डॉ. अरुणकुमार जयराह यांनी राज या नावाने संपूर्ण आफ्रिका खंडात रेस्टॉरंटची साखळी सुरु केली आहे. भारत व आफ्रिकेतील देशांमध्ये सहकार्य वाढल्यामुळे अनेक भारतीय उद्योजक येतात त्यामुळे हॉटेलचा व्यवसाय बहरत आहे. सुरुवातीला नोकरीसाठी अनेक भारतीय येतात व लहान उद्योग करुन येथे स्थिरावतात. त्यामुळे भारत-आफ्रिकेतील सहकार्याचे एक नवे पर्व सुरु झाले आहे.
------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel