-->
चैतन्य हरपले

चैतन्य हरपले

रविवार दि. १९ जुलै २०१५ च्या अंकासाठी पान १ साठी विशेष अग्रलेख
-----------------------------------------------------------------
चैतन्य हरपले
अलिबागच्या माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांच्या अकस्मित निधनामुळे अलिबागचे चैतन्यच हरपले आहे. त्यांचा सतत हसतमुख चेहरा आजही सर्वांच्या नजरेसमोरुन हटत नाही. समाजकारण करीत असताना सर्व प्रकारच्या जनतेच्या समस्यांना सामोरे जाताना त्यांचा चैतन्याचा झरा कधीच आटला नाही. आपले पती व सध्याचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पाठीमागे सावली म्हणून वावरणार्‍या नमिताताईंचा वावर शहरातील प्रत्येकाच्या घराघरात होता. अलिबागच्या विकासासाठी झटणे, महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहाणे यातच त्यांनी आपले आयुष्य झोकून दिले होते. शेतकरी कामगार पक्षाच्या तरुणाच्या फळीत त्या आघाडीवर होत्या. अलिबागमध्ये काम करताना ज्याप्रकारे त्यांनी शेकापचे समर्थक उभे केले तसेच त्यांनी इतर पक्षातल्या लोकांनाही विकास कामे करताना आपलेसे केले. अलिबागचे नाईक हे सुसंस्कृत व प्रतिष्ठीत घराणे. या नाईक कुटुंबात १९४१ साली रामराव नाईक व १९४६ साली अनंत नाईक हे नगराध्यक्ष होते. त्यानंतर त्याच घराण्यातील व नमिताताईंच्या सासूबाई सुनिता नाईक या नगराध्यक्ष झाल्या. त्याच घराण्यातील नमिताताई पुढे नगराध्यक्ष झाल्या. त्यांचे पती नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दोन वेळा नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविला. समाजसेवा व समाजकारण याचे व्रत हाती घेतलेल्या या नाईक कुटुंबियांचा वारसा नमिताताईंनी जाज्वल्यपणे चालविला. अलिबागमध्ये महिला मंडळे, हळदीकुंकू समारंभ, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे, विविध शिबीरे भरविणे यातून त्यांनी अलिबागकरांना आपलेसे केले होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. यातूनच त्यांनी शहरातील शेकापची ताकद वाढविली होती. शेकापचे आ.भाई जयंत पाटील यांनी पक्षाला तरुण चेहरा देण्याचे सरचिटणीपदाची सुत्रे घेतल्यावर जाहीर केले होते. नमिता नाईक यांना यातूनच पक्षाने पुढे केले व त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. अलिबाग व मुंबई येथे शिक्षण घेऊन कायद्याची पदवी संपादन केलेल्या नमिताताई या उच्चशिक्षीत असल्याने त्यांचे इंग्रजी व मातृभाषा मराठीवर प्रभूत्व होते. त्यामुळे त्यांना प्रशासनावर व अधिकार्‍यांवर चांगलीच पकड बसवून जनतेच्या हिताची कामे करुन घेता आली. अलिबागला पर्यटनाचा दर्जा मिळावा यासाठी त्या सतत प्रयत्नशील होत्या. तसेच अलिबागकरांना डासांपासून मुक्ती मिळावी यासाठी भुयारी गटार योजना सुरु करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. परंतु त्यात त्यांना काही यश मिळाले नव्हते. परंतु त्यांनी काही सरकारी पातळीवरील पाठपुरवठा करण्याचे काही सोडले नव्हते. कधीतरी आपण अलिबागसाठी भुयारी गटार योजना राबवूच असा त्यांना विश्‍वास वाटत होता. घर समृध्द होण्यासाठी महिलांना त्यांच्या पायावर उभे केले पाहिजे, त्यासाठी त्यांनी महिलांच्या बचत गटांच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. एक नवा विश्‍वास महिलांना दिला. अलिबागमधील वकिल, डॉक्टर, व्यापारी, साहित्यिक, पत्रकार, महिला, कष्टकरी असो अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचा वावर असे. आज अलिबागकरांना आपल्या घरातील कुणीतरी व्यक्ती गमावल्याची भावना होते आहे ती यातूनच. अगदी कमी वयात त्यांनी समाजकारण व राजकारणात उत्तुंग भरारी घेतली होती. त्यांच्या जाण्याने अलिबाग नगरीने एक हसतमुख चेहरा, कधीही मदतीला धावणार्‍या व त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे चैतन्यदायी व्यक्तीमत्व गमावले आहे. नमिताताईंच्या या जगातून अचानक जाण्याने अलिबागकरांसाठी कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
-----------------------------------------------------------------------------------      

0 Response to "चैतन्य हरपले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel