-->
अमेरिकेचा ट्रम्प कौल

अमेरिकेचा ट्रम्प कौल

संपादकीय पान बुधवार दि. 9 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अमेरिकेचा ट्रम्प कौल
टोकाचे वंशवादी असलेले व गौरवर्णीयांकडेच सत्ता असली पाहिजे असे आग्रह असलेले 70 वर्षिय डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांच्या धोरणाच्या नेमके विरोधात असलेले ट्रम्प आता अमेरिकेत नेमके कोणते धोरण राबवितात याकडे आता सार्‍या जगाचे लक्ष त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे अमेरिकेतील वातावरण नेमके कसे भविष्यात राहिल याविषयी प्रश्‍नचिन्ह आहे. जगात आता टोकाचा संकुचितवाद फोफावत असून जर्मनी, फ्रान्स, तुर्कस्थान, ग्रेट ब्रिटन, भारत यांच्या जोडीला आता अमेरिकाही ट्रम्प यांच्या निवडीमुळे आला आहे असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. ट्रम्प यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या संदर्भात केलेली वक्तव्ये, मुस्लिमांना देशात प्रवेश न देण्याची केलेली भाषा, स्त्रियांविषयीची हिन भावना हे व अशा अनेक उदाहरणे देता येईल की त्यामुळे जगात ट्रम्प येऊ नये असे अनेकांना वाटत होते. परंतु अमेरिकनांच्या मनात काही वेगळेच होते. त्यांना अशा प्रकारे मूळ अमेरिकनांचे संरक्षण करणारा अध्यक्ष पाहिजे होता. म्हणजे आपल्याकडे राज ठाकरे जी भाषा उत्तर भारतीयांच्या बाबतीत वापरतात अशाच प्रकारची भाषा ट्रम्प यांची होती. त्यामुळे अमेरिकेतील सर्व समाज ट्रम्प यांच्यामागे उभा राहाणार नाही हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांनी, तरुणांनी, महिलांनी, भारतीयांनी त्यांना भरघोस मते दिल्याचे आढळले आहे. खरे तर हे आर्श्‍चयकारकच आहे. तसे पाहता ट्रम्प यांचा राजकीय अनुभवही केवळ 18 महिन्यांचा होता. त्यांचे घराणे हे अमेरिकेतील उद्योजकीय घराणे म्हणून ओळखले जाते. त्यांचे वडिलही उद्योजक होते व डोनाल्ड यांनी आपला हा वडिलांचा व्यवसाय वाढविला. सध्या त्यांच्या समूहात 100 च्या वर कंपन्या आहेत. एकीकडे जगात व्यवसाय करायचा आणि अमेरिकेत मात्र संकुचित भूमिका घ्यायची असे त्यांचे धोरण होते. परंतु त्यांनी सध्या अमेरिकन नागरिकांच्या मनात काय खदखदत होते त्याची नस बरोबर ओळखली. अमेरिकेतील बेकारी, अर्थव्यवस्थेतील मंदी हे भेडसाविणारे प्रश्‍न हाताळले. मेक अमेरिका ग्रेट अगेन ही घोषणा दिली व ती लोकांना भावली. अमेरिका ही पुरोगामी, मुक्त विचारसारणीची आहे व लोकांनी यातच आपले सुख मानले आहे. जगातील विविध समुदायांना त्यांनी आपल्यात समावून घेतले आहे. येथील भांडवलशाही व्यापक व उदारमतवादी आहे, हे देखील एका वास्तव आहे. परंतु ट्रम्प यांनी या पारंपारिक विचारांना छेद देत टोकाची भूमिका मांडली. त्यांचा आधुनिक विज्ञानाला असलेला विरोध एवढेच कशाला महिलांना गर्भपाताचा अधिकार देण्यास विरोध अशा भूमिका मांडल्या होत्या. एक उद्योजक म्हणून त्यांनी कर प्रदीर्घ काळ थकविला होता व त्यात आपले काही चुकले असे त्यांना काही वाटत नाही. तर दुसरीकडे एक उद्योजक म्हणून उद्योजकांना सवलती दिल्या पाहिजेत अशी त्यांची जाहीर भूमिका होती. अमेरिका ही जगाचा पोलिस आहे व त्यांनी आजवर जगात आपला दरारा निर्माण केले आहे. शीतयुद्दाच्या अगोदर असो किंवा सध्याच्या नंतरच्या काळात अमेरिकेने आपला जगावर कसे वर्चस्व राहिला याचा विचार केला. प्रत्येक निवडणुकीत त्यादृष्टीनेच प्रचार झाला. मात्र यावेळी ट्रम्प यांनी देशातील प्रश्‍नांकडे व अमेरिका मजबूत कशी होईल याकडे लक्ष केंद्रीत केले होते. जागतिकीकरणामुळे अमेरिकेतील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले उद्योग चीन, मेक्सिको अशा देशात हलवले. या सर्व उद्योगांना अमेरिकेत परत आणले जाईल ही त्यांची निवडणुकीच्या प्रचारातील भूमिका होती. तसे न करणार्‍या उद्योगांना दंड करण्याची घोषणा केली होती. मात्र स्वत: ट्रम्प उद्योग जगात आहेत. आता ट्रम्प सत्तेवर आल्यावर या निर्णयाची अंमलबजावणी करणार का, हा प्रश्‍न आहे. ट्रम्प यांच्या प्रर्तिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्या पराभवामुळे एका महिलेला अध्यक्षपदावर बसविण्याच्या मानापासून अमेरिकेसारखी एक महासत्ताही अजून दूर राहिली आहे. यात अमेरिकेचा मोठा पराजय आहे. कारण भारत, पाकिस्तान, बांगलादेशात जर पंतप्रधानपदी महिला विराजमान होऊ शकते, मात्र अमेरिकेसारखी महासत्ता अजूनही या सर्वोच्च स्थानापर्यंत महिलेला जाऊ देत नाही. ट्रम्प यांनी हा देखील मुद्दा उपस्थित केला होता. तसेच हिलरी या अमेरिकेतील बँकर्स व ढनाढ्य लोकांचे प्रतिनिधीत्व करतात असे मांडले गेले. मात्र ट्रम्प हे तर थेट भांडवलदारांचेच प्रतिनिधी होते. हिलरी यांचे स्वपक्षीय प्रतिस्पर्धी बर्नी सॅण्डर्स हेदेखील ट्रम्प यांच्याच मताचे होते आणि त्यांचाही अमेरिकेतील धनदांडग्यांना विरोध होता. परंतु त्यांना हिलरी यांच्यासाठी माघार घेतली. नंतर स्वत: सॅण्डर्स यांनी हिलरी यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्यासाठी प्रचारही केला. लोकांना हे काही रुचलेले दिसले नाही. त्याचमुळे सॅण्डर्स यांचा प्रभाव असलेल्या राज्यांत हिलरी यांना फारशी मते पडली नाहीत. प्रचारात हिलरी यांच्यासाठी बराक आणि मिशेल या ओबामा दाम्पत्यानेही मोठया प्रमाणावर प्रचारात उतरले होते. असे असले तरीही आफ्रिकी अमेरिकींचे मतदान हिलरी यांना झाले नाही. हा वर्ग ओबामा यांच्या राजकारण आणि अर्थकारणावर नाराज झाला आहे. तेव्हा हिलरी यांचा पराभव हा एका अर्थाने ओबामा यांचाही पराभव ठरतो. आता ट्रम्प आल्याने अमेरिकेचे राजकारण खरोखरीच कोणती दिशा घेते याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे. अर्थात जानेवारी महिन्यात आपल्या पदाची सुत्रे हाती घेतल्यावरच हे सर्व स्पष्ट होईल.
--------------------------------------------------------

0 Response to "अमेरिकेचा ट्रम्प कौल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel