-->
विखे आणि पक्षनिष्ठा

विखे आणि पक्षनिष्ठा

गुरुवार दि. 14 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
विखे आणि पक्षनिष्ठा
काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्या घरात कमळ फुलल्याने राज्यातच नव्हे देशात राजकीय वर्तुळात भूकंप झाल्यासारखी स्थिती आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. परंतु गेल्या पाच वर्षात पूर्णपणे खिळखिळ्या झालेल्या कॉँग्रेसच्या संघटनेने एवढे धक्के सहन केले आहेत की, त्यांना या धक्याचे आता फारसे महत्व वाटत नाही. त्याचबरोबर यात फारसे काही आश्‍चर्यकारक असे काही नाही. कारण विखे परिवाराचा पक्षबदलाचा इतिहास नवीन नाही. यापूर्वीही विखे घराण्याने काँग्रेसमध्ये बंड केल्याचा इतिहास आहेच. यावेळच्या त्यांच्या बंडाकडे काँग्रेसने फारसे गांभीर्याने पाहिले नाही. त्याचबरोबर राधाकृण विखे यांना देखील आपल्या पुत्राच्या हट्टापुढे नमते घेता आले नाही. राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून कॉँग्रेसची उमेदवारी मागत होते. परंतु ही जागा राष्ट्रवादीची होती, मात्र ही जागा राष्ट्रवादीने सोडली नाही. त्यामुळे म्हणून सुजय यांनी बंडाचा झेंडा फडकवत हातात कमळ घेऊन भाजपा प्रवेश केला. खरे तर विखे यांचा हा भाजपा प्रवेश काँग्रेस थांबवू शकली असती, पवारांना काँग्रेस आग्रह करु शकली असती. मात्र, तसे झाले नाही व पवार आणि काँग्रेस या दोघांनीही विखे यांना एकप्रकारे दुर्लक्षित केले. यामागचे कारण काय असावे? विखे हे काही निष्ठावान कॉँग्रेस नेते म्हणून ओळखले जात नाहीत. यापूर्वी विखे परिवाराने काँग्रेस विरोधी व बंडखोर भूमिका घेतलेली होती. याचा शेवटी परिणाम म्हणून सुजय यांनी बंडखोरी केलीच. सुजय यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब विखे हे काँग्रेसचे मोठे नेते होते. मात्र ते काही निष्ठावान म्हणून कधीच ओळखले गेले नाहीत. अनेकदा त्यांनी काँग्रेसमध्ये सत्तेसाठी बंड केले. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात तसेच आता त्यांच्या नातवाने आजोबांचा कित्ता गिरविला आहे. बाळासाहेब विखे हे आठ वेळा खासदार झाले. क्षमता असूनही त्यांना काँग्रेसमध्ये मंत्रिपद कधीही मिळाले नाही. त्यामुळे ते नेहमीच नाराज होते. त्याकाळी कॉँग्रेसमध्ये दिग्गज नेते होते, त्यांच्यापुढे कॉँग्रेसमध्ये विखेना नेहमीच दुय्यम स्थान मिळाले होते. त्यांना व त्यांचे पुत्र राधाकृष्ण यांना पहिला लाल दिवा शिवसेनेने दिला. त्यांच्या याबंडखोरीमुळे काँग्रेस विखे यांच्याकडे नेहमी संशयाने पाहत आली. बाळासाहेब विखे हे काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले गेले होते. शंकरराव चव्हाण व शरद पवार या संघर्षात विखे हे सतत शंकरराव यांच्यासोबत होते. 1978 मध्ये शंकरराव चव्हाण, विखे, खताळ पाटील यांनी स्वतंत्र काँग्रेस काढली. शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये शंकरराव चव्हाण हे समाविष्ट होते. तेव्हाच पवार-विखे थोडी जवळीक होती. बाळासाहेब विखे यांच्यात मुख्यमंत्रीपदाची क्षमता होती, परंतु त्यांनी आपले वजन सतत शंकरराव चव्हाण यांच्या पारड्यात टाकले. त्यामुळेच आजही अशोक चव्हाण व राधाकृष्ण विखे यांच्यात सलगी आहे. शरद पवारांना विखे यांनीही कधीही साथ दिली नाही. पवारसाहेबांच्या ही सल नेहमीच मनात होती. राजीव गांंधी पंतप्रधान असताना बाळासाहेब विखे यांनी त्यांच्याविरोधात फोरम स्थापन केला होता. त्यावेळपासून विखे घराणे हे त्यावेळी काँग्रेसच्या ब्लॅकलिस्ट मध्ये गेले. त्यातून त्यांना 1991 ची लोकसभा उमेदवारी न दिल्याने विखे यांनी नगर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाख यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली. त्या निवडणुकीत विखे पराभूत झाले. मात्र, निवडणूक आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्यांनी गडाख व पवार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात खटला भरला होता. त्या खटल्यात गडाखांची निवड रद्द होऊन गडाख व पवार या दोघांवरही न्यायालयाने ठपका ठेवला होता. पवार त्यावेळी पुढे सहा वर्षासाठी निवडणूक लढविण्यासाठी अपात्रही ठरले असते. त्यांच्यावर नामुष्की ओढावली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरविले. पवारांवर हे संकट विखे यांनी आणले. ती देखील सल पवारांच्या मनात आजही आहेच. 1991 च्या या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर 1995 मध्ये राधाकृष्ण विखे यांना काँग्रेसने शिर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी विखे परिवाराचे पुन्हा काँग्रेसचे नाते जुळले. मात्र, काही महिन्यातच राधाकृष्ण विखे शिवसेनेत जाऊन मंत्री झाले. विखे पिता-पुत्रांनी पुन्हा बंड करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आज त्यामुळे शिवसेना विखेना परतण्याचे आवाहन करीत आहे. आता सुजय विखे यांना भाजपाचे तिकीट मिळणार असले तरीही त्यांचा विजय सहज होईल अशी परिस्थिती नाही. विखेना जिल्ह्यात जेवढे मित्र आहेत त्यापेक्षा जास्त शत्रू आहेत. तसेच सध्याचा भाजपाचा गट व विद्यमान खासदार गांधी हे देखील नाराज आहेत. त्यांची मते सुजय यांना पडणार नाहीत. त्याचबरोबर शिवसेनेची मते त्यांना मिळतीलच याचीही खात्री देता येत नाही. अशा स्थितीत सुजय विजयी झाले तर त्यांचा पुढील राजकीय प्रवास सुकर असेल, मात्र पराभव झाला तर त्यांचा खडतर प्रवास सुरु होईल यात काहीच शंका नाही.
-----------------------------------------------------------------

0 Response to "विखे आणि पक्षनिष्ठा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel