-->
केव्हिन सिस्टॉर्म : बौद्धिक संपत्तीचा धनी

केव्हिन सिस्टॉर्म : बौद्धिक संपत्तीचा धनी

 
केव्हिन सिस्टॉर्म : बौद्धिक संपत्तीचा धनी! 
Published on 14 Apr-2012 PRATIMA
अँपलचा मोबाइल असलेल्यांसाठी त्यांनी फोटो शेअरिंग करण्याचे सॉफ्टवेअर विकसित केले. पाहता पाहता त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळू लागला. 6 ऑक्टोबर 2010 या दिवशी मध्यरात्री त्यांनी ही साइट सुरू केली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्याच तासात तब्बल दहा हजार जण याचे सदस्य झाले. 'हा दिवस आमच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा होता', केव्हिन सिस्टॉर्म आपल्या आठवणी सांगताना भारावून जातो. ..
प्रसाद केरकर
दो न दिवसांपूर्वी सोशल नेटवर्किंगमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या फेसबुकने तब्बल एक अब्ज डॉलर खर्च करून इन्स्टाग्राम ही फोटो शेअरिंग करणारी साइट विकत घेण्याची घोषणा केली त्या वेळी जगातील कॉर्पोरेट जगताला धक्का बसणे स्वाभाविकच होते. कारण इन्स्टाग्रामचे सी.ई.ओ. केव्हिन सिस्टॉर्म हे केवळ 28 वर्षीय आहेत आणि त्यांनी ही फोटो शेअरिंगची साइट सुरू करून जेमतेम दोन वर्षे पूर्ण झाली होती. ही कंपनी स्थापन करण्यात त्यांचा सोबती होता माईक केरिंजर आणि त्यांच्या या कंपनीत केवळ 13 कर्मचारी होते. केवळ बौद्धिक संपत्तीच्या जिवावर त्यांनी एवढय़ा लहान वयात अवाढव्य संपत्ती कमवण्याचा विक्रम केला आहे. 
अँपल या नामवंत कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज जसा शून्यातून अब्जोपती झाला, तशीच काहीशी बाब केव्हिन सिस्टॉर्मची आहे. केव्हिनने 2006 मध्ये स्टॅँडफोर्ड विद्यापीठातून पदवी घेतली. त्याची पदवी कोणत्याही संगणक शाखेतली नव्हती. त्याने आपल्या नोकरीच्या करिअरची सुरुवात ट्विटरच्या कंपनीपासून केली. त्यानंतर दोन वर्षे तो गुगलमध्ये होता. सुरुवातीला त्याने जी मेल, गुगल रीडर येथे काम केले. त्यानंतर तो कंपनीच्या कॉर्पोरेट डेव्हलपमेंट विभागात दाखल झाला. 
नोकरी करीत असला तरी त्याचा मुख्य छंद होता तो फोटोग्राफीचा. भविष्यात त्याला यातच काही तरी करावे असे सतत वाटत असे. यातूनच त्याने इन्स्टाग्राम ही फोटो शेअरिंग साइट सुरू करण्याचे ठरवले. यासाठी मित्रांकडून सुरुवातीचे भांडवल 50 हजार डॉलर उभारले. त्याच वेळी त्याचा मित्र केरिंजर याची त्याला साथ लाभली. त्याला फोटो शेअरिंग साइट सुरू करण्याच्या कल्पनेने पछाडले आणि तो देखील जोमाने कामाला लागला. 
अँपलचा मोबाइल असलेल्यांसाठी त्यांनी फोटो शेअरिंग करण्याचे सॉफ्टवेअर विकसित केले. पाहता पाहता त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळू लागला. 6 ऑक्टोबर 2010 या दिवशी मध्यरात्री त्यांनी ही साइट सुरू केली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्याच तासात तब्बल दहा हजार जण याचे सदस्य झाले. 'हा दिवस आमच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा होता', केव्हिन सिस्टॉर्म आपल्या आठवणी सांगताना भारावून जातो. फोटो शेअरिंग करणे ही एक नवीन संकल्पना होती. आजवर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या मित्र-मैत्रीण, नातेवाइकांना आपले फोटो पाठवणे ही फार गमतीशीर कल्पना. यामुळे नेटकर्‍यांना एक जागतिक पातळीवरील मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. आज इन्स्टाग्राम ही या क्षेत्रातली एवढी लोकप्रिय साइट झाली आहे की, दररोज तीन कोटी लोक त्यांना भेट देतात. 
खरे तर केव्हिन हा काही तंत्रज्ञ नाही. त्याचा अभ्यास हा व्यवस्थापन शास्त्रातला; पण तो एक उत्कृष्ट फोटोग्राफर, परंतु त्याने सुरू केलेली ही कल्पना त्यांना एवढय़ा लहान वयात अवाढव्य पैसा मिळवून देईल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. ही साइट त्यांनी सुरू केल्यावर केवळ पहिल्या आठवड्यातच दोन लाख सदस्य झाले. फेब्रुवारी 2011 रोजी त्यांचे सदस्य होते 17.5 लाख आणि दररोज 290,000 फोटो डाऊनलोड केले जात. त्यांच्या या वाढीची नोंद घेतली बेंचमार्क कॅपिटलने आणि या कंपनीत 70 लाख डॉलरची गुंतवणूक केली. त्यांच्यामध्ये गुंतवणूक केल्याची ही बातमी सर्वत्र वार्‍यासारखी पसरली आणि त्यांचे ग्राहक सदस्य एका दिवसात दुप्पट झाले. त्यानंतर त्यांच्या वृद्धीची गती कधी रोखली गेली नाही. इन्स्टाग्राममध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेकांनी रांगा लावल्या. तेवढय़ातच फेसबूकने ही साइट खरेदी केल्याची बातमी थडकली. सर्वात गमतीचा आणि आश्चर्याचा भाग म्हणजे फोटो उद्योगातली सर्वात जुनी कंपनी कोडॅकने यंदा दिवाळखोरी जाहीर केली असताना फोटो शेअरिंगमधील वेबसाइटला दुसरीकडे एक अब्ज डॉलरचे मूल्य मिळाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा हा महिमा आहे असेच म्हणायचे. 
prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "केव्हिन सिस्टॉर्म : बौद्धिक संपत्तीचा धनी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel