-->
वित्तीय संस्था उभारणीचा एकनिष्ठ शिल्पकार

वित्तीय संस्था उभारणीचा एकनिष्ठ शिल्पकार

वित्तीय संस्था उभारणीचा एकनिष्ठ शिल्पकार

 दिव्य मराठी  (16/04/12) EDIT

गेल्या 20 वर्षांत देशाच्या अर्थकारणाने ख-या अर्थाने वेग घेतला. परंतु हा वेग कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती परंपरागत शेअर दलालांची मक्तेदारी मोडून काढणा-या राष्ट्रीय शेअर बाजाराने. तर या शेअर बाजाराला आकार दिला होता तो मूळ कर्नाटकातील परंतु मराठीपण अंगी मुरलेल्या डॉ. आर.एच.पाटील यांनी. पाटील यांचे नुकतेच निधन झाले, परंतु राजकीय चिखलफेक आणि आयपीएलच्या धूमधडाक्यात त्यांच्या जाण्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही, ना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे मोजमाप झाले. प्रामुख्याने आपल्याकडे आर्थिक उदारीकरणाचे युग सुरू झाल्यावर पहिल्या टप्प्यात वित्तीय क्षेत्रात सुधारणा सुरू झाल्या. संगणकीकरणाचेही युग त्याला समांतर असेच सुरू झाले होते. वित्तीय सुधारणा आणि संगणकीकरण यांचा मेळ घालून देशाच्या प्रगतीला हातभार लावणारे नेतृत्व तयार होणे ही त्या काळची गरज होती. नेतृत्वाची ही पोकळी डॉ. पाटील यांनी भरून काढली. कर्नाटकातल्या चंदगडसारख्या एका छोट्या गावात जन्मलेल्या पाटील यांचे फर्ग्युसनसारख्या नामवंत महाविद्यालयात पदवी शिक्षण झाल्यावर त्यांनी मुंबईत येऊन अर्थशास्त्रातील उच्च पदवी मिळवली आणि आपले पुढील काळातील करिअर हे अर्थशास्त्रातीलच असेल हे नक्की केले. रिझर्व्ह बँकेत काही काळ नोकरी केल्यावर त्यांची बदली आयडीबीआय या त्या वेळच्या विकास बँकेत झाली. तेथे त्यांना वित्तीय क्षेत्र जवळून बघता आले आणि अनुभवाची मोठी शिदोरी मिळाली. आर्थिक उदारीकरणाचे वारे सुरू झाल्यावर स्पर्धेच्या युगात ‘परंपरावादी’ मुंबई शेअर बाजाराला पर्यायी शेअर बाजार स्थापून गुंतवणूकदारांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्याची गरज होती. यातून राष्ट्रीय शेअर बाजाराची कल्पना पुढे आली. या बाजाराची संकल्पना तयार करण्यापासून त्याची उभारणी व नंतरच्या काळात त्याला वैभव मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम डॉ. पाटील यांनीच केले. शतकाचा इतिहास असलेल्या मुंबई शेअर बाजाराची उभारणी मुळातच शेअर दलालांनी केलेली होती. त्यामुळे तेथे शेअर गुंतवणूकदारांपेक्षा शेअर दलालांच्या हिताचे रक्षण होई. याला मुळापासूनच आव्हान राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) दिले. एनएसईची स्थापना ही एक कंपनी म्हणून करण्यात आली आणि यात शेअर दलालांना चार हात दूर ठेवण्यात यावे, ही संकल्पना डॉ. पाटील यांचीच. एनएसईने स्थापनेपासूनच सर्व व्यवहार संगणकावर करण्यास सुरुवात केली आणि व्यवहारात पारदर्शकता आणली. त्या वेळी मुंबई शेअर बाजारातील दलालांचा सर्व व्यवहार संगणकावर करण्यास कडवा विरोध होता. मात्र एनएसईने सुरुवातच संगणकावर केल्याने अल्पावधीतच गुंतवणूकदारांना याचे फायदे पटले आणि त्यांनी हळूहळू आपले व्यवहार मुंबई शेअर बाजारात करण्याऐवजी एनएसईत करण्यास प्रारंभ केला. याचा परिणाम असा झाला की शेवटी आपल्याकडील गुंतवणूकदार ग्राहक टिकवण्यासाठी मुंबई शेअर बाजारालाही संगणकीकरणाची कास धरावी लागली. मुंबई शेअर बाजारातील दलालांची मक्तेदारी मोडून काढणे हे एक मोठे आव्हान होते आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत डॉ. पाटील यांनी दलालांची मक्तेदारी संपवली. म्हणजे ज्या काळी मराठी माणूस शेअरच्या व्यवहारांपासून   दूर होता, त्याच काळात पाटील यांच्यासारखा माणूस बाजाराला आकार देण्यासाठी झटत होता. अशा प्रकारे डॉ. पाटील यांनी देशातील शेअर बाजारात ख-या अर्थाने क्रांतीच केली होती. समभागांच्या उलाढालीत मुंबई शेअर बाजाराला अल्पावधीतच एनएसईने मागे टाकले. डॉ. पाटील एवढे करून थांबले नाहीत, तर त्यांनी डिमॅट ही जगात लोकप्रिय असलेली सेवा देशात सुरू केली. यामुळे गुंतवणूकदाराकडील समभाग हस्तांतर झटक्यात करणे शक्य झाले. पूर्वीच्या काळी ‘बॅड डिलिव्हरी’ने गुंतवणूकदार त्रस्त होता. ही समस्या यातून कायमची मिटली. त्यामुळे देशातील शेअर बाजाराला आधुनिकीकरणाचा टच देऊन गुंतवणूकदारांसाठी क्रांती करणारे म्हणून डॉ.पाटील सर्वांना परिचित झाले. देशात नॅशनल सिक्युरिटीज क्लिअरिंग कॉर्पोरेशन, एनएसडीएल, इक्रा ही पतमापन संस्था स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी एनएसईसह देशात वित्तीय क्षेत्रात एवढ्या मोठ्या संस्था उभारल्या की डॉ. पाटील यांचा उल्लेख नेहमीच मोठ्या गौरवाने ‘इन्स्टिट्यूशन बिल्डर’ असा केला जाई. त्यांच्या वित्तीय क्षेत्रातील कार्याची दखल घेत सरकारने त्यांना विविध समित्यांवर सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. त्याशिवाय आयडीबीआय बँकेचे कार्यकारी संचालक, निर्गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष, यूटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे अध्यक्ष अशी अनेक जबाबदारीची पदे त्यांनी भूषवली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशा अनेक जबाबदारीच्या पदांवर कामे करत असताना त्यांचा सर्व व्यवहार निष्कलंक राहिला. शेअर बाजारात जशी त्यांनी एनएसईच्या रूपाने पारदर्शी संस्था उभारली, तसेच त्यांचे आयुष्यही पारदर्शीच होते. वित्तीय क्षेत्रातील संस्था उभारत असताना त्यांनी आपल्या आयुष्यालाही एक आर्थिक शिस्त लावून घेतली होती. या शिस्तीमुळेच कुठल्याच वादाच्या भोव-यात ते कधी सापडू शकले नाहीत. वयाची 65 वर्षे पूर्ण केल्यावर ते एनएसईतून निवृत्त झाले. परंतु विविध सरकारी समित्यांवर तसेच सरकारी कंपन्यांवर संचालक म्हणून कार्यरत होते. मर्यादित बोलणारे पण स्पष्टवक्ते म्हणून ते देशाच्या वित्तीय वर्तुळात ओळखले जात. त्यांनी आपल्यावर असलेल्या जबाबदा-या समर्थपणे पेलल्या. परंतु त्याचा त्यांनी कधीच गवगवा केला नाही. डॉ. आर.एच.पाटील यांनी केलेले काम जागतिक तोडीचे होते, परंतु ते नेहमीच ‘लो प्रोफाइल’ राहिले. त्यांनी आपल्या कामाचा मोठा गाजावाजा केला असता तर त्यांना आणखी काही सरकारी पदे उपभोगता आली असती किंवा सरकारी मान-मरातब मिळाले असते. परंतु ते जाणीवपूर्वक टाळण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. त्या अर्थाने राष्ट्रीय शेअर बाजाराला आकार देणारा धैर्यवान शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

0 Response to "वित्तीय संस्था उभारणीचा एकनिष्ठ शिल्पकार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel